You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राकेश मारिया यांचं आत्मचरित्र: पोलीस सेवेचा लेखाजोखा आणि काही अनुत्तरित प्रश्न
- Author, रोहन नामजोशी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या 'लेट मी से इट नाऊ' या पुस्तकावर दिग्दर्शक रोहित शेट्टी सिनेमा बनवत आहे. फेसबुकद्वारे त्याने ही माहिती दिली.
रोहित शेट्टीने राकेश मारियांची भेट घेतली आणि त्यानंतर फेसबुकवर फोटो शेअर करून सिनेमाची घोषणा केली.
राकेश मारिया हे नाव उच्चारलं की मुंबईतले बाँबस्फोट, आतंकवादी हल्ले, अशी इतिहासाची काळी पानं डोळ्यासमोर येतात. अख्खा महाराष्ट्र काय भारतच ढवळून टाकणाऱ्या हल्ल्याच्या सूत्रधारांना जेरबंद करणाऱ्या राकेश मारियांचं नाव कायम आदराने घेतलं जातं.
त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात शीना बोरा खटल्यामुळे वादात सापडलेल्या मारियांनी तेव्हा काही बोलण्याचं टाळलं होतं. Let me say it now या त्यांच्या आत्मचरित्रातून त्यांनी यासंबंधी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र 614 पानांचं हे आत्मकथन फक्त या खटल्यापुरतं सीमित नाही. मारियांच्या 36 वर्षांच्या वादळी आणि प्रेरणादायी कारकिर्दीचा आलेख आहे.
मुंबईच्या बांद्रा भागात जन्मलेले मारिया तसे संपन्न घरातले आहेत. वडील चित्रपटसृष्टीत होते. आई गृहिणी, बहीण असं छान चौकोनी कुटुंब, इंग्रजी माध्यमात शिक्षण, उत्तम शैक्षणिक कारकीर्द, पहिल्याच प्रयत्नात युपीएससीत मिळालेलं यश, सगळं अगदी दृष्ट लागावं असंच. सुरुवातीला बुलढाणा, अकोला, यवतमाळ, उस्मानाबाद अशा ठिकाणी सेवा दिल्यानंतर ते मुंबईला आले आणि मग त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही.
त्यांच्यासंबंधी ही सगळी माहिती इंटरनेटवर आहे, अनेक लेखांमधून, पुस्तकांमधून, ती समोर आली आहे. या माहितीमागचे मारिया त्यांच्या आत्मकथनतून समोर येतात. पोलीस सेवेत गेल्यापासून काम हा एकच ध्यास असल्याचं अगदी शेवटच्या पानापर्यंत जाणवतं.
1993 च्या स्फोटांचा तपास हा त्यांच्या कारकिर्दीला बहर देणारा टप्पा होता. याविषयी त्यांनी अगदी सविस्तर लिहिलंय. बरेचदा वाचलेली आणि ऐकीव माहिती किती वरवरची असते ते हे वाचताना लक्षात येतं. मारिया आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्याची उकल करण्यासाठी अथक प्रयत्न केले होते. ते पाहून थक्क व्हायला होतं. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आता 27 वर्षांनी त्याचा कण न कण त्यांना व्यवस्थित आठवतो.
संजय दत्तला अटक केल्यानंतर त्याचे वडील सुनील दत्त सुन्न झाले होते. त्यांचा असा चेहरा पाहून मारिया यांच्यातला बाप जागा झाला आणि त्या रात्री त्यांनी स्वत:च्या मुलाला मिठी मारली होती. हा भाग फार हृदयस्पर्शी आहे. संजय दत्तच्या अटकेचा एकूणच एपिसोड अतिशय थरारक आहे.
'गुन्हेगारांचा कर्दनकाळ'
अंडरवर्ल्ड, 2003 मध्ये झालेले स्फोट, त्यानंतर आतंकवाद्यांनी घातलेला धुमाकूळ याविषयी मारियांनी सविस्तर लिहिलं आहे. इंडियन मुजाहिद्दीनचं कंबरडं मोडण्यासाठी मारिया आणि त्यांच्या टीमने प्रयत्नांची केलेली पराकाष्ठा मारियांच्या लिहिण्यातून समोर येते. वेब सीरिज मध्ये किंवा चित्रपटात जे पाहतो ते इतकंही अवास्तव नाही याची जाणीव होते.
या दरम्यान त्यांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले होते. या कामात त्यांच्या सहकाऱ्यांना नावासकट क्रेडिट देण्यात मारिया अजिबात आखडता घेत नाही. My men, my force, my officer's असे उल्लेख वारंवार आल्यामुळे मुंबई पोलिसांचे एकमेव शिलेदार हेच की काय असा प्रश्नही पडल्यावाचून राहत नाही.
त्यानंतरचा काही भाग उगाच डिटेक्टिव्ह सिरियलच्या एपिसोडसारखा आहे आणि थोडा रटाळ आहे. 26/11 च्या हल्ल्याचं वर्णन करणारी प्रकरणं पुस्तकातला सर्वोत्तम भाग आहे. असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यावेळी मारिया कंट्रोल रुममध्ये होते. सलग तीन दिवस त्यांनी कंट्रोल रुमचा ताबा घेतला होता. तो सगळा घटनाक्रम वाचल्यानंतर डोकं सुन्न होतं. त्यावेळी ते गुन्हे शाखेचे पोलीस सहआयुक्त होते. आतंकवाद्यांनी तीन दिवस मुंबईला वेठीस धरलं होतं.
12 वर्षानंतरही ते एक दु:स्वप्न होतं की काय असं वाटतं. प्रत्यक्ष तिथे असलेल्या लोकांचं त्यावेळी काय झालं असेल याची कल्पनाही करवत नाही. त्यावेळचे मानसिकरीत्या अतिशय कणखर मारिया आपल्यासमोर उभे राहतात. साळसकर, कामटे आणि करकरे हे त्यांचे सहकारी या हल्ल्यात गमावल्यानंतरही धैर्यशील चेहरा करून ते संपूर्ण परिस्थितीला सामोरे गेले. त्यांच्याविषयी लिहिताना मारिया भावूक होतात. त्याचवेळी वाचक म्हणून आपण त्यांना मनातल्या मनात सॅल्यूट केलेला असतो.
कसाबची चौकशी आणि त्याचं एकूण व्यक्तिमत्त्वही ते उलगडून दाखवतात. अशा घटना घडल्यानंतर सामान्य लोक आपापल्या कामाला लागतात. मात्र पोलीस आणि तत्सम यंत्रणा त्याच्या मुळाशी जाण्यासाठी दिवस रात्र एक करत असते ज्याची खचितच आपल्याला कल्पना असते.
या हल्ल्यानंतर विनिता कामटे यांनी मारियांवर काही आरोप केले होते. त्याविषयीही त्यांनी लिहिलं आहे. "त्या हल्ल्यात मी जखमी झालो असतो किंवा मेलो असतो तरच मी काहीतरी काम केलंय असं जगाला वाटलं असतं का?" असा प्रश्न ते उद्वेगाने विचारतात.
'काटेरी मुकुट'
मुंबई पोलीस आयुक्त झाल्यावरही मारियांच्या मागचं शुक्लकाष्ठ कमी झालं नाही. याकुब मेमन च्या फाशीच्या वेळी, किंवा लालबागमध्ये झालेल्या हिंसाचारावेळी लाठी घेऊन रस्त्यावर उतरलेले मारिया तमाम जगाने पाहिले. त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली. शीना बोरा प्रकरणावेळी ते वादाच्या भोवऱ्यात अडकले.
या सगळ्या घटनाक्रमामुळे मारिया प्रचंड व्यथित झालेले दिसतात. शीना बोरा खटल्यात त्यांच्यावर जे आरोप झाले त्याबद्दल सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यावर तुमच्या मर्जीतला आयुक्त हवा असेल तर सांगा असं स्पष्टपणे त्यांनी फडणवीसांना विचारलं होतं. मात्र तेव्हा मुख्यमंत्र्यांनी असा कुठलाही विचार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
मारियांचं आयुक्तपद गेल्यावर त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार झाला. देवेंद्र फडणवीसांनी विविध प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत पोलीस आयुक्तांनी मला योग्य माहिती दिली नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर मारिया आणि फडणवीस यांच्यात SMS द्वारे झालेल्या संभाषणाचं सविस्तर वर्णन या पुस्तकात आहे. तत्कालीन गृहसचिव के. पी. बक्षी यांनी त्यावेळी प्रसारमाध्यमांसमोर केलेल्या वक्तव्यांचा मारियांनी समाचार घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणातील भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडण्यासाठी परवानगीसाठी पत्र लिहिलं होतं. त्याचं उत्तर मिळालं नसल्याचं ते सांगतात.
अप्रत्यक्षपणे त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. आता सत्तांतर झाल्यावर हे पुस्तक आलं आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी तर 26/11 च्या हल्ल्याची पुन्हा चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मारियांचं पुस्तक प्रकाशित झाल्यावर शीना बोरा प्रकरणातल्या अनेक बाबी समोर आल्या. त्या तमाम प्रसारमाध्यमांत प्रकाशितही झाल्या. अत्यंत पोडतिडकीने मारियांनी हा भाग लिहिला आहे. मग जर मारिया त्यांच्या भूमिकेवर इतके ठाम होते तर तेव्हाच का हे सगळं सांगून वादांवर पडदा का टाकला नाही हा प्रश्न आल्यावाचून राहत नाही. माणूस शेवटी कितीही मोठा झाला तरी नोकरीपुढे तो छोटाच असतो हे यातून प्रतित होतं.
मारियांचे 'हितचिंतक'
माहितीने भरगच्च असलेलं हे आत्मचरित्र वाचताना बऱ्यापैकी आत्मप्रौढीही जाणवते. पण जो काम करतो तोच माज करतो. मारिया यांनी इतके महत्त्वाचे गुन्हे उलगडले. मात्र देशभर चर्चेचा विषय झालेल्या दाभोळकर आणि पानसरेंचे मारेकरी ते कसे शोधू शकले नाहीत? हे गुन्हे उलगडले नाही याचं वाईट वाटत असल्याचं ते सांगत असले तरी दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून त्यांना ते खरंच अशक्य होतं का? काही विशिष्ट लोकांना बरोबर घेऊन मारियांनी महत्त्वाचे गुन्हे उलगडले. त्यांची नावं वारंवार वाचायला मिळतात. त्यांची ही काम करण्याची पद्धत थोडी खटकते.
IPS अधिकाऱ्यांमधली गटबाजी हा प्रसारमाध्यमांमधील कायम चर्चेचा विषय असतो. या मुद्द्यावरही मारिया बऱ्याच ठिकाणी प्रकाश टाकतात. 93 च्या स्फोटानंतर या संपूर्ण गुन्ह्याची उकल करण्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त ए.एस.सामरा आणि पोलीस सहआयुक्त एम.एन.सिंग मारियांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांना राष्ट्रपती पदकही लवकर मिळालं.
त्यांना मुंबईतच महत्त्वाची पदं मिळाली. त्यामुळे साहजिकच अधिकाऱ्यांच्या एका गटात त्यांच्याबद्दल एक प्रकारची अढी होती. या गटाने किंवा गटांनी मारिया यांच्यावर वेळोवेळी आरोप लावले. त्या गटांना मारिया 'हितचिंतक' (Well wishers) असं संबोधतात. 2000 च्या दशकात त्यांच्यावर एका प्रकरणात सीबीआय चौकशीही झाली होती. हे त्या गटबाजीचं द्योतक असल्याचं मारिया सांगतात. ही सीबीआय चौकशी उगाचच लांबवल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
1999 ते 2014 या काळात महाराष्ट्रात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. या काळात बहुतांश वेळ आर.आर. पाटील गृहमंत्री होते. आर. आर. पाटील यांचा मारियांना कायमच पाठिंबा असल्याचं जाणवतं. 26/11 च्या हल्ल्यानंतर त्यांच्यावर आरोपांची राळ उठली तेव्हा उद्वेगाने राजीनामा देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली होती. मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यावर अहमद जावेद आणि विजय कांबळे हे पोलीस अधिकारी प्रचंड नाराज झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. अशा 'हितचिंतकांचा' बरेचदा फटका बसल्याचं मारिया वेळोवेळी सांगतात.
पोलिसांची नोकरी Selfless असते. मारिया त्याला अपवाद नव्हतेच. उलट त्यांनी जरा जास्तच झोकून देत केली. स्वत:च्या कुटुंबाविषयीही ते वेळोवेळी बोलतात. विशेषत: त्यांच्या आईचा जडघडणीत मोठा वाटा आहे. प्रत्येक नवीन पद मिळाल्यानंतर त्यांना आईची आठवण व्हायची. त्यांची पत्नी आणि मुलांबद्दल बोलताना त्यांच्यातला कुटुंबवत्सल माणूस आपल्याला दिसतो.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)