कोरोना व्हायरस: धारावीत तिसरा रुग्ण सापडला, संसर्ग रोखण्याचं प्रशासनासमोर आव्हान

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईतील धारावी परिसरात कोरोना व्हायरसचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळं धारावीतल्या रुग्णांची संख्या तीनवर पोहोचलीय. त्यातील एकाचा मृत्यूही झालाय.


आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. या झोपडपट्टीत कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यानं चिंता व्यक्त केली जातेय. कारण स्वच्छता आणि गर्दीचा सर्वात मोठा प्रश्न या परिसरात कायमच दिसून आलाय.

फोटो स्रोत, Twitter
एक एप्रिल रोजी मुंबईच्या धारावीत 56 वर्षीय व्यक्ती कोव्हिड-19 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आणि नंतर रात्री त्या व्यक्तीचा मृत्यूही झाला. ही व्यक्ती झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या सोसायटीत राहत होती. याठिकाणी 300 पेक्षा जास्त फ्लॅट आणि 90 दुकाने आहेत.
मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना अलगीकरण कक्षात हलवण्यात आलं आहे. कुटुंबीयांसह परिसरातील व्यक्तींची चाचणी घेण्यात येत आहे.

- वाचा - कोरोनाचा माझ्या जीवाला किती धोका आहे?
- वाचा -आधी कोव्हिड-19ची किट बनवली, मग बाळाला जन्म दिला
- वाचा-कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा- कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?

तसंच, बृहन्मुंबई महापालिकेत स्वच्छता विभागात काम करणाऱ्या दुसऱ्या एका व्यक्तीलाही कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
खरंतर ही 52 वर्षीय व्यक्ती मुंबईतील वरळीची रहिवासी आहे. पण त्यांची ड्युटी धारावी परिसरात लावण्यात आलेली होती. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ANI वृत्तसंस्थेने याबाबत बातमी दिली आहे.
या व्यक्तीला सध्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. तर त्याच्यासोबत काम करणाऱ्या इतर 23 जणांचंही अलगीकरण करण्यात आलं आहे. त्यांची चाचणीही घेण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
म्हणजेच, कोरोना व्हायरसमुळं धारावीत आतापर्यंत दोन रुग्ण आणि एक मृत्यू अशी नोंद झालीय.

फोटो स्रोत, Getty Images
धारावीत कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळल्यामुळे प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आता खूपच जास्त कष्ट घ्यावे लागतील.
मुंबईमध्ये कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण 11 मार्च रोजी आढळून आला. तेव्हापासूनच दाट लोकवस्ती असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये याचा प्रसार होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.
असं घडल्यास ते खूप मोठं संकट असेल, असं मानलं जात होतं. पण आता खरंच या भागात रुग्ण सापडल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.
धारावीत कोरोनाचा संसर्ग रोखणं कठीण का?
पण धारावीत कोरोना व्हायरसचा प्रसार होणं, हे इतकं मोठं संकट का आहे? याचं कारण म्हणजे इथली मर्यादित जागा आणि दाट लोकसंख्या.
मध्य मुंबईच्या 613 हेक्टर परिसरात वसलेल्या या झोपडपट्टीत सुमारे 15 लाख लोक वास्तव्याला असल्याचा अंदाज आहे.
याठिकाणी शेकडो लहानमोठ्या झोपड्या, कच्ची घरं, दुकानं, कारखाने आहेत. छोट्या-छोट्या गल्ल्या आणि लोकसंख्येची जास्त घनता असलेल्या या भागात सोशल डिस्टन्सिंग राखणं जवळपास अशक्यप्राय गोष्ट आहे.

फोटो स्रोत, Getty Images
इथल्या परिसरातील अस्वच्छता सध्याच्या परिस्थितीला अधिकच बिकट बनवते. देशभरातील बहुतांश स्थलांतरित कामगार वर्ग याच ठिकाणी गेल्या कित्येक वर्षांपासून वास्तव्याला आहे.
धारावी अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे, खाण्यापिण्याच्या वस्तू तसंच चामड्याच्या उत्पादनात पुढे आहे. पण इथली सामाजिक स्थिती आणि कमी जागेतली लोकवस्ती यामुळे धारावीची वेगळी ओळख बनली आहे.
धारावीची हीच स्थिती सध्याच्या परिस्थितीला अधिक गंभीर बनवण्यास कारणीभूत ठरली आहे.
'...तर परिस्थिती हाताबाहेर जाईल'
80 वर्षीय भाऊ कोरडे हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते आपल्या जन्मापासूनच धारावीत राहतात. धारावीचे किस्से सांगण्यासाठी ते एकदा टेड टॉक्स या कार्यक्रमातही दिसले होते.
भाऊ सांगतात, "हा व्हायरस इथं पसरला तर काय होईल, याची कल्पना करवत नाही. इथल्या शेकडो लहान-लहान घरांमध्ये प्रत्येक घरात दहापेक्षा जास्त माणसं राहतात. या भागातील दाटीवाटीच्या गल्ल्यांमधून एक व्यक्तीसुद्धा मोकळेपणानं चालू शकत नाही."
या गल्ल्यांचं निर्जंतुकीकरण कसं करता येईल? इथं सोशल डिस्टन्सिंग कसं राखावं? लॉकडाऊन असलं तरी अशा घरांमध्ये माणूस किती काळ बसून राहू शकतो. इथं कोरोना व्हायरस वाढला तर परिस्थिती हाताबाहेर जाईल.
"या बंदिस्त परिस्थितीत वर्षानुवर्षे राहत असल्यामुळे गरीब मजूरांची प्रतिकारशक्ती वाढलेली असावी, इतकीच प्रार्थना मी करू शकतो," असं ते सांगतात.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
दुसरीकडे धारावीत काम करणाऱ्या डॉ. कैलास गौड यांना मात्र सध्यची परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचं वाटतं. इथं कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळल्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, असं त्यांना वाटतं.
ते सांगतात, "होय, इथं एक व्यक्ती कोव्हिड-19 मुळे मृत्यूमुखी पडली आहे. पण अतिशय अरूंद अशा भागात ही व्यक्ती राहत होती. त्यामुळे जास्त लोकांशी त्यांचा संपर्क आला असण्याची शक्यता अत्यंत कमी आहे."
"फक्त भीतीमुळे इथले लोक डॉक्टरांकडे तपासणीसाठी येत आहेत, असं मला वाटतं."
"मी आतापर्यंत फक्त एकाच रुग्णाला कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता. लॉकडाऊननंतर तपासणीसाठी दवाखान्यात जास्त लोकही आले नाहीत. म्हणून सध्यातरी परिस्थिती इतकी जास्त गंभीरसुद्धा नाही. पण असं असलं तरी आपण दक्षता घेणं गरजेचं आहे."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























