कोरोना व्हायरस : लॉकडाऊनमध्ये हजारो मजुरांची शहर सोडून जाण्याची फरपट

शेकडो लोक

फोटो स्रोत, ANI

    • Author, प्रशांत चाहल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

उत्तर भारतात रोजंदारीवर काम करणारे, लहान-मोठा व्यवसाय करत असलेले अनेक बेघर नागरिक गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सोडून गावी जात असल्याचं दिसून येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन करणार असल्याचं गेल्या मंगळवारी जाहीर केलं होतं. लॉकडाऊनच्या काळात लोकांनी कोणत्याही स्थितीत घराबाहेर पडू नका, असं आवाहन केलं होतं. फक्त गरज भासल्यास जीवनावश्यक वस्तू आणि सेवांसाठी बाहेर पडण्यास सूट देण्यात आली होती.

कोरोनना व्हायरस पसरू नये यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंग यांसारख्या पर्यायाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलेला असतानाही दिल्लीच्या आनंदविहार परिसरात लोकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे.

लोकांना कोणत्याही परिस्थितीत आपापल्या गावी पोहोचायचं आहे. त्यामुळेच लॉकडाऊन असलं तरी त्यांनी आनंदविहार बसस्थानकाकडे कूच केलं. पण गावी जाण्यासाठीची सगळी वाहनं बंद असल्यामुळे मोठी गर्दी जमा झाली आहे.

कोरोना
लाईन

यामध्ये हरियाणाच्या पानिपत, करनाल, अंबाला, राजस्थानच्या जयपूर, अजमेर, अलवर, भरतपूर पंजाबमधील चंदीगढसह लुधियाना, जालंधर आणि देशभरातील इतर शहरांतील लोक आहेत. तसंच दिल्ली सोडून चाललेल्या लोकांमध्ये उत्तर प्रदेशच्या एटा, आग्रा, मथुरा, रामपूर, बरेली, हरदोई, अमरोहा इथल्या लोकांचा समावेश आहे.

दिल्लीच्या रस्त्यांवर दिसत असलेल्या शेकडोंच्या गर्दीत जवळपासच्या राज्यांमध्ये काम करणारे लोकही आहेत. लॉकडाऊननंतर या लोकांना नाईलाजाने आपापल्या घरी पलायन करावं लागत आहे.

शुक्रवारी संध्याकाळी औषधं घेण्यासाठी मला घराबाहेर पडावं लागलं. त्यावेळी बारीक पाऊस पडत होता. बहुतांश रस्ते निर्जन होते. पण दिल्लीच्या आनंद विहार बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर लोकांचे जत्थेच्या जत्थे दिसले. हे म्हणजे एखाद्या गावातील जत्रा पाहिल्यानंतर घरी परतणाऱ्या लोकांच्या गर्दीसारखंच दृश्य होतं.

लोक

फोटो स्रोत, ANI

पावसापासून स्वतःला वाचवण्यासाठी सगळी लोक मेट्रोच्या पुलाखालून अतिशय शिस्तीत एका रांगेतून पुढे-पुढे जात होते.

'मजुराला धर्म नसतो'

काही अंतर पुढे गेल्यानंतर लोकांचा एक मोठा समूह रेल्वे स्टेशनपासून दोन किलोमीटर आधी एका पुलाखाली जमा दिसला. याठिकाणची गर्दी पाहून सुरुवातीला कुणीतरी जेवण वाटत असल्याचं वाटलं.

पण खरंतर हातातलं सामान पावसाने भिजू नये, यासाठी लोकांनी पुलाखाली गर्दी केली होती. यादरम्यान जवळच उभ्या असलेल्या पोलिसांच्या गाडीचा लाल-निळा प्रकाश यांच्या चेहऱ्यावर पडलेला दिसला. या प्रकाशात लोकांच्या चेहऱ्यावरच्या हावभावांमध्ये एक अस्वस्थता दिसू शकत होती.

मज़दूर

या गर्दीची कोणतीच धार्मिक ओळख नसते. दिसतात तर फक्त अगतिक कुटुंबं, म्हातारे-कोतारे, लहान मुलं आणि दिव्यांग व्यक्ती. हे सगळे एका पिशवीत आपला संसार बांधून निघालेले आहेत.

इथं एक कुटुंब आम्हाला दिसलं. या कुटुंबात दोन मुलं आहेत. दोघांचंही वय पाच वर्षांपेक्षा जास्त नसेल. दोन्ही मुलांनी नवे कपडे घातलेले होते. बहतेक त्यांच्या आई-वडिलांनी एखाद्या कार्यक्रमात घरी जाताना वापरण्यासाठी शिवून घेतलेले असावेत.

लॉकडाऊन

सोबत आणलेल्या सामानाच्या बाजूला बसलेली त्यांची आई दोघांच्या चेहऱ्यावर बांधलेला रुमाल वारंवार नीट करत होती. पण त्याचवेळी आई-वडिलांकडे चेहऱ्यावर बांधण्यासाठी काहीच नव्हतं.

इथं लाल फ्रॉक घातलेली ती मुलगीसुद्धा होती. काही वेळापूर्वी गर्दीत डोक्यावर सामान घेऊन जाताना ती दिसून आली. ती आपल्या आईला कोणताच प्रश्न विचारत नव्हती. तर आई तिचे पाय दाबत होती.

मज़दूर

फोटो स्रोत, Reuters

लॉकडाऊनच्या काळात हे लोक पायीच निघाले आहेत. यामध्ये सलग तीन-चार दिवसांपासून चालत असलेले सुद्धा काही लोक आहेत.

यामध्ये रोजंदारीवर काम करणारा मजूर वर्ग आहे. बांधकाम कामगार आहेत. छोट्या दुकांनांमध्ये काम करणारे कामगार आहेत. रिक्षाचालक, मोलकरीण महिला यांसारखी लोक आहेत. दुसऱ्या शहरात राहण्यासाठी घर बांधू न शकलेला हा वर्ग आहे. काहींची कच्ची घरं होती. पण जेवण बनवण्यासाठी पैशांचा प्रश्न त्यांच्यासमोर होता.

जिथं ते काम करायचे. तिथल्या लोकांनीच जीव वाचवून पळ काढायला सांगितल्याचं गर्दीतील काहीजण म्हणतात. जीव वाचला तर पुन्हा बोलावून घेऊ, असं त्यांना सांगण्यात आलं आहे.

काहीजण म्हणाले, लॉकडाऊन कधीपर्यंत आहे ते माहीत नाही. सध्यातरी कामाचं काहीच सांगू शकत नाही. तर काही जणांनी मनाची लाज बाळगत त्यांना पैसे दिले. जमलं तर घरी जा, असं त्यांनी सांगितलं.

आपापल्या गावी जाण्याचं धाडस

या गर्दीतील बहुतांश लोक घाबरलेले आहेत. त्यांना फक्त आपल्या घरी जायचं आहे. त्यांना या स्थितीत आपल्या लोकांसोबत राहायचं आहे. तसंच कोरोन व्हायरसमुळे होणारा कोव्हीड-१९ हा शहरी आजार असल्याचं मानून त्यांना आपलं गाव सुरक्षित वाटत आहे.

पलायन करणाऱ्या लोकांची संख्या पाहिल्यास भीती वाटू शकते. पण रात्रीच्या अंधारात लांब पल्ल्याच्या प्रवासाला निघालेल्या या लोकांचा सहारा सरकार नाही तर देवच असल्याचं यांना वाटतं.

दिल्लीच्या आनंद विहार बस टर्मिनलवर अशी गर्दी होती

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, दिल्लीच्या आनंद विहार बस टर्मिनलवर अशी गर्दी होती

म्हणूनच चेहऱ्यावर चिंता दिसत असली तरी आपापल्या गावी जाण्याचं धाडस त्यांच्या मनात तयार झालं आहे.

रस्त्यात पोलीस, प्रशासन किंवा सरकारच्या वतीने कोणत्या प्रकारचं सहकार्य मिळालं आणि काय अडचणी आल्या, याबाबत अनेकांना काहीच बोलायचं नाही. सरकारने गेल्या काही दिवसांत कोणत्या घोषणा केल्या. सध्या त्यांची काय स्थिती आहे. याची माहितीसुद्धा अनेकांना नाही.

गर्दी

काळजीपोटी घरी निघालेल्या या लोकांमध्ये माहितीचा अभाव किती आहे, हे त्यांच्याशी बोलल्यानंतर कळतं. फक्त मनात उमेद घेऊन ते निघाले आहेत

एका बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर थांबलेल्या लोकांना पुढे काहीतरी सोय होईल, अशी अपेक्षा आहे.

एका माणसाला मी सांगितलं की पुढे तुम्हाला काहीच मिळणार नाही. तेव्हा त्यांनी विचारलं, पोलीस थांबवत तर नाहीत ना?

फाळणीच्या वेळची दृश्यं

ते उत्तर प्रदेशच्या एटाला जात होते. गर्दीतील अनेक जण दिल्ली ते बिहार चालत जाण्याबाबतही बोलत होते.

शुक्रवारी रात्री कित्येक हातगाडीचालक दिल्ली पार करून गेले. त्यांच्या हातगाडीवर काही सामान होतं. त्यावर काही लोक बसलेले होते.

फाळणी

फोटो स्रोत, ANI

हे दृश्य भारत-पाकिस्तानच्या फाळणीच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोंशी मिळतंजुळतं वाटतं. तेव्हासुद्धा आपण अशा अगतिक लोकांच्या जत्थ्याला या पद्धतीने स्थलांतर करताना पाहिलं आहे.

पण ज्या परिस्थितीत हे लोक रस्त्यावरून निघाले आहेत. त्यांना रोखणं सध्यातरी कठीण वाटतं.

पण महामारीपासून लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत असलेल्या सरकारला लवकरात लवकर यांच्या आयुष्याबाबत विचार करावा लागेल. तेव्हाच त्यांचा प्रवास योग्य ठिकाणी थांबू शकेल.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, , ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)