You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : 1918 साली आलेल्या फ्लूच्या साथीनं जेव्हा मुंबईकर हवालदिल झाले होते...
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
जगण्याची इच्छाच संपून गेलीये...फ्लूच्या गंभीर आजाराशी सामना करणाऱ्या महात्मा गांधींनी 1918 साली गुजरातमधल्या आपल्या एका जवळच्या व्यक्तीशी बोलताना या भावना व्यक्त केल्या होत्या.
48 वर्षांच्या गांधींच्या गुजरातमधल्या आश्रमात संसर्गजन्य स्पॅनिश फ्लूची साथ पसरली होती. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून परतल्याला 4 वर्षं उलटून गेली होती.
त्यांच्या आयुष्यातल्या या पहिल्या प्रदीर्घ आजारपणात त्यांनी आराम केला आणि फक्त पातळ पदार्थांचं सेवन केलं. त्यांच्या आजारपणाची वार्ता पसरल्यानंतर एका स्थानिक वर्तमानपत्राने लिहिलं होतं, "गांधीजींचं आयुष्य हे फक्त त्यांच्या एकट्याचं नाही - संपूर्ण भारताचं आहे."
जून 1918 मध्ये मुंबईला परतणाऱ्या सैनिकांच्या बोटीवर या फ्लूची मोठ्या प्रमाणात लागण झाली आणि तिथून हा आजार भारतभर पसरला. आरोग्य अधिकारी जे. एस. टर्नर यांनी लिहिलं होतं, "हा आजार रात्री येणाऱ्या चोरासारखा झपाट्याने आणि कपटी हेतूने आला."
सप्टेंबर महिन्यात दक्षिण भारतात या साथीची दुसरी लाट आली आणि सगळ्या किनारपट्टीवर आजार पसरला.
- वाचा -कोरोना व्हायरस : शुभमंगल आता जरा जास्तच 'सावधान'
- वाचा -तुम्ही घरात राहूनच कोरोना व्हायरसवर अशी करू शकता मात
- वाचा -कोरोना व्हायरस : वाचण्याची शक्यता असलेल्यांवरच होत आहेत उपचार
- वाचा-चीनमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग कसा आला आटोक्यात?
- वाचा- कोरोना व्हायरस असं पोखरतो रुग्णाचं शरीर
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - मुंबईत लोकल ट्रेनमध्ये कसा रोखणार कोरोना व्हायरस?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?
इन्फ्लूएन्झा म्हणजेच फ्लूच्या या साथीमध्ये तेव्हा 1.7 ते 1.8 कोटी भारतीयांचा बळी गेल्याचा अंदाज आहे. म्हणजेच हे प्रमाण पहिल्या महायुद्धातल्या बळींपेक्षाही जास्त होतं. भारताच्या तेव्हाच्या लोकसंख्येच्या जवळपास 6% जण या साथीत मारले गेले. यामध्ये महिलांचं प्रमाण पुरुषांच्या तुलनेत जास्त होतं. कारण त्या कुपोषित होत्या. कोंदट, हवा खेळती न राहणाऱ्या वातावरणात त्यांना राहावं लागत होतं.
घरातल्या आजारी व्यक्तींची काळजीही याच महिला घेत होत्या. जगातल्या त्यावेळेच्या लोकसंख्येच्या तुलनेत एकूण 33 टक्के लोकांना
त्यावेळी जगभरातील एकूण लोकसंख्येच्या 33 टक्के लोकांना याचा संसर्ग झाला होता आणि यामुळे 5 ते 10 कोटी लोकांचा बळी गेला होता.
सुदैवाने गांधीजी आणि त्यांचे सहकारी या तापातून बरे झाले. पण उत्तर भारतातल्या कोरड्या पडलेल्या गावात राहणारे प्रसिद्ध हिंदी कवी आणि लेख सूर्यकांत त्रिपाठी ऊर्फ निराला यांची पत्नी आणि कुटुंबातले अनेक सदस्य या फ्लूच्या तापात दगावले.
निराला लिहितात, 'पापणी लवताच जणू ते नाहीसे झाले.' गंगा नदीचं पात्र मृतदेहांनी भरल्याचंही त्यांनी लिहून ठेवलंय. मृतदेहांची संख्या वाढत होती आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुरेसं सरण उपलब्ध नव्हतं. या अडचणीत भर म्हणजे मान्सून पुरेसा न झाल्याने दुष्काळ पडला. परिणामी लोकांची उपासमार झाली आणि लोक खंगले. लोंढेच्या लोंढे शहरात आले आणि फ्लूची साथ झपाट्याने पसरली.
तेव्हाच्या आणि आताच्या वैद्यकीय परिस्थितीत फरक आहे. पण रोगावर इलाज मात्र अदयाप उपलब्ध नाही.
1918 चा फ्लू आला तेव्हा 'अँटीबायोटिक्स' उपलब्ध नव्हती आणि गंभीररीत्या आजारी असणाऱ्यांना सेवा द्यायला पुरेशी वैद्यकीय यंत्रणाही अस्तित्वात नव्हती. भारतीयांनी तोपर्यंत पाश्चिमात्य औषधांचा स्वीकार मोठ्या प्रमाणावर केलेला नव्हता आणि म्हणूनच उपचारांसाठी बहुतेकजण हे देशी औषधींवर अवलंबून असत.
असं असलं तरी एका शतकाच्या अंतराने झालेल्या या दोन्ही रोगांच्या साथीमध्ये काही साम्य आहे. शिवाय या फ्लूच्या साथीतून आणि या साथीला देण्यात आलेल्या अपुऱ्या प्रत्युत्तरातूनही काही शिकण्यासारखं आहे.
मुंबईच्या गर्दीत साथीचा फैलाव वेगानं
मुंबईमध्ये तेव्हाही गर्दी होती. मुंबईच्या या गर्दीतूनच या साथीचा मोठा फैलाव झाला होता. तसंच होण्याची भीती आता तज्ज्ञ (Virologist) व्यक्त करत आहेत. 2 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेलं मुंबई शहर हे महाराष्ट्रातलं आणि देशातलं सर्वात जास्त लोकसंख्येचं शहर आहे. आजच्या घडीला महाराष्ट्रातल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या देशात सर्वाधिक आहे.
1918 चा जुलै उजाडेपर्यंत या फ्लूच्या साथीमुळे रोज 230 जणांचा बळी जात होता. 1918 च्या जूनच्या तुलनेत हे प्रमाण तिप्पट होतं.
'टाईम्स ऑफ इंडिया'ने तेव्हा दिलेल्या बातमीत म्हटलं होतं, "या फ्लूची मुख्य लक्षणं आहेत प्रखर ताप आणि पाठदुखी. तीन दिवस हा त्रास राहतो. मुंबईतल्या जवळपास प्रत्येक घरात कोणी ना कोणी या तापामुळे आजारी पडलंय."
या काळात कर्मचारी ऑफिस आणि कंपन्यांपासून दूर राहिले. युरोपियन नागरिकांपेक्षा शहरातल्या भारतीय लहानथोरांना या आजाराची जास्त लागण झाली होती.
घराबाहेर वेळ न घालवता घरातच थांबावं असा सल्ला वर्तमानपत्रातून वाचकांना देण्यात आला होता. 'आराम करणे आणि काळजी न करणे हाच यावरचा मुख्य इलाज' असल्याचं टाईम्स ऑफ इंडियाने लिहिलं होतं. हा आजार मुख्यतः एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे नाका-तोंडातून उडणाऱ्या तुषारांद्वारे पसरत असल्याचं' लोकांना वारंवार सांगण्यात येत होतं.
"संसर्ग होऊ नये म्हणून जत्रा, सण - समारंभ, नाट्यगृह, शाळा, सार्वजनिक सभा, सिनेमा, मेजवान्या, रेल्वे स्थानकं अशा गर्दीच्या ठिकाणांपासून दूर रहावं, हवा खेळती नसलेल्या खोलीत झोपण्याऐवजी खुल्यावर वा मोकळ्यावर झोपावं, सकस आहार घ्यावा आणि व्यायाम करावा, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या रोगाची फार जास्त काळजी करू नये, " असं 'टाईम्स ऑफ इंडिया'त म्हटलं होतं.
नेमकी लागण कोणामुळे?
या संसर्गाची सुरुवात नेमकी कुठून झाली याबाबत ब्रिटीश अधिकाऱ्यांमध्ये मतभेद होते. मुंबईच्या धक्क्याला लागलेल्या बोटीवरच्या लोकांद्वारे मुंबईत हा ताप आला असं आरोग्य अधिकारी टर्नर यांचं म्हणणं होतं. तर या बोटीवरच्या लोकांना मुंबईत आल्यावरच तापाची लागण झाली, असं सरकारचं म्हणणं होतं.
"भारतामध्ये येणाऱ्या आणि ब्रिटीश सरकारला काबूत आणता न येणाऱ्या प्रत्येक साथीमागे 'अस्वच्छ भारतीय' असल्याचं कारण ब्रिटीश सरकारी यंत्रणा नेहमीच देत," वैद्यकीय इतिहासकार मृदुला रामण्णा यांनी त्यांच्या 'हाऊ बॉम्बे कोप्ड विथ द पँडेमिक' या अभ्यासात म्हटलं होतं.
यानंतर एका सरकारी अहवालामध्ये भारतीय सरकारच्या परिस्थितीविषयी खेद व्यक्त करण्यात आला आणि यामध्ये विस्तार करण्याची आणि सुधारणांची गरज व्यक्त करण्यात आली.
आणीबाणीच्या काळातही ब्रिटीश अधिकारी हिल स्टेशनला होते आणि सरकारने लोकांना नशीबाच्या भरवशावर सोडून दिल्याची तक्रार वर्तमानपत्रातून करण्यात आली. तापातून बऱ्या होणाऱ्या ब्रिटीश सैनिकांपासून हॉस्पिटलचे सफाई कर्मचारी दूर राहिले असं 'पेल रायडर : द स्पॅनिश फ्लू ऑफ 1918 अँड हाऊ इट चेंज्ड द वर्ल्ड' पुस्तकाच्या लेखिका लॉरा स्पिने यांनी म्हटलंय.
"1886 ते 1914 च्या दरम्यान आलेल्या प्लेगच्या साथीदरम्यान 80 लाख भारतीयांचा बळी गेला होता. आणि त्यावेळी ब्रिटीशांनी घेतलेली भूमिका या सफाई कर्मचाऱ्यांच्या लक्षात होती."
"स्थानिकांच्या आरोग्याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्याचा परिणामही ब्रिटीश अधिकाऱ्यांना भोगावे लागले. या आपत्तीला सामोरं जायला यंत्रणा अपुऱ्या होत्या आणि बरेचसे डॉक्टर्स युद्धभूमीवर असल्याने डॉक्टर्सचा तुटवडा होता."
अखेरीस बिगर सरकारी संघटना आणि स्वयंसेवक मदतीला आले. त्यांनी दवाखाने उभारले, मृतदेह काढून त्यांच्या अंत्यसंस्कारांची सोय केली. लहान रुग्णालयं सुरू केली, रुग्णांवर उपचार केले, निधी जमा केला आणि कपडे आणि औषधांच्या वितरणासाठी केंद्रं सुरू केली.
नागरिकांनी मिळून फ्लू विरोधी पथक तयार केलं. "भारताच्या इतिहासात कदाचित यापूर्वी कधीही समाजातील सुशिक्षित आणि सधन व्यक्ती इतक्या मोठ्या संख्येने आपल्या गरीब बांधवांसाठी अडचणीच्या काळात पुढे आल्या नसतील," असं एका सरकारी अहवालात म्हटलं होतं.
सध्याच्या घडीला देश अशाच एका मोठ्या साथीच्या रोगाला सामोरं जात असताना सरकारने त्यावर तातडीने पावलं उचलली आहेत. पण शतकभरापूर्वीप्रमाणेच आताही नागरिकांची भूमिकाच या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार वेगानं होत असताना हे लक्षात घ्यायला हवं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)