केरळमध्ये घरातल्या नळातून चक्क बिअर, ब्रँडी आणि रम यांचं कॉकटेल

फोटो स्रोत, Fairfax Media/getty images
तुम्ही तुमच्या घरी आहात, तुम्हाला तहान लागते, तुम्ही ग्लास घेता, घरातला पाण्याचा नळ चालू करता, पण नळातून पाणी न येता चक्क दारूच येत असेल तर?
हो, अगदी बरोबर वाचलंत. अशीच घटना केरळमध्ये घडली आहे. केरळच्या त्रिचूर जिल्ह्यातील चालाकुडी गावातल्या एका रहिवासी अपार्टमेंटमध्ये घरातील नळांमधून पाण्याऐवजी चक्क बिअर, ब्रँडी आणि रम यांचे कॉकटेल येत होतं.
केरळ उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अजब कल्पनेतून हे सारं नाट्य घडलं. घरगुती नळांमधून दारू मिळण्याचा किस्सा सध्या केरळमध्ये प्रचंड चर्चेत आहे.
चालाकुडी गावात एका परिसरात सोलोमन अव्हेन्यू नावाची एक रहिवासी इमारत आहे. इथं साधारणपणे 18 फ्लॅट आहेत. याच इमारतीच्या बाजूला लागून थोड्या अंतरावर एक बारसुद्धा आहे.
झालं असं की इथल्या उत्पादन शुल्क विभागाने एका बारवर धाड टाकली. या धाडीत त्यांनी बिअर, ब्रँडी आणि रम असा एकूण 6 हजार लिटरचा मुद्देमाल जप्त केला.
स्थानिक रहिवासी आणि अपार्टमेंटचे मालक जोशी मलयेक्कल यांनी याबाबत बीबीसीला अधिक माहिती दिली. "उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडीनंतर अपार्टमेंट आणि बार यांच्यामध्ये एक खड्डा खणला. रविवारी जप्त केलेली सगळी दार त्यांनी या खड्ड्यांमध्ये ओतली. पण सोमवारी सकाळी आमच्या आपार्टमेंटमधल्या किचनमधील नळाला तपकिरी रंगाचं पाणी येऊ लागलं. या पाण्याचा वासही अगदी दारूसारखाच होता." असं त्यांनी सांगितलं.

पोलिसांनी खड्ड्यात ओतलेली दारू इथल्या जमिनीत मुरली आणि थेट बाजूच्या विहीरीच्या पाण्यात मिसळली. या विहिरीतून अपार्टमेंटच्या रहिवाशांना पाणीपुरवठा होतो. त्यामुळे बोअर चालू केल्यानंतर पाईपलाईनच्या माध्यमातून ही दारू थेट घरातल्या किचनपर्यंत जाऊन पोहोचली. या घटनेमुळे अपार्टमेंटच्या रहिवाशांना प्रचंड अडचणीला तोंड द्यावं लागलं. अपार्टमेंटमधली मुले शाळेला जाऊ शकली नाहीत, पालकांचाही मोठा खोळंबा झाला.
त्रासिक अवस्थेत रहिवाशांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी आणि पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांची घोडचूक कळून आली. त्यांनी रहिवाशांसाठी पर्यायी पाण्याची सोय केली. पण ती पुरेशी नसल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे.
जोशी सांगतात, "ते आम्हाला दिवसाला 5 हजार लिटर पाणी पुरवत आहेत. पण हे पाणी आमच्यासाठी पुरेसं नाही. आता तीन दिवस झाले. विहिरीतलं पाणी उपसून बाहेर काढलं जात आहे. पण हे काम लवकर होईल असं वाटत नाही. विहिरी रिकामी करण्यासाठी एक महिन्याचा वेळ लागू शकतो."

मद्याचा अनधिकृत साठा केल्याप्रकरणी स्थानिक न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित बारवर धाड टाकण्यात आली होती. या धाडीनंतर बारवर सहा वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसीने केला. पण उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिटींगमध्ये व्यस्त असल्याचं सांगत बीबीसीच्या प्रतिनिधींना प्रतिसाद दिला नाही.
एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर काही गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, साधारणपणे दारुचा साठा जप्त केल्यानंतर तो जाळून दिला जातो. स्थानिकांना या बाबीचा त्रास होऊ नये यासाठी एक खड्डा खणून ही दारू नष्ट करण्यात आली.
तर विहीर प्रदुषित झाली आहे, त्यामुळे याबाबत तक्रार दाखल करण्यात आल्यास पोलीस कायदेशीर कारवाई करु शकतात, असं जिल्ह्यातील एका वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
























