कोरोना व्हायरस : लॉकडाऊन कधी आणि कसा संपणार?

लॉकडाऊन, कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लॉकडाऊन संपणार का?
    • Author, सरोज सिंह
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

लॉकडाऊन कधी आणि कसा संपणार, या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याआधी एक नजर टाकूया गेल्या काही दिवसात वेगवेगळ्या राज्य सरकारांकडून आलेल्या वक्तव्यांवर.

आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. लॉकडाऊन सुरू ठेवावा. मी माननीय पंतप्रधानांना लॉकडाऊन 14 एप्रिलनंतरही सुरूच ठेवण्याची विनंती करतो - के. चंद्रशेखर राव, मुख्यमंत्री, तेलंगाणा

गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये बातम्या येत होत्या की 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन उठवण्यात येईल. यामुळे जनता अधिक संवेदनशील झाली. 14 एप्रिलनंतर काय होणार, हे आता सांगता येत नाही. आपल्या राज्यात एकही रुग्ण असल्यास लॉकडाऊन उठवणं योग्य ठरणार नाही - अवनीश अवस्थी, अतिरिक्त मुख्य सचिव, उत्तर प्रदेश

भारतात कोरोना व्हायरसची प्रकरणं

ही माहिती नियमितपणे अपडेट केली जात आहे. तरीही काही राज्यांचे किंवा केंद्रशासित प्रदेशांचे ताजे आकडे लगेच न दिसण्याची शक्यता आहे.

राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश एकूण प्रकरणं संपूर्ण बरे झालेले मृत्यू
महाराष्ट्र 1351153 1049947 35751
आंध्र प्रदेश 681161 612300 5745
तामिळनाडू 586397 530708 9383
कर्नाटक 582458 469750 8641
उत्तराखंड 390875 331270 5652
गोवा 273098 240703 5272
पश्चिम बंगाल 250580 219844 4837
ओडिशा 212609 177585 866
तेलंगणा 189283 158690 1116
बिहार 180032 166188 892
केरळ 179923 121264 698
आसाम 173629 142297 667
हरियाणा 134623 114576 3431
राजस्थान 130971 109472 1456
हिमाचल प्रदेश 125412 108411 1331
मध्य प्रदेश 124166 100012 2242
पंजाब 111375 90345 3284
छत्तीसगड 108458 74537 877
झारखंड 81417 68603 688
उत्तर प्रदेश 47502 36646 580
गुजरात 32396 27072 407
पुडुच्चेरी 26685 21156 515
जम्मू आणि काश्मीर 14457 10607 175
चंदीगड 11678 9325 153
मणिपूर 10477 7982 64
लडाख 4152 3064 58
अंदमान निकोबार 3803 3582 53
दिल्ली 3015 2836 2
मिझोरम 1958 1459 0

स्रोत- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

11: 30 IST ला शेवटचं अपडेट

केंद्राने राज्यांकडून प्रस्ताव मागवले आहेत. राज्यांनी आपापली परिस्थिती बघून निर्णय घेतले पाहिजे. लॉकडाऊन करणारं राजस्थान पहिलं राज्य होतं - अशोक गहलोत, मुख्यमंत्री, राजस्थान

महाराष्ट्र सरकार टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या भागातील लॉकडाऊन उघडण्याचा विचार करत आहे - राजेश टोपे, आरोग्यमंत्री, महाराष्ट्र

4 किंवा 20 एप्रिलला लॉकडाऊन उघडण्यात आलं आणि त्यानंतर देशभरात विखुरलेले आसामी तरुण-तरुणी एकत्र राज्यात परतले तर एवढ्या सगळ्यांना एकाचवेळी 14 दिवसांसाठी विलग (क्वारंटाईन) करण्याची व्यवस्था सध्या तरी सरकारकडे नाही - हिमंत बिस्वा सरमा, आरोग्य मंत्री, आसाम

कोरोना
लाईन

देशातल्या काही मोठ्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांची ही वक्तव्यं आहेत. या सर्वांवरून एक बाब स्पष्ट होते की 14 एप्रिलनंतर संपूर्ण देशातून एकदम लॉकडाऊन उठवण्यात येणार नाही.

काही राज्यांमध्ये तिथलं सरकार स्वतः काही निर्बंध कायम ठेवू शकतात.

असं असेल तर लॉकडाऊन अखेर संपणार तरी कधी? सरकारकडे काही ब्लू प्रिंट काय आहे? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी बीबीसीने एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांच्याशी बातचीत केली. सरकारने कोव्हिड-19 संबंधी स्थापन केलेल्या 11 समित्यांपैकी एका समितीचे ते अध्यक्ष आहेत.

लॉकडाऊन कुठे उठणार आणि कुठे कायम राहणार?

डॉ. गुलेरिया यांच्या मते हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी जिथे कोरोनाचा संसर्ग दररोज दुप्पट वेगाने वाढतोय, त्या भागांमध्ये सध्यातरी लॉकडाऊन उठवण्यात येणार नाही.

अशा भागांमध्ये लॉकडाऊन आत्ताच उठवला तर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे.

ज्या भागांमध्ये आजवर कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही त्या ठिकाणी लॉकडाऊन हळूहळू उठवला जाऊ शकतो.

देशात आज एकूण 274 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. देशभरात 700 हून अधिक जिल्हे आहेत.

त्यामुळे 14 एप्रिलनंतर जवळपास 450 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन शिथील करण्यात येऊ शकेल, अशी शक्यता आहे.

कोणत्या आधारावर निर्णय घेणार?

देशभरात कोरोना संसर्गाचे 4 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. एका अहवालानुसार सध्या दर पाचव्या दिवसाला रुग्णांची संख्या दुप्पट होते.

तबलिगी जमात मरकजमध्ये इतक्या मोठ्या संख्येत रुग्ण आढळले नसते तर रुग्णांची संख्या वाढण्याचा वेग यापेक्षा कमी राहिला असता, असं केंद्र सरकारने अनेकदा म्हटलं आहे.

डॉ. गुलेरिया यांच्या मते केंद्र सरकार चार मुद्द्यांच्या आधारे निर्णय घेईल.

लॉकडाऊन, कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लॉकडाऊन संपणार का?

पहिला - लॉकडाऊन कायम राखल्यास अर्थव्यवस्थेवर किती परिणाम होईल? या तोट्याची भरपाई सरकार करू शकेल का?

दुसरा - लॉकडाऊन उठवणे जनतेच्या आरोग्याशी खेळ ठरेल का?

तिसरा - लॉकडाऊनसंबंधी कुठलाही निर्णय घेताना सरकारला उद्योग जगताच्या प्रश्नांचीही दखल घ्यावी लागणार आहे. आयात-निर्यात, इतर राष्ट्रांशी संबंध आणि देशातील इतर उद्योगांवर किती परिणाम होईल, या सर्वांचाही विचार करावा लागेल.

चौथा - गरीब स्थलांतरित मजुरांची परिस्थिती. त्यांच्या समस्या काय आहेत आणि सरकार त्या समस्यांचं समाधान करण्यास सक्षम ठरत आहे का?

याच कारणांमुळे केंद्र सरकारने लॉकडाऊनसंबंधी राज्य सरकारांकडून प्रस्ताव मागवले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांशीही यासंबंधी चर्चा करणार आहेत.

लॉकडाऊन कशापद्धतीने उठवता येईल?

डॉ. गुलेरिया यांच्या मते लॉकडाऊन उठवण्याचे दोन पर्याय आहेत. पहिला म्हणजे टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उठवणे.

दुसरं म्हणजे ज्या भागांमध्ये अजून कोव्हिड-19 चा एकही रुग्ण आढळलेला नाही, असा भागातील लॉकडाऊन पूर्णपणे उठवणे.

डॉ. गुलेरिया टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उठवण्याच्या मताचे आहेत.

त्यांच्या मते लॉकडाऊन पूर्णपणे त्याच भागातून उठवला जाऊ शकतो, जिथे आजवर एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, भारतासारख्या देशासाठी ते शक्य नाही. कारण कोव्हिड-19 ग्रस्त भागातले लोक जिथे एकही रुग्ण नाही त्या भागात जाऊ शकतात.

सरकारी यंत्रणेला अशा भागांमध्ये लोकांच्या येण्या-जाण्यावर लक्ष ठेवावं लागेल आणि म्हणूनच हॉटस्पॉटच्या ठिकाणची परिस्थिती वेगळ्या पद्धतीने हाताळावी लागेल आणि जे भाग हॉटस्पॉट नाहीत त्या ठिकाणची परिस्थिती वेगळ्या पद्धतीने हाताळावी लागेल, असं गुलेरिया यांचं म्हणणं आहे.

'हॉटस्पॉट' म्हणजे अशी ठिकाणं जिथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या खूप जास्त आहे.

आरोग्य मंत्रालयाने ही 'हॉटस्पॉट' ठिकाणं चिन्हांकित केली आहेत आणि इथून कम्युनिटी ट्रान्समिशन होऊ नये, यादृष्टीने तिथली परिस्थिती हाताळण्यासाठी रणनीतीही आखली आहे.

यातले काही हॉटस्पॉट आहेत - दिल्ली (निजामुद्दीन आणि दिलशाद गार्डन), नोएडा, मेरठ, अहमदाबाद, मुंबई, पुणे, कासरगोडा आणि पथानामथिट्टा.

मात्र, दररोज बदलणाऱ्या परिस्थितीनुसार यात बदल होतो. सरकारच्या नव्या आदेशानुसार देशात 21 हॉटस्पॉट आहेत.

या हॉटस्पॉट ठिकाणांना 14 एप्रिलनंतरही इतर भागापासून पूर्णपणे कट ऑफ ठेवावं लागेल, असं डॉ. गुलेरिया सांगतात.

याचा अर्थ या भागांमध्ये ट्रेन, बस, हवाई वाहतूक पूर्णपणे बंद ठेवावी लागेल. नाहीतर ज्या ठिकाणी सध्या कोरोनाचे रुग्ण नाही तिथेही रुग्ण आढळू शकतात.

लॉकडाऊन संबंधी निर्णय घेताना सरकारसमोर सर्वांत मोठं आव्हान असणार आहे की कुठल्या फ्लाईट्सना परवानगी द्यावी आणि कोणत्या ट्रेन्स सुरू कराव्या.

टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उठवण्याचा अर्थही हाच असतो. डॉ. गुलेरिया यांच्या मते आधी एका जिल्ह्याला कोरोनामुक्त करावं, नंतर दुसरा. अशाप्रकारे ज्या ज्या जिल्ह्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या शून्य होईल, तिथे लॉकडाऊन उठवावं आणि नंतरच इतर भागातून लोकांना तिथे जायला परवानगी द्यावी.

आंतरराष्ट्रीय विमानांना परवानगी कधी मिळणार?

लॉकडाऊनमध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर आपण कितीकाळ बंदी ठेवू शकतो.

डॉ. गुलेरिया म्हणतात भारतात कोरोना विषाणू परदेशातूनच आलेला आहे. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या सर्वांना थेट क्वारंटाईनमध्ये पाठवण्याचा निर्णय घेता येऊ शकतो.

विमानतळांवर स्क्रिनिंग आणि टेस्टिंग वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही आता रॅपिड टेस्टिंगच्या मार्गदर्शक सूचना पाठवल्या आहेत. गुरुवारपासून देशात याची सुरुवात होईल.

चित्र स्पष्ट कधी होणार?

डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या मते 10 ते 12 एप्रिलनंतर सरकारकडे जास्त डेटा येईल. त्यावेळी चित्र अधिक स्पष्ट होईल की लॉकडाऊनचा किती परिणाम झाला आहे आणि कुठेकुठे झाला आहे.

तेव्हा सरकारला हे ठरवता येईल की कोरोनाचा ग्राफ वाढतो आहे की काही प्रमाणात तरी 'फ्लॅट' झाला आहे. त्यामुळे सरकार 10-12 एप्रिल दरम्यान पुढच्या रणनीतीची घोषणा करू शकते.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)