कोरोनाच्या विळख्यातून आपण बाहेर कधी पडणार?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने वाढतोय असं म्हटलं जातंय. पण नेमका किती वेगाने प्रसार होत आहे याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करत आहेत. WHO ने म्हटलंय की विषाणूचा प्रसार तीव्रतेने होत आहे.
कोरोना व्हायरस रुग्णांचा आकडा एक लाख होण्यासाठी 67 दिवस लागले. मग 11 दिवसातच रुग्णांची संख्या 1 लाखने वाढले, मग फक्त 4 दिवसातच रुग्णांच्या संख्येत एका लाखाने भर पडली, असं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अॅडानॉम गेब्रेयेसूस यांनी म्हटलं आहे.

- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात

सध्या आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्यात आल्या आहेत. भारतामध्ये मोठ्या शहरात संचारबंदी करण्यात आली आहे. बहुतेक लोकांना घरूनच काम करण्यास सांगितलं आहे.
देशभरात लॉकडाउनची परिस्थिती ओढावली आहे. त्यावेळी अनेक जण असा प्रश्न विचारत आहेत की हे सर्व कधी संपणार?
बीबीसीचे आरोग्य प्रतिनिधी जेम्स गॅलाघर यांनी या प्रश्नाचा आढावा घेतला आणि आपण यातून सहीसलामत बाहेर कसं येऊत यासाठी तीन उपाय सुचवलेत.
लसीकरण
लसीकरणाने बरेच प्रश्न सुटतील, लोकांचा त्रास वाचेल, नवीन केसेसमध्ये भर पडणार नाही असं म्हटलं जात आहे. पण ही लस तयार होऊन सर्वांसाठी उपलब्ध होण्यासाठी किमान 12-18 महिन्यांचा कालावधी लागू शकतो असं तज्ज्ञ सांगतात.

फोटो स्रोत, EPA
ब्रिटनमधल्या इंपीरियल कॉलेजच्या साथीच्या रोगांच्या विभागातही कोरोना विषाणूच्या लशीवर काम सुरू आहे. या विभागाचे प्रा. प्राध्यापक रॉबिन शटॉक सांगतात, "आधी लस तयार करायची म्हटलं तर त्यावर संशोधन करून, चाचणी घेऊन ती सर्वसामान्यांना उपलब्ध करून देईपर्यंत 10 वर्षांहून अधिक काळ लागायचा. पण सध्या आम्ही ज्या तंत्रज्ञानावर काम करतोय ते तंत्रज्ञान आपला वेळ वाचवणारं आहे. आम्ही ज्या पद्धतीने काम करत आहोत त्यानुसार ही लस काही महिन्यांत तयार होऊ शकते."
कितीही लवकर म्हटलं तरी सर्व प्रक्रियेतून मंजूर झालेली लस सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध होण्यासाठी किमान 18 महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असं संशोधक सांगतात.
समुदायाचीच रोगप्रतिकारक क्षमता वाढणं
या संकटातून बाहेर पडण्याचा एक मार्ग हर्ड इम्युनिटी आहे, असं काही तज्ज्ञ सांगत आहेत, पण यासाठी किमान दोन वर्षांचा वेळ लागू शकतो असा त्यांचा अंदाज आहे.

फोटो स्रोत, Getty Images
हर्ड इम्युनिटी म्हणजे एखादा संसर्गजन्य रोग झपाट्याने वाढतो आणि त्यातून अनेक जण आपोआप बरे होऊ लागतात. कारण त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढलेली असते. त्यालाच हर्ड इम्युनिटी म्हणतात, पण हे होण्यासाठी किमान दोन वर्षं तरी लागतील, असं इंपीरिअल कॉलेजचे प्रा. नील फर्ग्युसन सांगतात.
चाचण्या वाढवणं आणि आयसोलेशन करणं
आपल्या वागण्यामध्ये बदल घडवणं आणि या रोगाबाबतचा आपला दृष्टिकोन बदलणं हा देखील एक उपाय असू शकतो, पण हे केव्हा संपणार याबाबत निश्चितता नाही असं युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग येथील संसर्गजन्य रोगांचे प्राध्यापक डॉ. मार्क वुलहाउस सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
यामध्ये सर्वांत महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे संसर्गाचं प्रमाण आटोक्यात आणणं. कोरोनाग्रस्त लोक कोण आहेत हे ओळखून त्यांना आयसोलेट करत गेल्यास संसर्गाची साखळी तुटू शकते.
फ्लॅटनिंग ऑफ द कर्व्ह म्हणजे काय?
समजा जर रुग्णांची संख्या खूप अधिक असेल तर आरोग्य यंत्रणेवर अधिक तणाव पडू शकतो. त्यावेळी ग्राफवर लाट उसळली आहे की काय असं तुम्हाला दिसेल.

फोटो स्रोत, Getty Images
तर रुग्णांचं प्रमाण आपल्या आरोग्य व्यवस्थेच्या तुलनेत संतुलित ठेवणं आणि नंतर रुग्णांचं प्रमाण कमी करत जाणं यालाच फ्लॅटनिंग ऑफ द कर्व्ह म्हणतात.
या देशांकडून काय शिकण्यासारखं आहे?
युरोपमधील स्थिती हाताबाहेर गेलेली दिसत असतानाच आशियाचं उदाहरण घ्यावं असं देखील म्हटलं जात आहे. पाश्चिमात्य देशांनी एशियन देशांकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे असं बीबीसी प्रतिनिधी हेलियर च्युएंग यांना वाटतं. चीन, सिंगापूर, दक्षिण कोरियाने कोणती योग्य पावलं उचलली आहेत याची चर्चा या लेखात आहे.
दक्षिण कोरियात भरपूर चाचण्या घेतल्या जात आहेत आणि त्याही मोफत. द. कोरियात दिवसाला 20,000 जणांची चाचणी घेण्यात येत आहे. जास्त चाचण्या म्हणजे वेळीच रुग्ण कोण आहे हे ओळखणं आणि एकदा का रुग्ण ओळखला की त्याला आयसोलेट करता येणं सोपं. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ नियंत्रणात आणणं असं हे गणित आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सिंगापूरमध्ये तर सरकारने गुप्तहेरांच्या मदतीने 6,000 हून अधिक लोकांना ट्रेस केलं आणि त्यांची चाचणी करून घेतली. ज्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली त्यांना वेगळं ठेवण्यात आलं.
चीनमध्ये गेल्या काही दिवसांत स्थानिक केसेसमध्ये वाढ होत नसल्याचं पाहून गिझोऊ प्रांतात तर पुन्हा शाळा उघडण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी प्राणीसंग्रहालय देखील उघडण्यात आली आहेत.
22 मार्च रोजी जनता कर्फ्यूनंतर अनेक जण थाळ्या वाजवून रस्त्यावर दिसले. सर्वांनी लॉकडाऊन गांभीर्याने घ्या असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. सिंगापूरमध्ये जर सरकारने सांगितलेली सूचना पाळली नाही तर तिथे अटक देखील होते.
आपण कोरोनाच्या संकटातून नक्की केव्हा बाहेर येऊत हे कुणीच ठामपणे सांगू शकत नाहीत. पण तोपर्यंत जागतिक आरोग्य संघटनेनी सांगितलेल्या गोष्टी जसं की हॅंड हायजिन पाळणं, सोशल डिस्टंन्सिंग सर्व गोष्टी आपण पाळायल्या हव्यात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























