जितेंद्र आव्हाडांवर तरुणाला मारहाण केल्याचा आरोप, फडणवीसांकडून राजीनाम्याची मागणी -#5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविध वृत्तपत्र आणि माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा घेतलेला आढावा.
1. जितेंद्र आव्हाडांविरोधात विरोधी पक्ष आक्रमक
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत आपल्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची तक्रार एका तरुणाने केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
लोकमतने दिलेल्या बातमीनुसार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यात राहणाऱ्या एका सिव्हील इंजिनिअर तरुणाने गंभीर आरोप केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे लावण्याच्या आव्हानावर आव्हाड यांनी टीका केली होती.
त्यानंतर संबधित तरुणाने आव्हाड यांच्याविरोधात एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली. त्यावर आव्हाड यांच्या सुरक्षरक्षकांनी या तरुणाला जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावर नेऊन त्यांच्या उपस्थितीत मारहाण केल्याची तक्रार वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. आव्हाड यांनी हे आरोप फेटाळून लावले असले तरी विरोधी पक्ष यावरून आक्रमक झाला आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाड यांना मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करण्याची मागणी केली.
2. सात राज्य लॉकडाऊन वाढविण्याच्या मनस्थितीत
भारतातील कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 5 हजारच्या जवळपास पोहोचली असताना केंद्र सरकारने 21 दिवसांचा लॉकडाऊनसंदर्भात राज्यांकडून सूचना मागवल्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, भारतात जाहीर करण्यात आलेला तीन आठवड्यांचा लॉकडाऊन 14 एप्रिलला संपत आहे. त्यानंतरही लॉकडाऊनची मुदत वाढवायची का यासंदर्भात केंद्र सरकारने राज्यांकडून सूचना मागवल्या आहेत.
गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीडिओ कॉन्फरसिंगद्वारे मुख्यमंत्र्यांची एक बैठक घेतली होती. त्यात कोरोना व्हायरसग्रस्तांची सर्वाधिक संख्या असलेल्या महाराष्ट्रासह सात राज्यांनी काही ठिकाणी लॉकडाऊन वाढविण्यासंदर्भात संकेत दिले होते.
केंद्र सरकारही याच दिशेने विचार करत असून अंतिम निर्णय पंतप्रधान घेतील अशी माहिती उच्चस्तरीय सुत्रांनी दिल्याचं या बातमीत म्हटलं आहे.
देशातील 284 जिल्ह्यांमध्येच कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्याचे पाहायला मिळते, अशात संपूर्ण देशात लॉकडाऊन वाढवण्याऐवजी उर्वरित भागामध्ये काही प्रमाणात यातून सुट मिळू शकेल अशी आशाही सुत्रांनी व्यक्त केल्याचं या बातमीत म्हटलं आहे.
3. पुण्यातील 4 पोलीस स्टेशनच्या हद्दीत कर्फ्यू
पुणे शहरातील कोरोना व्हायरसने संक्रमित झालेल्यांची वाढती संख्या बघता शहरातील चार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मंगळवारी रात्रीपासून कर्फ्यू लावण्यात आला आहे.

फोटो स्रोत, EPA
एबीपी माझाच्या बातमीनुसार, चार पोलीस स्टेशनच्या हद्दीत कर्फ्यू लागू झाल्यानंतर या भागातील नागरिकांना सकाळी दहा ते दुपारी बारा या दोन तासांच्या कालावधीतच गरज पडल्यास जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडता येऊ शकेल.
फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतील कागदीपूरा, मंगळवार पेठ, गाडीतळ चौक, कामगार पुतळा, खडक पोलीस स्टेशन हद्दीतील मक्का मशीद, शहीद भगतसिंग चौक, चांदतारा चौक, घोरपडे पेठ, स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील मिनाताई ठाकरे वसाहत, महर्षी नगर ते गिरीधर भवन चौक आणि कौंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील अशोका म्यूज सोसायटी, आशिर्वाद चौक, मिठानगर चौक, भैरोबा मंदिर, ब्रह्मा एव्हन्यू, गंगाधाम रोड यांचा समावेश आहे.
4. निजामुद्दीनहून आलेल्या 50 ते 60 जणांचे फोन बंद
दिल्लीतल्या निझामुद्दीनमध्ये तबलीगीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील लोकांपैकी 50 ते 60 जणांचे फोन बंद असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
गृहखात्याच्या माहितीनुसार अद्यापही 50 ते 60 जणांशी संपर्क होऊ शकलेला नाही. हे लोक फोन बंद करून लपण्याचा प्रयत्न करत आहे, असं लोकसत्ताने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.
तबलीगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या या लोकांनी तत्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आणि चाचणी करून स्वतःला क्वारंटाईन करून घ्यावे. असं न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.
5. भाजप आमदाराविरोधात गुन्हा दाखल
चैत्र एकादशीच्यादिवशी (4 एप्रिल) पंढरपूरमध्ये विठ्ठल रुख्मिणी मंदिरात भाजपचे आमदार आणि मंदिर समितीचे सदस्य सुरजितसिंह ठाकूर तसेच शिवसेनेचे सदस्य संभाजी शिंदे यांनी सपत्नीक पूजा केली.

फोटो स्रोत, Twitter
या घटनेनंतर पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियमन, साथीचे रोग प्रतिबंध कायद्यान्वये आमदार ठाकुर आणि शिवसेना सदस्य शिंदे याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे.
राज्य सरकारच्या आदेशानंतर राज्यात विविध उत्सवांवर बंदी आणण्यात आली आहे. पंढरपूरमध्ये चैत्र एकादशीच्या वारीनिमित्त आयोजित पूजाही देवस्थान समितीने रद्द केली होती. मात्र आमदार सुरजितसिंह ठाकुर आणि संभाजी शिंदे यांनी मंदिरात जाऊन विठ्ठल रुख्मिणीची सपत्नीक पुजा केल्याचं आढळून आलं.

- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?
- वाचा - कोरोनाचा माझ्या जीवाला किती धोका आहे?
- वाचा -आधी कोव्हिड-19ची किट बनवली, मग बाळाला जन्म दिला
- वाचा-कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा- कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























