कोरोना व्हायरस : उद्धव ठाकरे यांची घोषणा - महाराष्ट्रात कोरोना हेल्पलाईन सुरू

फोटो स्रोत, CMO Maharashtra
कोरोना व्हायरससंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री उशिरा फेसबुक लाईव्हद्वारे जनतेला आश्वस्त केलं की अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. सोबतच कोरोना व्हायरस संबंधीच्या शंका दूर करण्यासाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मध्यरात्री 12 वाजल्यापासून देशभरात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून संदेश दिला.
तेव्हा त्यांनी सांगितलं की ते मोदींच्या भाषणानंतर त्यांच्याशी फोनवरून बोलले आणि त्यांच्या महाराष्ट्रातील परिस्थितीची माहिती दिली. "माझे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याशी बोलणे झाले. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले जे नियम आहेत ते तसेच राहतील. जीवनावश्यक सोयी व सुविधा सुरूच राहतील. कोणीही गोंधळू नये, घाबरु नये आणि रस्त्यावर, दुकानात बाजारपेठेत गर्दी करू नये," असं त्यांनी एका ट्वीटमध्ये सांगितलं.
"उगाच बाजारात गर्दी करू नका, घाबरून जाऊ नका. संपूर्ण महाराष्ट्रात आपण तसंही लॉकडाऊन केलं आहे, त्यामुळे ज्या जीवनावश्यक वस्तू यापुढेही मिळत राहतील," असं त्यांनी नंतर जनतेला दिलेल्या संदेशात म्हटलं.

संकट गंभीर आहे, त्यामुळे काळजी घ्या, असंही त्यांनी सांगितलं. सोबतच जनतेच्या शंकांचं निरसन करण्यासाठी एक व्हॉटस्अॅप चॅटबॉटची घोषणा केली. तो नंबर आहे - +91 2026127394.

- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात

यापूर्वीही मंगळवारी संध्याकाळी राज्यातील जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी "संकट गंभीर असलं तरी सरकार खंबीर आहे," असं म्हणत जनतेला धीर दिला होता.
आपण जगणं थांबवलेलं नाही, फक्त त्याची शैली बदलली आहे. पोलिसांनी धाड टाकून मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई केली. मी आज काहीही बंद करायला आलेलो नाही असं ते म्हणाले. नागरिकांनी या आजाराचं गांभीर्य ओळखून घरातच राहावं असंही त्यांनी सांगितलं.
कोरोना व्हायरस: उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- आज (24 मार्च) रात्रीपासून देशांतर्गत विमानसेवा बंद केली जाईल.
- चाचणीसाठी प्रयोगशाळांच्या वाढीची विनंती केंद्र सरकारला केली होती. ती विनंती केंद्रानं मान्य केलीय.
- शेतमजुरांना शेतावर येणं-जाणं बंद केलेलं नाही, अन्नधान्याची वाहतूक बंद नाही, शहरांमधील जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक बंद नाही.
- टेहळणी करायला, फेरफटका मारायला बाहेर पडू नका. घरात राहा, सुरक्षित राहा.
- महाराष्ट्रात अन्नधान्याचा पुरेसा साठा आहे. वाहतूक आणि वितरण व्यवस्था सुरळीत ठेवण्याबाबतही सूचना दिल्या आहेत.
- अनेक संस्था मदतीसाठी पुढे येतायेत. त्यांच सर्वांचं मी स्वागत करतो.
- सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. पण कृषी वस्तूंची वाहतूक थांबवली नाही.
- जर अत्यावश्यक सेवेतील लोकांना वाहतुकीला अडचण येत असेल तर त्यांनी १०० नंबरला फोन करा पोलीस सहकार्य करतील.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























