You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अनिल अंबानींनी केली दिवाळखोरी जाहीर, संपत्ती 'शून्य' असल्याचा दावा #5मोठ्याबातम्या
वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. अनिल अंबानींनी स्वतःला केलं दिवाळखोर घोषित, संपत्ती 'शून्य' असल्याचा दावा
कधीकाळी अब्जाधीश असणारे आणि जगात सहाव्या क्रमांकावरचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून नाव नोंदवलेले अनिल अंबानी यांनी आपण बँकरप्ट झाल्याचं म्हटलं आहे. यूके कोर्टाला त्यांनी ही माहिती दिली आहे. आपली नेट वर्थ म्हणजेच एकूण मालमत्ता शून्य असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. ही बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. इंडस्ट्रीयल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना लि. (ICBC), चायना डेव्हलपमेंट बँक आणि एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ चायना या तीन चीनी बँकांनी अनिल अंबानी यांच्याविरोधात यूके उच्च न्यायालयात जवळपास 5 हजार कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे.
इंडस्ट्रीयल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना लि. (ICBC), चायना डेव्हलपमेंट बँक आणि एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ चायना या तीन चीनी बँकांनी अनिल अंबानी यांच्याविरोधात यूके उच्च न्यायालयात जवळपास 5 हजार कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे.
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशनने (RCom) कर्ज बुडवल्याचा या बँकांचा आरोप आहे. खटला सुरू होण्याआधी अनिल अंबानी यांनी कोर्टात 4690 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश कोर्टाने द्यावे, असं चीनी बँकांचं म्हणणं होतं. मात्र, त्यांनी 715 कोटी रुपये भरावे, असे आदेश कोर्टाने दिले. त्यावर आपण बँकरप्ट झाल्याच्या अंबानी यांनी म्हटलं. त्यांच्या वक्तव्याचा न्यायमूर्तींनी चांगलाच समाचार घेतला.
जस्टिस वॉक्समन म्हणाले, "अंबानी स्पष्टपणे खोटं बोलले आहेत. ते सांगत आहेत त्यापेक्षा त्यांची मालमत्ता किंवा उत्पन्न नक्कीच जास्त आहे. माझ्या मते त्यांच्या कुटुंबीय त्यांना सहकार्य करू शकतात आणि 715 कोटी रुपये ही रक्कम त्यांना परवडणारी असल्याने त्यांनी ती भरावी. मुकेश अंबानी यांची संपत्ती बघता कोर्टाने सांगितलेली रक्कम भरण्यास आपण सक्षम नाही, असं म्हणणं हास्यास्पद ठरेल. हे एक अत्यंत श्रीमंत कुटुंब आहे आणि यापूर्वीही त्यांनी एकमेकांना आर्थिक सहकार्य केलं आहे."
2. औरंगाबाद : सिल्लोड जळीतकांडातील महिलेचा मृत्यू
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात रॉकेल टाकून पेटवून दिलेल्या 50 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. घाटी (शासकीय) रुग्णालयात उपचार सुरू असताना या महिलेचा मृत्यू झाला.
शरीर सुखाला नकार दिल्यानंतर बिअर बार चालक संतोष मोहिते याने गेल्या रविवारी घरात घुसून या महिलेवर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले. असं दिव्य मराठीने म्हटलं आहे. या घटनेत ही महिला 95% भाजली होती. आरोपी संतोष मोहितेला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला फाशी देण्याची मागणी महिलेच्या मुलीने केली आहे.
या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी हिंगणघाटमध्ये एका युवकाने शिक्षिकेवर रॉकेल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला होता.
3. हिंगणघाट : पीडितेच्या उपचाराचा खर्च उचलण्याची आनंद महिंद्रा यांची इच्छा
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जळीतप्रकरणातील पीडित तरुणीच्या उपचाराचा खर्च उचलण्याची तयारी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी दाखवली आहे. 'पीडित तरुणीला आणि तिच्या कुटुंबीयांना कुणी ओळखत असेल तर मला माहिती द्यावी', असं आवाहन त्यांनी सोशल मीडियावरून केलं आहे. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.
गेल्या सोमवारी हिंगणघाटमध्ये ही घटना घडली. महाविद्यालयात शिक्षिका असलेली ही तरुणी सकाळी सकाळी महाविद्यालयात जात असताना एका तरुणाने मागून येत तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. नागपुरातल्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत.
4. श्रीमंतांच्या नाईटलाइफवर लक्ष देण्यापेक्षा गरिबांकडे पाहा - फडणवीस
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी नाईट लाईफ उपक्रमावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. परभणीतल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईतल्या श्रीमंतांच्या पोरांची चिंता करून तुम्ही नाईट लाईफ सुरू केली. पण गावाखेड्यात वीज नाही म्हणून पिकांना पाणी देता येत नाही. ही बातमी लोकमतने दिली आहे.
शेतकरी रात्री जीव धोक्यात घालून शेतात जाऊन पिकांना पाणी देतात. त्यामुळे सरकारने रात्रीची वीज सुरळीत करावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. परभणीत संजीवनी एज्युकेशन सोसायटी, आनंद शिक्षण प्रसारक मंडळ आणि संजीवनी मित्र मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे मराठवाड्याचं नुकसान होत असल्याचंही ते म्हणाले.
5. 'कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी 15 एप्रिलपर्यंत पूर्ण करा'
शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी 15 एप्रिलपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे. देशातली सर्वात मोठी आणि अल्पावधीत राबवली जाणारी योजना यशस्वी करून दाखवा, असं आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना केलं आहे.
तर शेतकऱ्यांशी चांगलं वागा आणि सरकारबद्दल नाराजी राहणार नाही, याची काळजी घ्या, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.
जिल्हा यंत्रणेने 31 मार्चपूर्वी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करण्याचे प्रयत्न करावे. जास्तीत जास्त 15 एप्रिलपर्यंत योजना पूर्ण झाली पाहिजे, असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 34 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. कर्जमाफीची ही रक्कम जवळपास तीस हजार कोटी रुपये आहे. पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी 15 फेब्रुवारीपर्यंत जाहीर होणार आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)