कोरोना व्हायरस : संसर्गापासून बचावासाठी हात तर धुवायचेत, पण पाणी कोठून आणू?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जान्हवी मुळे आणि स्वामिनाथन नटराजन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
22 मार्च म्हणजे जागतिक जल दिन. जगभरातल्या पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधून घेणारा दिवस. यंदा या दिवसाचं महत्त्व आणखी वाढलं आहे, कारण उन्हाळ्याच्या तोंडावरच कोरोना विषाणूची साथ पसरली आहे.
'हे सगळं ठीक आहे, पण एवढं पाणी कुठून आणायचं?' लातूरजवळच्या गावात राहणाऱ्या एका शेतकऱ्यानं बीबीसी न्यूज मराठीच्याच एका बातमीवर मला पाठवलेल्या या प्रश्नानं मी खरंच विचारात पडले. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी हात नळाखाली स्वच्छ कसे धुवायचे, हे दाखवणारा तो व्हीडिओ होता.
हात स्वच्छ धुवा, वारंवार धूत राहा असा सल्ला जगभरातले तज्ज्ञ देतायत. पण जिथे वर्षानुवर्ष दुष्काळ पडतो, अशा गावात राहणाऱ्याला तेवढं पाणीही वाया जाणार अशी काळजी वाटत होती आणि ती स्वाभाविकही आहे.
आजही देशातल्या कित्येक गावांत नियमित पाणीपुरवठा होत नाही आणि अनेकांसाठी हात धुवायला साबण ही देखील चैनीची गोष्ट आहे, हे वास्तव आहे.
भारतातली पाणीटंचाई किती मोठी?
'भारत सध्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या पाणीसंकटाचा सामना करतो आहे आणि लाखो लोकांचं जगणं त्यामुळे धोक्यात आहे. सध्या सहा कोटी लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे आणि दरवर्षी पाण्याअभावी दोन लाख लोकांचा मृत्यू होतो.'
ही आकडेवारी केंद्र सरकारच्याच 'नीती' (NITI) आयोगानं जून 2018 मध्ये प्रकाशित केलेल्या कॉम्पोझिट वॉटर मॅनेजमेंट इंडेक्समधली आहे. नीती आयोगाच्या त्या अहवालाचा गोशवारा याच वाक्यांनी सुरू होतो. गेल्या काही वर्षांत या परिस्थितीत खूप मोठा बदल झालेला नाही, हे मराठवाड्यात दरवर्षी जाणवणारी पाणीटंचाई पाहिल्यावर जाणवतं.

- वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग; पाहा सर्व ताजे अपडेट्स
- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - मुंबईत लोकल ट्रेनमध्ये कसा रोखणार कोरोना व्हायरस?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?

पण मुंबईसारख्या मुबलक पाणी असणाऱ्या शहरातही अनेक लोक स्वच्छ आणि पुरेशा पाण्यापासून वंचित आहेत. त्यातले बहुतेकजण दाटीवाटीनं वसलेल्या घरांत राहतात, जिथे धड उजेड आणि हवाही पोहोचू शकत नाही, ना सांडपाण्याचा निचरा करणारी व्यवस्था असते. त्यामुळंच अशा वस्त्यांमध्ये एखाद्या रोगाची साथ लवकर पसरण्याची शक्यता असते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
'हात धुवायला पाणी कुठून आणणार?'
"स्वयंपाकासाठीही पाणी नसतं, तर सतत हात धुवायला पाणी कुठून आणणार आणि ते कोण भरणार?" असं अनिशा सांगते. ती मुंबईच्या पूर्वेकडच्या मंडाळा भागातल्या वस्तीत राहते.
"आमच्या दोन खोल्यांच्या घरात सहा माणसं राहतात. मी घरात असते, म्हणून पाणी भरायचं काम माझं. सहाजणांनी एक-दोनदा हात धुतले तरी बादलीभर पाणी संपेल." अशी काळजी वाटणारी अनिशा एकटी नाही.
मुंबईतला पाणी प्रश्न नेमका किती मोठा आहे, याविषयी पाणी हक्क समितीचे सीताराम शेलार माहिती देतात, "मुंबई शहरात सुमारे 12 टक्के म्हणजे 20 लाख लोक पाण्यापासून वंचित आहेत. यातील बहुतेकजण वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये राहतात. त्यात गटार साफ करणारे, रिक्षा चालवणारे, घरकाम करणारे अशा श्रमिक नागरिकांचा समावेश आहे."

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईच्या विकासात या सर्वांचा मोठा वाटा आहे, पण तेच लोक पाण्यापासून वंचित आहेत, असं ते सांगतात. "या श्रमिक लोकांनी कोरोना विषाणूची साथ पसरल्यावर जगायचं की मरायचं?" असा प्रश्न ते विचारतात.
मुंबईतल्या अशा पन्नासहून अधिक वस्त्यांची यादी पाणी हक्क समितीनं शासनाकडे पाठवली आहे आणि तिथे हात धुण्यासाठी किमान तात्पुरती व्यवस्था केली जावी, अशी विनंती केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
केरळमध्ये अनेक ठिकाणी अशा वॉशबेसिन्स बसवण्यात आल्या आहेत.
'पाणी आहे, पण पुरत नाही'
मुंबई महापालिकेच्या संपर्क अधिकाऱ्यांशी आम्ही संपर्क साधला. त्यांनी वस्त्यांच्या यादीवर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र अधिकृत वस्त्यांना पाणी पुरवलं जात असल्याचं सांगितलं.
"महापालिकेनं झोपडपट्टीतही पाणी दिलेलं आहे. दहा घरांमागे एक सार्वजनिक नळ. मुंबईला पाणीपुरवठा होतो, त्याचे तास आम्ही आखून दिले आहेत. एका भागात पाणी पुरवलं जात असेल तेव्हा दुसऱ्या भागात थांबवावं लागतं. 24 तास पाणी कुठेच दिलं जात नाही."
पण ज्या वस्त्यांत असे सार्वजनिक नळ आहेत, तिथेही अनेकदा पाण्याच्या वेळा गैरसोयीच्या असतात.
मुंबईत गोवंडीच्या बैंगनवाडी वस्तीमध्ये राहणारी अंजुम शेख सांगते, की तिच्या वस्तीमध्ये पहाटे चार वाजता पाणी येतं. म्हणजे एखाद्या दिवशी झोप लागली, तर पाणी मिळणार नाही.
"पाणी येतं तेही एक तास आणि बारा घरं त्या नळावर पाणी भरतात. म्हणजे प्रत्येकाला जेमतेम 4-5 मिनिटंच पाणी भरता येतं. मग त्यावरच भागवावं लागतं. अंघोळी, कपडे धुणं, टॉयलेटसाठी तेच पाणी वापरावं लागतं. आमच्या घरी आम्ही दोघंच राहतो, पण बाकीच्या घरांत कुठे सात-आठ जणही राहतात.?"
पाणी भरून ठेवावं लागत असेल आणि घरात टाकी किंवा नळाची सोय नसेल, तर हात स्वच्छ धुणार कसे? हा प्रश्नच असतो. अंजुम सांगते, "एकदा हात धुवायचे तर मग्गाभर पाणी लागतं. पिण्यासाठीही पाणी पुरत नाही, तर हात कुठून धुणार?"

फोटो स्रोत, Getty Images
वस्तीत सार्वजनिक स्वच्छतागृह आहेत पण घराघरातलं सांडपाणी वाहून नेणारी गटारंही नीट नाहीत, याकडे ती लक्ष वेधून घेते. मग हात धुतल्यावर पाणी वाहून कुठे जाईल?
चेन्नईच्या सधन भागांतही पाणीटंचाई
मुंबईत झोपडपट्टी आणि वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या 60 लाखांहून अधिक असल्याचा अंदाज आहे. 2011 सालच्या जनगणनेनुसार मुंबईत 41 टक्के लोक अशा वस्त्यांमध्ये राहतात. तर जगभरातल्या शहरी लोकसंख्येपैकी सरासरी तीस टक्के म्हणजे सुमारे एक अब्ज लोक झोपडपट्टीत राहतात.
केनियाची राजधानी नैरोबीमध्ये मुकुरू नावाच्या झोपडपट्टीत सॅलेस्टीन एडियाम्बो त्यांचे पती आणि सहा मुलांसह राहतात. सगळं कुटुंब एका खोलीच्या घरात राहतं, जिथे पाण्याचा नळ आणि वीजेचं कनेक्शन नाही.
"घरात एवढी कमी जागा आहे, की मुलं फार हलूही शकत नाहीत, नाहीतर एकमेकांशी टक्कर होते. जर कुणी आजारी पडलं, तर एका मुलाला दुसऱ्यांपासून वेगळं ठेवणं शक्य होणार नाही. सरकारला हवं, तर त्यांनी संसर्ग झालेल्या व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये न्यावं" असं त्या बीबीसीशी बोलताना म्हणाल्या.
जगभरात बेघर लोकांचं प्रमाणही मोठं आहे आणि जगातल्या सर्वात श्रीमंत शहरांचाही त्याला अपवाद नाही.
पण केवळ झोपडपट्ट्यांमध्येच पाणीटंचाईचं संकट आहे, असं नाही. दक्षिण आफ्रिकेचं जोहान्सबर्ग असो वा भारतातलं चेन्नई या दोन्ही शहरांमधलं पाणी गेल्या वर्षी जवळपास संपलं होतं.
त्यावेळी चेन्नईच्या उपनगरांत राहणाऱ्या शांती सशिंद्रनाथ यांच्या परिवाराला तहान भागवण्यासठी 50 किलोमीटवरच्या शेतातल्या विहीरीतून पाणी आणावं लागलं होतं. "गेल्या वर्षीसारखी परिस्थिती उद्भवली, तर सतत हात धुण्यासाठी पाणी जमा करणं कठीण होऊन जाईल. शहरात सार्वजनिक शौचालयं कमी आहेत. पाण्याचा पुरवठाही मर्यादित आहे आणि लोक सार्वजनिक आरोग्याविषयी साध्या सूचनांचं पालनही करत नाहीत."
कोरोना विषाणू आणि त्यामुळं होणाऱ्या कोव्हिड-19 या आजाराची साथ पसरू लागल्यावर तरी लोक स्वच्छतेविषयी जागरूक होतील अशी आशा व्यक्त केली जाते आहे. पण जिथे स्वच्छतेसाठी आवश्यच प्राथमिक सुविधा नाहीत, अशा वस्त्यांमधले लोक काय करणार हा प्रश्न मात्र कायम आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























