कॉल सेंटर स्कॅम: 'पॉर्नोग्राफीतून व्हायरस आल्याचं सांगून मी लोकांना असं फसवलं'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रजिनी वैद्यनाथन
- Role, बीबीसी न्यूज, दिल्ली
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
दिल्लीजवळील गुरुग्राम येथील कॉल सेंटरमधील घोटाळेबाजांचा (स्कॅमर) बीबीसीनं याच आठवड्यात पर्दाफाश केला.
जिम ब्राउनिंग या ब्रिटनस्थित हॅकरनं या घोटाळेबाजांच्या ऑफिसचे कॅमेरे हॅक केले आणि सर्व प्रकार उघडकीस आणलं. जिम ब्राउनिंगनं हे सर्व बीबीसीसमोर मांडलं आणि त्यानंतर कॉल सेंटरवर पोलिसांनी कारवाई केली.
पण हे घोटाळेबाज नेमके आहेत कोण आणि ते त्यांच्या कृत्यांचं समर्थन कसं करतात? हे जाणून घेण्यासाठी बीबीसीनं त्यांच्याशीच संवाद साधला.
कॉल सेंटरच्या माध्यमातून लाखो रूपये कसे कमवले, याबाबत पियुष मला सांगत होता.
पैसे कमवणं सोपी गोष्ट होती, असं म्हणत पियुषनं तर सांगितलंच पण त्याचबरोबर कार, उंची कपड्यांची आपली हौस कशी पुरवून घेतली हे देखील त्याने सांगितलं.
अत्यंत सर्वसामान्य पार्श्वभूमी असलेल्या पियुषनं केवळ फोनच्या मदतीनं अनेक निष्पापांची फसवणूक केली आणि पैसा कमवला.
रॉकस्टार होण्यासाठी आम्हाला काहीतरी करणं गरजेचं होतं, असं पियुष म्हणतो.
मी विचारलं, "चोर बनलास?"
तो अत्यंत शांतपणे म्हणाला, बरोबर.
एका मित्राच्या घरी मला पियुष भेटला. मला भेटलेल्या या तरुणांच्या ग्रुपमध्ये एका गोष्टीचं साम्य होतं, ते म्हणजे, यातल्या प्रत्येकानं परदेशातील लोकांची फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरमध्ये काम केलं होतं.
पाश्चिमात्य देशातल्या कायदेशीर कॉल सेंटरमध्ये नोकऱ्यांसाठी भारताची ओळख आहे. मात्र, इथंही एक काळी बाजू आहेच.
महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर नऊ वर्षांनी पियुष कॉल सेंटरमध्ये काम करू लागला. "मला दुसरीकडं कुठंच काम मिळत नव्हतं. त्यात इथं मला पगारही चांगला मिळत होता आणि भत्ताही चांगला होता," असं तो सांगतो.
'टेक सपोर्ट स्कॅम' नावाच्या कंपनीत पियुष काम करू लागला.
तुमच्या कॉम्प्युटरमध्ये 'पोर्नोग्राफिक व्हायरस' शिरल्याचे पॉप-अप लोकांच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर पाठवणं आणि त्यांना मदतीसाठी एक फोन नंबर देणं, हे काम ही कंपनी करायची.
मूळात त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये कुठलाच व्हायरस नसतो. मात्र, अशाप्रकारच्या पॉप-अपमुळं लोक घाबरायचे. घाबरलेले लोक संपर्क साधायचे. त्यानंतर पियुष आणि त्याचे सहकारी कॉम्प्युटरमध्ये अस्तित्वात नसलेली अडचण दूर करायचे.

लोकांना फसवणं ही सुद्धा एक 'कला' असल्याचं पियुष म्हणतो.
वयोवृद्ध लोक आमच्या निशाण्यावर असत, असंही तो सांगतो.
पियुष म्हणतो, "कुटुंबाविना एकटं राहणारे असे बरेच वयोवृद्ध लोक अमेरिकेत राहतात. त्यातले बरेचजण दिव्यांग आहेत. त्यामुळं त्यांना फसवणं सोपं असतं."
माझ्यासमोर बसलेल्या पियुषकडं मी आश्चर्यचकित होऊन पाहत होते. तो इतका शांतपणे हे सगळं कसं सांगू शकतो, याचा विचार करत होते. स्वत:च्याच आजी-आजोबा सुद्धा घोटाळ्याचे बळी ठरलेत, याबद्दल त्याला काय वाटतं, हे न राहून मी विचारलं.
पियुष म्हणाला, "हो, मला वाईट तर वाटलं. पण मला पैशांची गरज होती आणि त्यामुळं मी ते केलं. एवढंच."
एकदा तर टार्गेट पूर्ण करण्यासाठी पियुषनं एका महिलेकडून तिच्याकडे असलेले शेवटचे 100 डॉलरही द्यायला भाग पाडलं. त्यावेळी ख्रिसमसचे दिवस होते.
"पैसे देताना महिला रडू लागली आणि तिनं तिच्याकडील पैसे दिले. आतापर्यंतचा हा सर्वांत वाईट कॉल होता," असं पियुष सांगतो.
पियुषनं स्वत:चं कॉल सेंटर सुरू केलंय. कॉल सेंटर सुरू करणं सोपं असल्याचं तो सांगतो. ऑफिसपुरती जागा भाड्यानं घेतली. जागा मालकाला सांगितलं की, मार्केटिंग फर्म सुरू करायचीय.
भारतात दिवस असताना, अमेरिकेत रात्र असते. त्यामुळं पियुषच्या ऑफिसचं काम अमेरिकेत दिवस असताना, म्हणजे भारतात रात्र असताना होत असे. ऑफिसमधील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळाही त्यानं तशाच ठरवून दिल्या होत्या. कामाच्या वेळा पाहून आजूबाजूचे लोक विचारतही असत की, इथं नेमकं काय चालतं?

लोकांकडून पैसा काढण्यासाठी पियुष नवनव्या युक्त्यांचा विचार करत असे. फसवणुकीसाठी त्यानं IRS स्कॅम नावाची कल्पना शोधली. अमेरिकेतील लोकांना फोन करून त्यांना सांगायचा की, टॅक्समधील हजारो रूपये परत मिळतील, पण त्याआधी 184 डॉलर भरावे लागतील.
जर हे पैसे भरले नाहीत, तर पोलीस तुमच्या घरात येऊन तुम्हाला अटक करतील, असं सांगून लोकांना घाबरवलं जायचं, असं पियुष सांगतो.
ज्यावेळी पियुष नोकरी करत होता, त्यावेळी त्याला प्रत्येक डॉलरमागे एक रुपया मिळत असे. त्यामुळं 100 डॉलरमागे पियुषला फक्त 1.25 डॉलर मिळत असे. मात्र, ज्यावेळी पियुषच बॉस बनला, त्यावेळी पाण्यासारखा पैसा मिळू लागला. काही महिन्यात तर त्याची कमाई 50 हजार डॉलरपर्यंत जायची.
'एखाद्या MBA पदवीधरापेक्षा मी जास्त पैसे कमावत होतो'
सॅम नामक आणखी एका स्कॅमरशी बीबीसीनं बातचीत केली. त्यानं हा व्यावसाय आता सोडलाय. तो यात ठरवून गेला नव्हता.
गेल्या दशकभरातील सर्वांत मोठी बेरोजगारी सध्या भारतात आहे. ज्यावेळी सॅम नोकरी शोधत होता, त्यावेळी त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं की, कुठल्याही अधिकच्या मेहनतीशिवाय तो खूप कमाई करू शकतो.
सॅमला सुरूवातील मित्रानं सांगितलं होतं की, "सेल्सची नोकरी आहे. अमेरिकेतील ग्राहकांनी आपल्या वस्तू विकायच्या आहेत."
या कामासाठी सॅमला ग्राहकांशी बोलण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं. त्याचवेळी सॅमच्या लक्षात आलं होतं की, आपण काय करतोय.
"प्रशिक्षणानंतर ज्यावेळी मी प्रत्यक्षात कामसाठी तयार झालो, काम सुरू केलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की, हे संपूर्ण प्रकरण म्हणजे घोटाला आहे," असं सॅम सांगतो.
आता मागे फिरणंही कठीण होतं, असंही तो सांगतो.
सॅम सांगतो, "एखाद्या MBA पदवीधरापेक्षाही जास्त पैसे मी कमवत होतो आणि त्यात माझ्याकडे कॉलेजची पदवी सुद्धा नव्हती."

"मी खूप दारू प्यायचो, पार्ट्या करायचो. तुमचे भविष्यासाठीचे कोणतेच स्वप्न नसतील, प्लॅन नसतील, तर तुम्ही इतक्या पैशांचं करणार तरी काय?" असा सवाल सॅम विचारतो.
इतर स्कॅमर्सना विचारलेल्या प्रश्नांसारखे सॅमलाही मी प्रश्न विचारले. त्यानं स्वत:ची समजूत काढत सांगितलं की, तो फक्त श्रीमंतांना टार्गेट करतो.
"आपल्या अन्नासाठी ठेवलेले पैसे द्यावं लागतं, असे ग्राहक मला सोपवले जात नाहीत ना, याची मी खातरजमा करत असे. जे पैसे देऊ शकतील, अशाच व्यक्तींची नावं मी सूचवायचो," असं सॅम सांगतो.
जरी काही लोकांना परवडत असेल, तरी चोरी करणं ठीक आहे का? असं मी विचारल्यावर सॅम अत्यंत विश्वासानं 'होय' म्हणाला.
ज्यांना लुटायचं होतं, अशा काही गरीब व्यक्तींशी सॅम अजूनही संपर्कात आहे. त्यात अमेरिकास्थित एका महिलेचा समावेश आहे. तीन मुलांची आई असणारी ही महिला एका रेस्टॉरंटमध्ये काम करते.
त्या महिलेचे कॉम्प्युटरशी संबंधित काही अडचणी असतील, तर सॅम दुरुस्त करून देतो. त्यामुळेच की काय, त्या महिलेच्या ख्रिसमस कार्डच्या यादीत सॅमचंही नाव आहे.
सॅमच्या अधिकच्या कमाईमुळं त्याच्या वडिलांना त्याच्याबद्दल आदर वाटत असे. कारण सॅम पैशांसाठी त्यांच्यावर अवलंबून राहत नव्हता.
आम्ही बोलत असतानाच सॅमनं मला त्याच्या मनगटावरील घड्याळ दाखवलं. ते घड्याळ 400 डॉलरचं होतं. टार्गेट पूर्ण केल्यानं त्याला त्याच्या बॉसकडून ते गिफ्ट मिळालं होतं.
सॅमकडे इतका पैसा कसा आला, कुठून आला, याबाबत त्याच्या वडिलांना, मित्रांना काहीच माहित नव्हतं. ज्यावेळी त्यांनी सॅमला विचारला, त्यावेळी त्यानं सांगितलं की, मी एका आयटी कंपनीत सेल्समन म्हणून काम करतो.
काम सुरू केल्याच्या सहा महिन्यानंतर पोलिसांनी कॉल सेंटरवर छापा टाकला आणि कॉल सेंटर बंद करायला लावलं. सॅम अटकेच्या कारवाईतून निसटला आणि कॉल सेंटरसारख्याच दुसऱ्या व्यावसायात त्यानं नोकरी मिळवली.
सॅमच्या बॉसलाही पोलिसांनी लवकरच सोडलं. सॅमला विश्वास आहे की, त्याच्या बॉसनं वेगळ्या नावाखाली आधीसारखंच काम सुरू केलंय. अशा कंपन्या सुरू करणं सोपं असतं, असंही तो सांगतो.
सॅम आता एका चांगल्या टेक कंपनीत काम करतो आणि स्कॅमिंगच्या या जगतापासून तो आता दूर गेलाय.
सॅम माझ्याशी बोलायला तयार झाला. कारण त्याला वाटतं की, इतरांनीही चांगल्या कायदेशीर नोकऱ्या करव्यात, ज्यामुळे पोलिसांपासून पळ काढत आयुष्य काढावं लागणार नाही.

सॅमनं त्याच्या घरी स्कॅमिंगच्या कामाबद्दल सांगितलं नव्हतं. मात्र, पियुषचं तसं नव्हतं. त्यानं घरी सांगितलं होतं.
"मी त्यांना सर्व सांगितलं होतं आणि मी खूप कमाई करतो, यात ते खुशही होते," असं पियुष म्हणतो.
मी त्याच्या जिन्सकडे पाहिलं, तेव्हा मला त्यावर तीन शब्दांचं एक वाक्य लिहिलेलं दिसलं - 'take every chance'
कॉल सेंटरमधील स्कॅमिंगचं काम जवळपास दशकभर केल्यानंतर पियुषनंही ते सोडून दिलं. कारण पोलिसांच्या छापेमारीची त्याला भीती वाटू लागली होती. तो स्वत:ला नशीबवान समजतो की, पोलिसांनी त्याला पकडलं नाही. शिवाय, त्याला त्याच्या कृत्याबद्दल वाईटही वाटतं.
पियुषनं नंतर त्याच्या कमाईच्या पैशातून कायदेशीर व्यावसाय सुरू केला होता. मात्र, नुकसान झाल्यानं तोही बंद केला.
त्यानंतर खरंतर काही नीट होत नाहीय, असं म्हणत पियुषचा चेहरा उतरला. तो शेवटी इतकंच म्हणाला की, "मला वाटतंय, हे माझेच कर्म आहेत."
(पियुष आणि सॅम ही खरी नावं नसून, मूळ नावं वेगळी आहेत.)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























