राज्यसभेच्या चौथ्या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 2 मिनिटे
येत्या 26 मार्च रोजी राज्यसभेच्या 55 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्याच दिवशी त्याची मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात 7 जागा, तामिळनाडूत 6 जागा, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील प्रत्येकी 5 जागांवर निवडणूक होत आहे. ओडिशा, आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या चार जागांसाठी मतदान होईल. तर आसाम आणि राजस्थानमधून 3 जागा रिक्त होत आहेत.
महाराष्ट्रात महाविकासआघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर आता राज्यसभेची गणितंही बदलण्याची शक्यता आहे.
राज्यात एकूण सात जागांसाठी निवडणूक होत असून विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकासआघाडीच्या चार आणि भाजपच्या तीन जागा निवडून येऊ शकतात.
महाविकासआघाडीत मात्र जागांवरुन रस्सीखेच सुरुय. चारपैकी प्रत्येकी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेसकडे असेल. मात्र चौथ्या जागेसाठी महाआघाडीत तणाव असल्याचं दिसून येतंय.
याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगीतलं की काँग्रेसकडून 15 जण राज्यसभेसाठी इच्छुक असून याबाबत त्यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्ष सोनीया गांधी यांची भेट घेतली.
मुकुल वासनीक, राजीव सातव, रजनी पाटील, मिलिंद देवरा, हुसेन दलवाई, अविनाश पांडे ही काही काँग्रेस इच्छुकांची नावं आहेत.
तर राष्ट्रवादी काँग्रसकडून शरद पवार आणि माजी राज्यमंत्री फौजीया खान यांची नावं निश्चित झाली आहेत. पण राष्ट्रवादीला दोन जागा देण्याबाबत महाविकासआघाडीत निर्णय झालेला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मल्लिक यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभा निवडणुकीच्या चौथ्या जागेबाबत महाविकासआघाडीत अद्याप कोणताही निर्णय झाला नसून लवकरच होण्याची शक्यता आहे.
तिकडे शिवसेनेकडून राजकुमार धूत, चंद्रकांत खैरे, प्रियांका चतुर्वेदी अशी काही नावं चर्चेत आहेत.
महाविकासआघाडीत राज्यसभेवरून बिघाडी ?
राज्यसभेची चौथी जागा कुणाच्या वाट्याला येणार हे अजूनही निश्चित झालेलं नाही. 13 मार्च ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
चारपैकी दोन जागा लढवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह आहे. तर राज्याच्या मंत्रिमंडळात काँग्रेसला कमी जागा दिल्याने राज्यसभेत दोन जागा मिळाव्यात अशी काँग्रेसची भूमिका असल्याचं समजतंय. त्यामुळे महाविकासआघाडीत चौथ्या जागेवरून तिढा कायम आहे.

फोटो स्रोत, Getty Images
विधानसभेचे संख्याबळ पाहता शिवसेना यात काय भूमिका घेते यावर राज्यसभेची चौथी जागा कुणाला जाणार हे अवलंबून आहे. विधानसभेत भाजपाकडे 105 जागा, शिवसेनेकडे 56, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 54 आणि काँग्रेसकडे 44 जागा आहेत.
भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारांची नावं जाहीर झाली नसली तरी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रावादी काँग्रेसमधून भाजपत गेलेले माजी खासदार उदयनराजे भोसले ही दोन नावं निश्चित असल्याचं समजतंय. तर तिसरं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























