लाखोंना आमंत्रण, कोट्यवधींचा खर्च, भाजप मंत्र्याच्या मुलीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा

फोटो स्रोत, Office of B. Sreeramulu
- Author, इमरान कुरेशी
- Role, बेंगळुरूहून, बीबीसी हिंदीसाठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
जेवढ्या मोठ्या संख्येने या लग्नाच्या आमंत्रण पत्रिका वाटण्यात येत आहे, त्यावरून हे लग्न मोठं आणि डोळे दिपवणारं असेल, यात शंका नाही.
आणि तसंही कर्नाटकातले राजकीय नेते आपलं राजकीय बळ आणि पैसे यांचं प्रदर्शन करण्यासाठी ओळखले जातात.
यात ताजं नाव आहे कर्नाटकचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री बेल्लारी श्रीरामलु यांचं.
बेल्लारी श्रीरामलू यांच्या मुलीचं 5 मार्च रोजी लग्न आहे. या लग्नासाठी आतापर्यंत 1 लाख आमंत्रण पत्रिका वाटण्यात आल्या आहेत.
आमंत्रण पत्रिकांची संख्या ऐकून आश्चर्य वाटत असेल तर हे इथेच थांबत नाही. या पत्रिकांवर केशर, वेलची, कुंकू, हळद आणि अक्षता लावण्यात आल्या आहेत.

फोटो स्रोत, Office of B. Sreeramulu
इतकंच नाही तर ही आमंत्रण पत्रिका आरोग्य मंत्र्यांची असल्याने यावर हेल्थ थीमसुद्धा आहे.
बेल्लारी श्रीरामलू यांची मुलगी रक्षिता हिचं हैदराबादचे उद्योगपती रवी कुमार यांच्याशी लग्न होतंय. लग्नाच्या 9 दिवस आधीपासून सुरू होणारे लग्नविधी 27 फेब्रुवारीपासून त्यांचा गृह जिल्हा असलेल्या बेल्लारीमध्ये सुरू झाले आहेत.
बेंगळुरूमधल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मेंदीचा कार्यक्रम आहे. तर दुसऱ्या दिवशी बुधवारी लग्नापूर्वी होणारा विधीही याच हॉटेलमध्ये होणार आहे.

फोटो स्रोत, Office of B. Sreeramulu
रक्षिताचं लग्न स्थानिक प्रसार माध्यमांमध्ये चर्चेचा विषय आहे. या लग्नाची तुलना कर्नाटक भाजपचे माजी मंत्री आणि बेकायदा खनिज उत्खनन घोटाळ्याच्या आरोपांचा सामना करत असलेले जी. जनार्दन रेड्डी यांची मुलगी ब्राह्मणी हिच्या लग्नाशी होतेय.
अनधिकृत आकडेवारीनुसार रेड्डी यांच्या मुलीच्या लग्नात जवळपास 500 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
मात्र, पत्रकारांशी झालेल्या अनधिकृत चर्चेत त्या लग्नात 40-50 कोटी रुपयेही खर्च झाले नाही, असं सांगण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Office of B. Sreeramulu
जी. जनार्दन रेड्डी हे करुणाकर रेड्डी आणि सोमशेखर रेड्डी यांच्यानंतर बेल्लारी श्रीरामलू यांना आपला तिसरा भाऊ मानतात.
बेल्लारी श्रीरामलू अनुसूचित जमातीतून येतात. मात्र, कर्नाटकातल्या राजकारणात बेल्लारी श्रीरामलू यांना कायमच रेड्डी ब्रदर्स म्हणून संबोधलं जातं.
बेंगळुरूच्या पॅलेस ग्राउंडच्या 40 एकर परिसरात हा भव्यदिव्य लग्नसोहळा पार पडतोय. यातला 27 एकरचा परिसर प्रत्यक्ष लग्न, मनोरंजन आणि इतर आयोजनांसाठी राखून ठेवण्यात आला आहे. तर 15 एकरमध्ये पार्किंग आहे.
हम्पीचं वीरुपक्ष मंदिर आणि इतर मंदिरांसारखा मंडप उभारण्यात आला आहे. यासाठी 300 कारागीर काम करत होते.

फोटो स्रोत, Office of B. Sreeramulu
वेडिंग प्लॅनर ध्रुव यांच्या नेतृत्त्वाखाली गेल्या तीन महिन्यांपासून लग्नाची तयारी सुरू असल्याची माहिती बेल्लारी श्रीरामलू यांच्या कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.
चार एकर जागेत केवळ लग्न मंडप उभारण्यात आला आहे. मांड्या येथील मेलुकोटे मंदिरातील कल्याणीच्या धर्तीवर मुहूर्त सेट तयार करण्यात आला आहे.
बेंगळुरूमध्ये लग्न झाल्यानंतर नवविवाहीत जोडपं रिसेप्शनसाठी बेल्लारीला जाईल. बेल्लारीत संपूर्ण जिल्ह्यातून लोक या रिसेप्शनला हजेरी लावणार आहेत.

फोटो स्रोत, Office of B. Sreeramulu
बेल्लारी येथील सेटसुद्धा बॉलीवुडमधील सेट डिझायनर्सने तयार केला आहे. दीपिका पादुकोणसाठी काम केलेल्या मेकअप आर्टिस्ट आणि मुकेश अंबानींची मुलगी ईशाच्या लग्नाचं फोटोशूट करणारी टीमला या लग्नाची जबाबदारी देण्यात आली आहे.
डायनिंग हॉलमध्ये 7 हजार लोक एकत्र जेवू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. उत्तर कर्नाटकातील पारंपरिक पदार्थ बनवण्यासाठी 1000 आचाऱ्यांना बोलवण्यात आलं आहे.
बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांची राहण्याची व्यवस्था शहरातल्या इतर अनेक पंचताराकित हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Office of B. Sreeramulu
मात्र, बीबीसीशी बोलताना बल्लारी श्रीरामलू म्हणाले, "माझ्या मुलीचं लग्न साधेपणाने होत आहे. अमाप पैसा खर्च करणं, व्यवहारिक नाही. आमच्या कुटुंबाची परंपरा आणि संस्कृतीनुसारच लग्न करतोय. मीडियात छापून येणाऱ्या अशा बातम्या चुकीच्या आहेत. सत्य कुणी लपवू शकत नाही. ते लोकांसमोर आहे."
ते पुढे म्हणाले, "काही मित्र आहेत. मी त्यांना मदत केली होती. तेच सेट उभारण्यात आता मला मदत करत आहेत. मी कुणालाच पैसे देत नाहीये. माझ्याप्रती असलेल्या स्नेहामुळे ते हे सगळं करत आहेत."
बेल्लारी श्रीरामलू त्यांचे मित्र जी. जनार्दन रेड्डी यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नात केलेल्या खर्चापेक्षा जास्त खर्च करणार असल्याच्या वृत्ताचंही त्यांनी खंडन केलं.

फोटो स्रोत, Office of B. Sreeramulu
मात्र, कर्नाटकात हल्ली ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे त्यात लग्नात वारेमाप पैसे खर्च करणं अगदी सामान्य बाब आहे.
काही महिन्यांपूर्वी नवनियुक्त मंत्री बी. सी. पाटील यांनीसुद्धा अत्यंत धूमधडाक्यात आपल्या दुसऱ्या मुलीचं लग्न केलं होतं.
नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये घरवापसी केलेले बेल्लारी श्रीरामलू यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आनंद सिंह यांनी पोटनिवडणुकीच्या तोंडावर आपल्या मुलाचंही जंगी लग्न लावून दिलं होतं.

फोटो स्रोत, Office of B. Sreeramulu
मात्र, या दोन्ही लग्नात लाखो निमंत्रण पत्रिका वाटूनही प्रत्यक्ष 5-10 हजारांपेक्षा जास्त लोक आले नाहीत, असं कर्नाटकातील एका राजकीय विश्लेषकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं.
बल्लारीमध्येदेखील याचाच प्रत्यय येईल, असं म्हटलं जातंय. मात्र, हे सगळे प्रयत्न लोकांशी संपर्क साधण्यासाठी, त्यांना जोडण्यासाठी सुरू आहेत, यात शंका नाही.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























