कोरोना व्हायरस : नातेवाईकांनी फिरवली पाठ, मुस्लिमांनी दिला प्रेताला खांदा #5मोठ्याबातम्या

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Twitter/@zainabsikander

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या आहेत :

1) कोरोना व्हायरस : नातेवाईकांनी फिरवली पाठ, मुस्लिमांनी दिला प्रेताला खांदा

कोरोना व्हायरसशी लढताना माणुसकी किती घट्ट झालीय, याची प्रचिती उत्तर प्रदेशात दिसून आली. विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून नातेवाईकांनी अंत्यसंस्काराकडे पाठ फिरवली. मात्र, अशा कठीण काळात मुस्लीम बांधवांनी पुढे येत अंत्यसंस्कार केला. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.

बुलंदशहरमधील रविशंकर यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याच्या भीतीनं घरी येणं टाळलं. त्यामुळं अंत्यसंस्काराची मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र, शेजारील मुस्लीम बांधव पुढे आले आणि त्यांनी प्रेताला खांदा देण्यापासून पुढील सर्व अंत्यसंस्कार केले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी ट्विटरवरून या घटनेची दखल घेत, हीच खरी 'आयडिया ऑफ इंडिया' असल्याचं म्हटलं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासकीय-प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत, खबरदारी घेतली जात आहे. लोकांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहनही सरकारकडून केलं जातंय. त्याचाच एक भाग म्हणून सुख-दु:खाच्या कुठल्याच कार्यक्रमाला गर्दी न करण्यास सरकारकडून सांगण्यात आलंय.

कोरोना
लाईन

2) कोरोना व्हायरस: 'मी श्रीमंत नाहीय, पण अर्धी भाकर तरी गरजूंना देऊच शकतो'

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी देशभरातून अनेकजण मदतीचा हात पुढे करत आहेत. महाराष्ट्रातील नाशिकमधील शेतकऱ्यानं दाखवलेल्या दानशूरपणाचंही कौतुक सर्वत्र होतंय.

दत्ताराम पाटील या शेतकऱ्यांनं स्वत:च्या तीन एक जमिनीपैकी एक एकरावर पिकलेला गहू गरजूंना दान करण्यास सुरुवात केलीय. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

दत्ताराम पाटील

फोटो स्रोत, ANI

नाशिकमधील निफाड तालुक्यातील कसबे-सुकेणे या गावातली दत्ताराम पाटील हा शेतकरी असून, त्याची एकूण तीन एकराची शेती आहे.

द्राक्ष खुडे, शीतगृहे, निर्यात केंद्रं बंद असल्यानं मजुरांचे मोठे हाल होत आहेत. हे पाहून दत्ताराम पाटील यांनी स्वत:च्या शेतातली गव्हाची रास मजुरांसाठी खुली केलीय.

शेताजवळील वस्तीत हातमजुरांचे अनेक कुटुंब उपाशीपोटी राहत असल्याचे लक्षात आल्यानंतर आपण हा निर्णय घेतल्याचे पाटील सांगतात.

दत्ताराम पाटील यांच्या या दानशूरपणाचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दखल घेतली असून, त्यांनी पाटील यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारलीय.

3) कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लस शोधल्याचा हैदराबाद विद्यापीठाचा दावा

कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ आपापल्या परीनं प्रयत्न करत आहेत. हैदराबाद विद्यापीठातील प्राध्यपिकेनं या विषाणूला रोखण्यासाठी 'संभाव्य लस' (Potential Vaccine) बनवल्याचा दावा केलाय. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय.

डॉ. सीमा मिश्रा असे या प्राध्यापिकेचं नाव असून, त्या हैदराबाद विद्यापीठातील बायोकेमेस्ट्री विभागात कार्यरत आहेत.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

'T cell epitopes' अशा नावानं ही लस ओळखली जातेय. कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी ही लस सक्षम असल्याचा दावा हैदराबाद विद्यापीठानं केलाय.

तसंच, लस शोधण्यासाठी साधरणत: 15 वर्षांचा कालावधी लागतो, मात्र कॉम्प्युटेशनल टूलद्वारे ही लस केवळ 10 दिवसात बनवल्याचा दावाही हैदराबद विद्यापीठानं जारी केलेल्या पत्रकातून करण्यात आलाय.

4) EPF मधील पैसे काढण्यासाठी काही अटींसह परवानगी

कोरोना व्हायरसमुळं आरोग्यासह आर्थिक संकटही गडदत होताना दिसतंय. देशव्यापी लॉकडाऊनमुळं नोकरदार वर्ग तर अधिक अडचणीत सापडल्याचं दिसून आल्यानं केंद्रीय कामगार मंत्रालयानं EPF संदर्भात मोठं पाऊल उचललंय.

सुमारे सहा कोटी EPF खातेदार आपापल्या खात्यातून पैसे काढू शकतात. मात्र, त्यासाठी सरकारनं काही अटीही ठेवल्या आहेत. एबीपी न्यूजनं ही बातमी केलीय.

ईपीएफ

फोटो स्रोत, Getty Images

तीन महिन्याची बेसिक सॅलरी आणि महागाई भत्ता किंवा खात्यातील एकूण रकमेपैकी 75 टक्के रक्कम, यातील जी रक्कम छोटी असेल, ती काढता येईल. ही रक्कम परत करण्याची आवश्यकता नाहीय म्हणजेच नॉन-रिफंडेबल आहे.

28 मार्च 2020 पासून ही योजना लागू असेल, असं केंद्रीय कामगार मंत्रालयानं पत्रकात म्हटलंय. तसंच, ज्या कर्मचाऱ्यांनी रक्कम काढण्यासाठी अर्ज केला असेल, त्यावर तातडीनं कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आलेत.

5) होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या मुंबईतील 1200 प्रवाशांचा थांगपत्ताच नाही

कोरोना व्हायरसचे महाराष्ट्रातील आणि त्यातही मुंबई-पुण्यातील रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. हा चिंतेचा विषय असताना होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या 1200 जणांनी या चिंतेत आणखी भर घातलीय.

मुंबईत ज्यांना होम क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगण्यात आलं होतं, त्यातील 1200 प्रवासी सध्या कुठे आहेत, याचा काहीच थांगपत्ता नाही. त्यांना शोधण्याचं आव्हान मुंबई महापालिकेसमोर आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या 2200 प्रवाशांना त्यांच्या घरातच क्वारंटाईन करण्यात आलं होतं. मात्र, यातील 1200 जण कुठे आहेत, याचा शोधच महापालिकेला लागत नाहीय. या प्रवाशांनी फॉर्मवर दिलेला संपर्क क्रमांकही लागत नसल्याचं समोर आलंय.

केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार, मुंबई महापालिकेनं 16 मार्च रोजीच 24 डॉक्टरांचं पथक तयार करण्यात आलं होतं. एका पथकात आठ डॉक्टरांचा समावेश आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करणं या पथकाचं काम होतं.

या पथकानं तीन श्रेणींमध्ये प्रवाशांची विभागणी करून, काही प्रवाशांना होम क्वारंटाईनचा सल्ला दिला. मात्र, या प्रवाशांनी आता महापालिकेची डोकेदुखी वाढवलीय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)