सुधीर मुनगंटीवारः शिवसेनेला आम्ही फसवलं, ही आमची चूकच #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1.'शिवसेनेला आम्ही फसवलं, ही आमची चूकच'
महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती कशामुळं तुटली, या प्रश्नाला अखेर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनीच पूर्णविराम दिलाय. "आम्ही शिवसेनेला फसवलं. मात्र, कधी ना कधी चूक सुधारू," असं सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत बोलताना म्हटलं. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.



त्याचवेळी सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला इशाराही दिला. ते म्हणाले, "आमच्या चुकीचा तुम्ही एवढा फायदा उचलू नका. राज्यातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईलच."
विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजप युती तुटली. तीस वर्षे हे दोन्ही पक्ष एकत्र होते. त्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पारंपरिक विरोधकांसोबत एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरे यांनी स्वत: मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतली आणि राज्य सरकारचे शंभर दिवसही पूर्ण केले.
याच निमित्तानं विधानसभेत सुरू असलेल्या चर्चेत सुधीर मुनगंटीवार यांनी युती तुटण्याच्या चुकीची कबुली देत, काँग्रेस-राष्ट्रवादीलाही इशारा दिला.
2.'निदान खडसेंना तरी तिकीट द्यायला हवं होतं'
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा झाली. यात संजय काकडे यांनी आपलं नाव नसल्यानं नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "राज्यसभेसाठी मला राहू द्या, निदान एकनाथ खडसेंना तरी तिकीट द्यायला हवं होतं." टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, Getty Images
संजय काकडे हे राज्यसभेचे खासदार होते. ते निवृत्त झाल्यानंतरही त्यांना तिकिटाची अपेक्षा होती. मात्र, भाजपनं राज्यातून उदयनराजे भोसले, भागवत कराड आणि रामदास आठवले या तिघांना उमेदवारी दिलीय.
एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांच्यासोबत जे झालं, तेच माझ्यासोबत झालं, अशी खंतही संजय काकडे यांनी व्यक्त केली.
काकडेंच्या वक्तव्यानंतर राज्यसभा उमेदवारीवर एकनाथ खडसे यांनीही प्रतिक्रिया दिली.
"मला देशाच्या नाही तर राज्याच्या राजकारणात रस आहे. मी राज्याच्या राजकारणात कायमच सक्रीय होतो आणि आजही आहे. मी कधीही राज्यसभेचा दावेदार नव्हतो. कार्यकर्त्यांची अपेक्षा असली, तरी माझा अपेक्षाभंग झालेला नाही," असं खडसे म्हणाले.
3. ...पण औरंगाबादला खासदारकीची आवश्यकता होती - चंद्रकांत खैरे
शिवसेनेनं राज्यसभेची उमेदवारी काँग्रेसमधून आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांना जाहीर केलीय. त्या आता शिवसेनेच्या उपनेत्या आहेत. मात्र, यामुळं शिवसेनेतील ज्येष्ठ नेते नाराज असल्याचं औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या वक्तव्यमुळं समोर आलंय. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.
राज्यसभा उमेदवारीवर चंद्रकांत खैरे म्हणाले, "मला नाही, मात्र माझ्या शहराला (औरंगाबाद) खासदारकीची आवश्यकता होती. आदित्यसाहेबांना आवडलं नाही. मी माझं काम करत राहीन."

फोटो स्रोत, Getty Images
"मी बाळासाहेबांसोबत अनेक वर्षे काम केलंय. उद्धव ठाकरे यांच्यासोबतही काम केलंय. त्यांना आता वाटतं की, नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. पण मी स्मशानात जाईपर्यंत शिवसैनिकच राहीन. मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे, संधी मिळाली असती तर लढायला बळ मिळालं असतं," अशा शब्दात खैरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
4. 'कोरोना गो म्हटल्यानंच महाराष्ट्र आणि देशात तो जास्त आला नाही'
'गो कोरोना गो... कोरोना गो' असं म्हणणाऱ्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा व्हीडिओ सर्वत्र व्हायरल झालाय. सोशल मीडियावरून आठवलेंची खिल्ली सुद्धा उडवली. मात्र, रामदास आठवलेंनी आपल्या वक्तव्याचं समर्थन केलंय. लोकमतनं ही बातमी दिलीय.

"मी कोरोना गो असं म्हटलंय. त्यामुळे तो महाराष्ट्रात काय किंवा भारतात सुद्धा जास्त आलेला नाही. तरीही आम्ही त्याची पूर्वकाळजी घेत आहोत. आम्ही कोरोनाला जायला सांगितलंय. पण काळजी घेणं, ही आपली जबाबदारी आहे. डॉक्टरांची जबाबदारी आहे," असं आठवले म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
राज्यसभा उमेदवारीचा अर्ज भरताना रामदास आठवलेंनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या त्यांच्या व्हीडिओबद्दल विचारले असता, त्यांनी आपल्या वक्तव्याचं समर्थन केलं.
दरम्यान, भारतात कोरोना व्हायरसची लागणी 73 जणांना झाली आहे. तर कर्नाटतील कलबुर्गीत 76 वर्षीय वृद्धाचा कोरोना व्हायरसमुळं मृत्यू झालाय. कोरोना व्हायरसचा भारतातील हा पहिला बळी आहे.
5. पिंपरीत धावत्या टेम्पोत महिलेवर बलात्कार
टेम्पोचालक आणि क्लिनरनं रात्रभर महिलेवर बलात्कार केल्याची घटना पुण्यातील पिंपरीत घडलीय. भांडणानंतर घर सोडून आलेली 29 वर्षीय महिला आळंदीतून पेरणे फाटा इथं जाण्यासाठी टेम्पोत बसल्यावर आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, Thinkstock
रात्रभर टेम्पो पिंपरी परिसरात फिरवून पीडित महिलेस पुणे-बंगळुरू महामार्गावर सोडलं. त्यानंतर एका सोसायटीच्या वॉचमनच्या मदतीनं पीडितेनं पोलिसांशी संपर्क केला.
पीडित महिलेनं आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी टेम्पोचालक आणि क्लिनर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























