कोरोना व्हायरस : मुंबई का बनलीये ‘कोविड-19’ चा हॉट स्पॉट?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मयंक भागवत
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी आता दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचं केंद्रही बनत चालली आहे. राज्यात सध्या बाधितांचा आकडा 635वर पोहोचला आहे, ज्यापैकी 377 रुग्ण एकट्या मुंबईतून आहेत, तर आताच्या घडीला 400 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण उपचार घेतायत.
एवढंच नव्हे तर कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 5,443 हायरिस्क कॉन्टॅक्ट्सना ट्रेस करून मुंबई महापालिकेने आयसोलेट आणि क्वारंटाईन केलंय.
मुंबईत कामानिमित्त अनेक परदेशी नागरिक येत असतात, शिवाय लाखो भारतीय नागरिक मुंबईतून परदेशी प्रवास करत असतात. याच प्रवाशांमुळे हा रोग देशात पहिल्यांदा जानेवारी महिन्यात तर राज्यात मार्च महिन्यात आढळून आला. आणि तिथूनच याचा प्रसार सुरू झाला.
गेल्या महिन्याभरात या परदेशवारीहून परतलेल्यांमुळे आता कोव्हिड-19 हळूहळू सामान्यांपर्यंत आणि अगदी मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्येही पोहोचलाय.
हा आजार पसरू नये म्हणून राज्य सरकारनं टप्प्या टप्प्यात मुंबईत लॉकडाऊन केली. मुंबईतल्या लोकल ट्रेन आणि बसने मोठ्या संख्येनं होणारा लोकांचा प्रवास सरकारसाठी डोकेदुखी ठरत होता. त्यामुळे आधी 17 मार्चपासून अंशतः झालेलं लॉकडाऊन 23 मार्चला संपूर्णपणे लागू करण्यात आलं. पण ठाकरे सरकारने सतत आवाहन करूनही लोकांनी प्रवास करणं बदं न केल्यामुळे अखेरीस लोकल ट्रेनही बंद करण्यात आल्या.

जसजसं स्क्रीनिंग आणि टेस्टिंगचं प्रमाण वाढत गेलं, तसतसा मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढू लागला. पण मुंबई महापालिका आणि राज्य सरकारसाठी खरी डोकेदुखी तेव्हा सुरू झाली जेव्हा मुंबईच्या झोपडपट्यांमधून कोव्हिड-19ची प्रकरणं समोर येऊ लागली. त्यामुळे मुंबईत काही कंटेनमेंट झोन तयार करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय.
मुंबई महापालिकेने जाहीर केलेलं कंटेनमेंट झोन
पूर्व उपनगरं
चीता कॅम्प, मानखुर्द, चेंबूर, गोवंडी आणि शिवाजीनगर, घाटकोपर (पश्चिम) पवई, हिरानंदानी आणि चांदिवली, मुलुंड (पूर्व), नाहूर, भांडूपचा काही भाग
पश्चिम उपनगरं
ओशिवारा, जोगेश्वरी (पूर्व आणि पश्चिम), अंधेरी, अंधेरी एमआयडीसी, वर्सोवा, विलेपार्ले, कलिना, सांताक्रुझ (पश्चिम), खार (पश्चिम), वांद्रे (पश्चिम), कुर्ला
मध्य मुंबई
वरळी, प्रभादेवी, अॅन्टॉप हिल, लोअर परळ, शिवडी आणि कॉटनग्रीनचा काही भाग
दक्षिण मुंबई
मलबार हिल, कंबाला हिल, ग्रॅन्ट रोड, नागपाडा, मस्जिद बंदर, गिरगाव
मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, कंटेनमेंट झोन जाहीर केलेल्या प्रत्येक विभागात कोव्हिड-19 चे रुग्ण आढळून आले आहेत.

धारावीत कसा पोहोचला कोरोना?
कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेले मुंबईतले काही भाग सरकारने कंटेनमेंट झोन जाहीर केले आहेत. मात्र, वरळी, प्रभादेवी, गोवंडी, चीता कॅम्प, कलिनासारखे परिसर हॉटस्पॉट आहेत.
वरळी कोळीवाड्यात 11 तर प्रभादेवी परिसरातील चाळीत 10 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. प्रभादेवीतील आदर्शनगर भागात 65 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, तर मुंबईतली सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत एका रुग्णाचा मृत्यू झालाय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
मुंबईच्या पूर्व उपनगरातील झोपडपट्यांमध्ये म्हणजेच चीता कॅम्प, मानखुर्द, चेंबूर, गोवंडी आणि शिवाजीनगर भागात हा व्हायरस प्रामुख्याने परदेशातून आलेल्या काही प्रवाशांमुळे पोहोचल्याचं समोर आलंय. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तसंच स्थानिक आमदार नवाब मलिक हेसुद्धा म्हणाले की मुंबईच्या पूर्व उपनगरातील जय भोलेनगर आणि विष्णूनगर परिसरात कोरोना व्हायरस परदेशातून आलेल्यांमुळे पोहोचल्याची प्राथमिक माहिती आहे.
"जय भोलेनगरमध्ये एका टॅक्सी ड्रायव्हरचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हा टॅक्सी ड्रायव्हर एअरपोर्टवरून परदेशी प्रवाशांची ने-आण करत होता. तर विष्णूनगर परिसरात घरकाम करणाऱ्या 65 वर्षीय महिलेला ती ज्या घरात काम करत होती, त्या ठिकाणी परदेशातून आलेल्या व्यक्तीमुळे कोरोनाची लागण झाली. मुंबई महापालिकेने हा परिसर सील केलाय," असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
धारावीत कोरोना पसरण्याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे, मात्र बालरोगतज्ज्ञ तसंच आरोग्यविषयक लेखक डॉ. अमोल अन्नदाते सांगतात, "परदेशातून भारतात आलेले काही भारतीय कोरोनाचं इन्फेक्शन घेऊन आले. या भारतीयांना क्वारंटाईन करण्यात आलं नव्हतं. होम क्वारंटाईनमध्ये असतानादेखील त्यांनी मुक्त संचार केला, त्यामुळे त्यांच्या घरी काम करणाऱ्या लोकांना याची लागण झाली आणि त्यामुळे हा व्हायरस झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने पोहोचला."
सायन-धारावी परिसरात गेली 35 वर्षं वैद्यकीय सेवा पुरवणारे डॉ. अनिल पाचणेकर सांगतात, "झोपडपट्टीत राहणारे लोक जास्त शिकलेले नसतात. गरिबीमुळे एकाच घरात 10-15 लोक राहतात. त्यामुळे एकाला संसर्ग झाला तर ते लगेचच पसरतो.
"काही समुदायांमध्ये आम्हाला काहीच होणार नाही, असा गैरसमज आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या स्थितीतही हे लोक नियम-कायद्यांचं योग्यरीत्या पालन करत नाहीत," असं पाचणेकर सांगतात.
गैरसमजुतीमुळे प्रसार झाला?
लोकांमध्ये केव्हिड-19बाबत असलेल्या गैरसमजुती आणि चुकीच्या माहितीमुळेही त्याचा प्रसार झाल्याचं जाणकार सांगतात.
"सेल्फ-आयसोलेश किंवा सोशल डिस्टन्सिंग लोक फॉलो करत नाहीत. लोक या आजाराला हलक्यात घेत आहेत. आम्हाला काहीच होणार नाही असा लोकांचा समज आहे. हेदेखील कोरोना पसरण्याचं एक कारण असण्याची शक्यता आहे," असं मुंबई महापालिकेचे उपायुक्त किरण दिघावकर सांगतात. दिघावकरांकडे सध्या मुंबईच्या धारावी परिसराची जबाबदारी देण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार कोरोना व्हायरस उष्ण आणि आर्द्र वातावरणातही पसरतो. तापमानाचा यावर काहीही परिणाम होत असल्याचे पुरावे मिळालेले नाहीत. याबाबत बोलताना संसर्गतज्ज्ञ डॉ. तृप्ती गिलाडा सांगतात, "लोकांमध्ये गैरसमज आहे की हा व्हायरस उष्ण तापमानात पसरणार नाही. हा गैरसमज आहे. आपल्याला या व्हायरसबाबत पहिल्यांदाच माहिती मिळते आहे, त्यामुळे त्याचा प्रसार कसा होईल, याबाबत काहीच ठोस सांगता येणार नाही. त्यामुळे उष्ण तापमानात आपल्याला काहीही होणार नाही, असा समज चुकीचा आहे. यामुळे आपलं नुकसान होणार आहे. त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडू नये."
संशयित रुग्णांवर सरकारची पाळत
राज्यात आरोग्य पथकांमार्फत क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजनेतून सर्वेक्षणाबरोबरच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 9 लाख लोकांचं ट्रेसिंग करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी एका ट्वीटद्वारे दिली.
तर शनिवारपर्यंत राज्यात 42,713 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2913 जणांना संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलंय, असं राज्य सरकारने सांगितलंय.

फोटो स्रोत, ANI
मुंबईतील वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येला आळा घालण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलत असल्याचं आरोग्यमंत्री टोपे म्हणाले. "मुंबईत आयसोलेशन आणि क्वारंटाईनमध्ये असलेल्या लोकांवर महापालिकेचे चार हजार कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. सर्व हाय रिस्क लोकांची आम्ही कोरोनाची तपासणी करतोय. गरज पडल्यास ड्रोन, GPS सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून हायरिस्क व्यक्ती आणि त्यांच्या निकटवरतीयांवर सुद्ध नजर ठेवू," त्यांनी सांगितलं.
"परदेश प्रवास किंवा कोरोनाग्रस्त रुग्णाशी थेट संपर्क नसलेले रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. ही गोष्ट खरी असली तरी यांची संख्या फार कमी आहे. महाराष्ट्र अजूनही संसर्गाच्या स्टेजमध्ये पोहोचलेला नाही," असं ते म्हणाले.
"मात्र मुंबईतील झोपडपट्टयांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखणं प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे. यासाठी झोपडपट्टीतील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना त्याच परिसरात जागा असल्यास किंवा दुसऱ्या ठिकाणी हलवण्याबाबत राज्य सरकार विचार करतंय," असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.
सरकार काय उपाय करतंय?
संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कंटेनमेंट झोनमध्ये पालिकेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्यात येत आहे. त्याचसोबतच लो-रिस्क कॉन्टॅक्टची फोनद्वारे माहिती घेतली जातेय.

फोटो स्रोत, ANI
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्दी टाळण्यासाठी मुंबईतल्या 5 हजार CCTV कॅमेऱ्यांच्या मदतीने प्रत्येक विभागावर लक्ष ठेवण्यात येतंय. तसंच मुंबईत महापालिकेच्या 210 हेल्थ पोस्ट सुरू करण्यात आल्या आहेत, त्याचबरोबर पालिकेच्या 186 डिस्पेन्सरीदेखील आहेत, म्हणजेच साधारण प्रत्येक किलोमीटरमागे एक हेल्थ सेंटर सुरू करण्यात आलंय.
झोपडपट्टीतील रहिवाशांचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अन्न-पाण्याची व्यवस्था. डॉ. अनिल पाचणेकर म्हणतात, "झोपडपट्टीसारख्या परिसरात प्रशासनाने डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायला हवं, गरिबांच्या पोटापाण्याची व्यवस्था करायला हवी. लोकांमध्ये तुम्ही सुरक्षित आहात याची भावना निर्माण करायला हवी, जेणेकरून लोक घराबाहेर पडणार नाहीत आणि संसर्गाचा मोठा धोका मुंबई शहरात निर्माण होणार नाही."

फोटो स्रोत, Getty Images
"कोव्हिड-19च्या जनजागृतीमुळे सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण डॉक्टरांकडे येत आहेत. सध्याच्या स्थितीत मी रोज 200पेक्षा जास्त रुग्ण तपासतोय. व्हायरल ताप आणि कोरोनाची लक्षणं मिळती-जुळती आहेत, त्यामुळे डॉक्टरांना आपल्या अनुभवावरून निदान करावं लागतं. ताप बरा होत नसेल तर त्यांनी छातीचा एक्स-रे काढून सरकारी रुग्णालयात पाठवलं पाहिजे," असा सल्ला इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष असलेले डॉ. पाचणेकर देतात.
पूर्व उपनगरांप्रमाणे मध्य मुंबईच्या वरळी कोळीवाडा आणि प्रभादेवी या भागातही झोपडपट्टीमध्ये कोरोना पसरल्याचं चित्र पहायला मिळतंय. याबाबत शिवसेनेचे माजी आमदार सुनील शिंदे म्हणाले, "वरळी आणि आदर्शनगर या भागात कोरोना व्हायरस कसा पसरला, याबाबत पालिका आणि आरोग्य यंत्रणा अद्यापही माहिती घेत आहेत. कोरोनाची लागण कोणामुळे झाली याचा शोध अजूनही सुरू आहे. कोळीवाड्यातील 170 तर आदर्शनगर मधील 30 लोकांना पालिकेने निरीक्षणाखाली ठेवलं आहे."

फोटो स्रोत, ANI
"गुरूवारी वरळीतील जिजामाता नगरचा भाग असलेल्या रमाबाई नगरमध्ये एका पालिका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. पालिकेने रमाबाई नगर सील करून घरोघरी चौकशी सुरू केली आहे. पालिकेने सील केलेल्या परिसरातील लोकांना अन्न-धान्य आणि जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय."
ज्या भागांमध्ये कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले, त्यामध्ये कंटेनमेंट ऑफिसरची नेमणूक करण्यात आलीये. कंटेनमेंट झोनमधील प्रत्येक गोष्टीवर पालिका अधिकाऱ्यांचं लक्ष आहे.
मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील इंटर्न डॉक्टरांना कोव्हिड-19 रुग्ण कसा हाताळायचा याचं ट्रेनिंग देण्यात येत आहे. जेणेकरून गरज पडल्यास यांचीदेखील मदत घेता येईल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























