कोरोना व्हायरस : 3 आठवड्यांपासून चीनमध्ये घरातच अडलेल्या भारतीय कुटुंबाची कहाणी

फोटो स्रोत, Ashish Yadav
- Author, प्रशांत चहल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
प्रोफेसर आशिष यादव यांच्या अपार्टमेंट बाहेर नजर टाकली तर बाहेरचं दृश्य जणू थिजलं आहे. गार वारा वाहतो आहे, दूरवर एखादी गाडी जाताना दिसते आहे. जगण्यातलं चैतन्यच जणू हरपलं आहे.
गेल्या दोन आठवड्यात फक्त शस्त्रास्त्रधारी सैनिक अपार्टमेंटच्या बाहेर टेहळणी करताना त्यांनी पाहिले आहेत.
त्याचवेळी चीन सरकारच्या अखत्यारीत माध्यमांकडून लक्ष वळवणाऱ्या सूचना मिळत आहेत. या सूचनांमुळे तणाव हलका होण्याऐवजी अगतिकता वाढते आहे.
32 माळ्यांच्या बिल्डिंगमध्ये प्रोफेसर आशिष अक्षरक्ष: नजरकैदेत असल्यासारखे आहेत. आता या बिल्डिंगमध्ये चार-पाच चायनीज कुटुंबं राहत आहेत. आपल्यापर्यंत सरकारी मदत पोहोचेल असं त्यांना अजूनही वाटतं. मात्र आता त्यांना चीनमधल्या वुहान शहरातून बाहेर पडायचं आहे.
विदेशात वाटतेय भीती
35वर्षीय आशिष वुहान टेक्सटाईल विद्यापीठात प्रोफेसर म्हणून काम करतात.
विद्यापीठ आवारातच त्यांची राहण्याची व्यवस्था आहे. दोन खोल्यांच्या घरामध्ये 22 जानेवारीच्या रात्रीपासून ते कोंडले गेले आहेत. त्यांच्याबरोबर बायको नेहा यादव याही आहेत.
आशिष मूळचे उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील आहेत. मात्र गेल्या 12 वर्षांपासून ते भारताबाहेरच आहेत.

फोटो स्रोत, ASHISH YADAV
अमेरिकेतून त्यांनी फिजिक्सचं शिक्षण घेतलं. इटलीतून पीएचडी केली आणि गेल्या पाच वर्षांपासून चीनमध्ये प्रोफेसर म्हणून काम करत आहेत.
कोरोना व्हायरसच्या थैमानानंतर पहिल्यांदाच परदेशात राहताना भीतीची जाणीव झाली असं आशिष सांगतात.
वर्षभरापूर्वीच आशिष वुहानला राहायला आले. लेझरस्पेट्रोस्कोपीचे ते जाणकार आहेत.
मात्र आता ते कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसलेल्या शहराचे जणू कैदी झाले आहेत. कोरोनाचं केंद्र म्हणून वुहानचं नाव घेतलं जात आहे.
बळींची संख्या वाढण्याची शक्यता
कोरोना व्हायरसचं आक्रमण थोपवू शकतील असं औषध किंवा लस शास्त्रज्ञांना सापडलेली नाही. अधिकृत आकडेवारीनुसार कोरोना व्हायरसच्या आक्रमणामुळे आतापर्यंत 800हून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे.
2003 मध्ये सार्स नावाच्या रोगाने घेतलेल्या बळींपेक्षा कोरोनाच्या बळींची संख्या जास्त आहे. आशिष यांच्या ओळखीचे तसेच स्नेही चीनी माणसांनी जीव गमावण्याची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आशिष सांगतात, "चीनमध्ये ज्या सोशल मीडिया अप्सचा वापर करता येतो, त्यापैकी अनेक ग्रुप्समध्ये मी आहे. माझे अनेक चीनी मित्र आहेत, त्यांच्या मते मरणाऱ्यांची संख्या जास्त असू शकते. परंतु इथे बातम्या नियंत्रित करून दिल्या जातात. प्रसारमाध्यमांना निष्पक्षपणे वृत्तांकन करण्याची संधी नाही. त्यामुळे खरी बातमी समोर येत नाही. ज्या बातम्या दिल्या जातात त्या सरकारी प्रसारमाध्यमांद्वारे दिल्या जातात."
दीड लाख सैनिकांची फौज
कोरोना व्हायरसबद्दल आम्हाला पहिल्यांदा 26 डिसेंबर 2019 रोजी सांगण्यात आलं. सोशल मीडियावर याची चर्चा होती. विद्यापीठ प्रशासनाने आम्हाला सतर्क केलं होतं. मात्र सामान्य प्रशासनाने तीन आठवडे सगळं काही सुरळीत आहे, असा दावा केला.
यादरम्यान बरेचजण चीनी नववर्ष साजरं करण्याकरता विद्यापीठ सोडून घरी परतले होते. आमच्या अपार्टमेंटमधील बहुतांशजण वुहान सोडून आपापल्या भागात गेले होते. विद्यापीठात जे भारतीय विद्यार्थी होते त्यातले काहीजणही मायदेशी परतले होते.
लवकरच सगळं काही सुरळीत होईल असं स्थानिक प्रशासनाने सांगितलं. म्हणून आम्ही इथेच राहिलो. 21-22 जानेवारीला रात्री अख्ख्या शहराला लॉक करण्यात आलं. सगळ्या सार्वजनिक सेवा बंद करण्यात आल्या. कोणीही आता घरातून बाहेर पडू नका असं सांगण्यात आलं.
त्यानंतर शहरात दीड लाख सैनिकांचा फौजफाटा दाखल झाला जेणेकरून लोक घरातून बाहेर निघणार नाहीत. हे सगळं वेगाने घडलं. सध्याच्या स्थितीला लोकांमध्ये इतकं भीतीचं वातावरण आहे की सरकारने थोडा वेळ सवलत दिली तर लोक शहर सोडून पळून जातील.
मग बाहेर कसं पडणार?
रविवारी सकाळी चार सैनिक आशिष यांच्या अपार्टमेंटमध्ये शिरले. आशिष आणि त्यांची पत्नी नेहा यांना ताप आहे का याची तपासणी करण्यात आली. लवकरच बिल्डिंगला सील करण्यात येईल जेणेकरून तिथे कोणी येऊ नये.
पोलिसांकडून मिळालेल्या या सूचनेने आशिष यांना अधिकच अडचणीत टाकलं. कारण आशिष यांना वुहानमधून बाहेर पडायचं आहे. सैनिकांनी त्यांना एक चांगली बातमीही दिली, ती म्हणजे आशिष काम करत असलेल्या विद्यापीठाच्या प्रांगणात कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

फोटो स्रोत, ASHISH YADAV
आशिष यांच्या म्हणण्यानुसार स्थानिक प्रशासनाकडून त्यांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. सगळे बाजार बंद आहेत. विद्यापीठातील एका वरिष्ठ सहकाऱ्याने त्यांना तांदळाचा साठा पाठवून दिला. मात्र तोही पुढच्या दोन दिवसात संपून जाईल.
आशिष यांनी केलेल्या दाव्यानुसार बीजिंगस्थित भारतीय दूतावासाने त्यांना चीनमधून मायदेशी जाण्यासाठी अनुमती दिली आहे. परंतु अपार्टमेंटमधून निघून विमानतळावर पोहोचेपर्यंत जाण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. भारतीय दूतावासाने त्यांना एका ड्रायव्हरचा नंबर दिला मात्र त्या ड्रायव्हरने विमानतळावर सोडण्यास नकार दिला.
दोन विमानांच्या व्यवस्थेनंतरही भारत सरकार चीनमधल्या उर्वरित भारतीयांसाठी विमान पाठवेल असं आशिष यांना वाटत होतं. मात्र यासंदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कोणतीही घोषणा केलेली नाही.
"भारतीय दूतावास चीन सरकारशी यासंदर्भात बोलत नाहीये किंवा चीन सरकार भारतीय दूतावासाचं ऐकत नाहीये. आम्हाला काहीच कळत नाहीये. हॉटलाईनवर देण्यात आलेल्या नंबरवर झालेल्या बोलण्यानुसार यासंदर्भात अद्याप तोडगा निघालेला नाही. फोन केल्यावर ते म्हणतात, घरीच राहा, चिंता करू नका, जास्त काळजी कराल तर आजारी पडाल."
बीजिंगस्थित भारतीय दूतावासाने खूबे प्रांतात अडकलेल्या भारतीयांकरता अधिकृत ट्वीटर हँडलवरून हॉटलाईन नंबर दिले. तिथल्या भारतीय नागरिकांना सर्वतोपरी मदत देण्यात येईल असं म्हटलं होतं.
कोरोना व्हायरसचा धोका किती?
वुहान शहरातील 43 आणि आणि खूबे प्रांतातील 90 भारतीयांना ते ओळखतात. त्यांच्या मते खूबे प्रांतात अजूनही 70 भारतीय माणसं आहेत.
आशिष यांच्या काही मित्रांना गेल्या काही दिवसांपासून ताप आणि अन्य लक्षणं दिसू लागली आहेत. परंतु हे कोरोना व्हायरसशी संबंधित नाही. कोरोना व्हायरसच्या चाचणीसंदर्भात त्यांच्यापर्यंत वैद्यकीय मदत पोहोचलेली नाही.

फोटो स्रोत, ASHISH YADAV
चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार 14 फेब्रुवारीला लॉकडाऊनमध्ये थोडी सवलत देण्यात येईल. मात्र सध्याची परिस्थिती बघता ही तारीख पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे.
चीनमध्ये आतापर्यंत 35,000 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. हे लक्षात घेऊन चीन सरकारने वुहानमध्ये हंगामी पातळीवर एक हॉस्पिटल सुरू केलं आहे. यामध्ये 1500 रुग्णांना भरती केलं जाऊ शकतं.
किती काळजी घेण्यात येते?
जागतिक आरोग्य संघटनेनुसार 25हून अधिक देशात कोरोना व्हायरस संक्रमित झाला आहे. विविध देशांमध्ये मिळून 270 कोरोना व्हायरस केसेसची नोंद झाली आहे.
हाँगकाँग प्रशासनाने कठोर आदेश देताना म्हटलं आहे की, जी माणसं चीनमधून येत आहेत त्यांना दोन आठवड्यांकरता हॉटेलची खोली किंवा सरकारद्वारे तयार करण्यात आलेल्या केंद्रात एकट्याने राहावं लागेल.
कोरोना व्हायरसची लागण झपाट्याने वाढू नये म्हणून बहुतांश देशांनी कठोर उपाययोजना केली आहे.

फोटो स्रोत, Reuters
कोरोना व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तींनी गर्दीत जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.
भारत सरकारनेही चीनहून आलेल्या नागरिकांना दिल्लीजवळच्या एका खास वैद्यकीय शिबिरात ठेवलं आहे.
जी माणसं चीनहून स्वत:हून परत आहेत त्यांचं स्क्रीनिंग केलं जात आहे. गेल्या काही आठवड्यात चीनहून आलेल्या माणसांचंही स्क्रीनिंग केलं जात आहे, असं भारत सरकारने म्हटलं आहे.
मात्र हाँगकाँगसारखा कठोर निर्णय भारत सरकारने अद्याप घेतलेला नाही.
चीनहून भारताचा प्रवास
शुक्रवारी क्वालालंपूरमार्गे चीनमधील हेनान भागातून भारतात परतलेल्या डॉक्टर मोहम्मद शाहीद यांनी आपला अनुभव बीबीसीला सांगितला.
34 वर्षीय डॉक्टर शाहीद उत्तर प्रदेशातील आझमगढ जिल्ह्याचे रहिवासी आहेत. ते केमिस्ट्री विषयाचे जाणकार आहेत. चीनमधल्या खूबे प्रांतानजीकच्या हेनान भागातील सेंट्रल विद्यापीठात ते रिसर्च सायंटिस्ट आहेत.

फोटो स्रोत, EPA
हेनान या भागात कोरोना व्हायरसची लागण होणाऱ्यांचं प्रमाण बऱ्यापैकी आहे. डॉक्टर शाहीद काईफिग भागात राहतात. 17 फेब्रुवारीपर्यंत हा भाग प्रशासनाने लॉक केला आहे. यामुळे लोकांच्या जाण्यायेण्यावर मर्यादा येतात.
डॉक्टर शाहीद भारतात परतले तेव्हा कोरोना व्हायरसची लागण झालेल्या वीसहून अधिक केसेसची पुष्टी झाली आहे.
वुहानप्रमाणे काईफिग भागातही सार्वजनिक यंत्रणा बंद आहेत. लोकांनी घरातून बाहेर पडू नये असा आदेश देण्यात आला आहे.
तुम्ही तिथून भारतात कसे पोहोचलात यावर डॉक्टर शाहीद सांगतात, ओळखीच्या एका ड्रायव्हरने तिथून बाहेर पडायला मदत केली. त्याने मला विमानतळावर सोडलं. मी क्वालालंपूरला जाणारं विमान पकडलं. कारण चीनहून भारताला जाणारं थेट विमानच नव्हतं.
अजब धोरण
क्वालालंपूरहून मलिंडो एअरलाईन्सची फ्लाईट पकडून डॉक्टर शाहीद उत्तर प्रदेशातल्या वाराणसीला पोहोचले. वाराणसी विमानतळावर भारतीय एजन्सीला चीनहून कोणी प्रवासी आले आहेत का, याची माहितीच नव्हती.
त्यामुळे वाराणसी इमिग्रेशनला त्यांना अडवण्यात आलं. त्यांची थर्मल तपासणी करण्यात आली. चीनशी निगडीत माहिती विचारण्यात आली. ते कोणत्या भागातून आले, वुहानमधल्या कोणाशी संपर्क झाला का? असे प्रश्न विचारण्यात आले.
आझमगढ जिल्ह्यातील मेडिकल ऑफिसरच्या पवित्र्याने डॉक्टर शाहीद हैराण आहेत.
"आम्ही घरी पोहोचलो तेव्हा काही ऑफिसर्सनी घरी फोन केला. बाहेर पडू नका असा सल्ला त्यांनी दिला. चार जणांची टीम त्यांच्या घरी पोहोचली. दहा फूट दूर राहून ही टीम आमच्याशी बोलत होती. अन्य कोणीतरी वापरलेला मास्क घेऊन ते घरी आले होते. खुर्चीवर तो मास्क ठेऊन ते निघून गेले."
त्या चार सदस्यीय टीममधले डॉक्टर अशा प्रकारच्या चाचणीसाठी तयार नसल्याचं शाहीद यांना वाटतं.
जिल्हास्तरीय चमूने डॉक्टर शाहीद यांना असं सांगितलं की ते त्यांच्या देखरेखीखाली आहेत.
दरम्यान केरळवगळता देशातल्या अन्य राज्यात कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे रुग्ण आढळलेले नाहीत. केरळमध्ये तीनजणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यानंतर तिथे आरोग्य आणीबाणी जारी करण्यात आली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

























