भगवान कराड : भाजपचे राज्यसभेसाठीचे तिसरे उमेदवारी

फोटो स्रोत, Getty Images
भारतीय जनता पक्षाने राज्यसभेसाठी तिसऱ्या नावाची घोषणा केली आहे. भगवान कराड यांना भाजपने तिसऱ्या जागेसाठी उमेदवारी दिली आहे.
याआधी भाजपने महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांची नावं जाहीर केली आहेत.
कोण आहेत भगवान कराड?
भगवान कराड हे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. ते औरंगाबादचे माजी महापौर आहेत. मराठवाडा विकास मंडळाचं अध्यक्षपद त्यांनी आधी भूषवलं आहे.
महापौर, उपमहापौर, भाजप शहर सरचिटणीस, शहराध्यक्ष अशी पदं त्यांनी भूषवली आहेत. काही काळ ते भाजपच्या भटके विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष होते.
उदयनराजेंमुळे भाजपला काय लाभ?
लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेल्या उदयनराजे यांनी अवघ्या सहा महिन्यांत भाजपचा रस्ता धरत खासदारकीचा राजीनामा दिला होता. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा मतदारसंघाचीही पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे यांचा पराभव केला.
त्यामुळे भाजपकडून उदयनराजेंच्या राजकीय पुनर्वसनाचा प्रयत्न होतोय का, असा प्रश्न उपस्थित होतोय.
अवघ्या काही तासांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदेंचं नावही या यादीत आहे. राजेंद्र गेहलोत यांना राजस्थानमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपने आसासमधून भुवनेश्वर कालीता यांना तर बिहारमधून विवेक ठाकूर यांचं नाव निश्चित केलं आहे.
गुजरातमधून अभय भारद्वाज आणि रमीलाबेन बारा यांना संधी देण्यात आली आहे. झारखंडमधून दीपक प्रकाश भाजपचे उमेदवार असतील. मणिपूरमधून लिएसेंबा महाराजा हे भाजपचं प्रतिनिधित्व करतील.
सहयोगी पक्षांमधून रामदास आठवले महाराष्ट्रातून तर आसाममधून बुस्वजीत डाइमरी यांचं नाव पक्कं करण्यात आलं आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागू दे, पराभव झाला तरी राज्यसभेवर घेण्यात येईल, या बोलीवरच उदयनराजे भोसले यांचा भाजपप्रवेश झाला असण्याची शक्यता ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी व्यक्त केली.
त्यांनी सांगितलं, "उदयनराजे यांनी राजीनामा देताना हा प्रश्न विचारलेला असण्याची शक्यता आहे. त्यावेळी केलेली ही कमिटमेंट असू शकते. त्यामुळेच लोकसभेच्या पराभवानंतरही त्यांना राज्यसभेवर घेण्यात भाजपने रस दाखवला आहे."
मराठा राजकारणाला बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं चोरमारे सांगतात.
त्यांच्या मते उदयनराजेंच्या उमेदवारीचं आणखी एक कारण म्हणजे भाजपचं मराठा राजकारण. "महाराष्ट्रात मराठा मतदारांची संख्या अधिक आहे. भाजपचा चेहरा ब्राह्मण-ओबीसी असा पूर्वीपासून होता. आता हा चेहरा बदलण्याच्या प्रयत्नात भाजप आहे."

फोटो स्रोत, Getty Images
"भाजप मराठा मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहे. त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा चेहरासुद्दा आहे. पण पाटील हे संघ स्वयंसेवक म्हणून जास्त परिचित आहे," असंही चोरमारे यांनी म्हटलं.
"म्हणूनच कोल्हापूरमध्ये संभाजी राजेंना सोबत घेण्यात आलं होतं. आता उदयनराजेंना घेण्यात आलं आहे. या माध्यमातून भाजपच कसा महाराष्ट्रातील सर्वसमावेशक पक्ष आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न दिसून येत आहे."
"उदयनराजे सध्या शांत असले तरी ते फार काळ शांत राहू शकत नाहीत. त्यांनी भाजपवर टीका करायला सुरुवात केली तर ते पक्षाला महागात पडू शकतं. त्यामुळे पद देऊन त्यांचं समाधान करण्याचं भाजपचं धोरण असू शकतं," असं चोरमारेंनी सांगितलं.
महाविकास आघाडीत एका जागेचा तिढा?
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद पवार आणि फौजिया खान यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरले. राज्याच्या मंत्रिमंडळात काँग्रेसला कमी जागा दिल्याने राज्यसभेत दोन जागा मिळाव्यात अशी काँग्रेसची भूमिका असल्याचं समजतंय. त्यामुळे महाविकासआघाडीत चौथ्या जागेवरून तिढा कायम आहे.

फोटो स्रोत, Social media
विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या चार आणि भाजपच्या तीन जागा निवडून येऊ शकतात. चारपैकी प्रत्येकी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेसकडे असेल. मात्र चौथ्या जागेसाठी आघाडीत तणाव असल्याचं दिसून येतंय.
याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, की काँग्रेसकडून 15 जण राज्यसभेसाठी इच्छुक असून याबाबत त्यांनी सोमवारी (9 मार्च) काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली.
मुकुल वासनीक, राजीव सातव, रजनी पाटील, मिलिंद देवरा, हुसेन दलवाई, अविनाश पांडे ही काही काँग्रेस इच्छुकांची नावं आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मल्लिक यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभा निवडणुकीच्या चौथ्या जागेबाबत महाविकास आघाडीत अद्याप कोणताही निर्णय झाला नसून लवकरच होण्याची शक्यता आहे.
येत्या 26 मार्च रोजी राज्यसभेच्या 55 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्याच दिवशी मतमोजणीही होणार आहे. महाराष्ट्रात 7 जागा, तामिळनाडूत 6 जागा, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील प्रत्येकी 5 जागांवर निवडणूक होत आहे. ओडिशा, आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या चार जागांसाठी मतदान होईल. तर आसाम आणि राजस्थानमधून 3 जागा रिक्त होत आहेत.
13 मार्च ही राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























