Corona Virus: केरळमध्ये कोरोना व्हायरसचा तिसरा रुग्ण आढळल्यानंतर 'आरोग्य संकट' जाहीर

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, EPA

    • Author, इमरान कुरेशी
    • Role, बंगळुरूहून, बीबीसी हिंदीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

केरळमध्ये कोरोना व्हायरसचा तिसरा रुग्ण आढळल्यानंतर आता केरळ सरकारने राज्यात 'आरोग्य संकट' असल्याची घोषणा केली आहे.

कोरोना व्हायरस रोखण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व पावलं उचलेल, अशी माहिती केरळच्या आरोग्यमंत्री केके शैलजा म्हणाल्या. केरळमधील सर्व राज्य कोरोना व्हायरसशी सामना करण्यासाठी सज्ज असल्याचंही त्यांनी सांगितलं.

चीनमधील वुहान शहरात सर्वप्रथम कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळला आणि तिथं या व्हायरसमुळं मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 400च्या वर गेलीय. चीननंतर जगातील 25 इतर देशांमध्ये कोरोना व्हायरस पसरला.

यापूर्वी 31 जानेवारी रोजी चीनमधून केरळमध्ये परतलेल्या एका विद्यार्थ्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर 2 फेब्रुवारी रोजी दुसरा रुग्ण आढळला होता, ज्याला एका स्वतंत्र वॉर्डात ठेवण्यात आलं आहे.

भारतीयांना आणण्यासाठी एअर इंडियाचं विमान

1 फेब्रुवारी रोजी कोरोना व्हायरसचं केंद्रस्थान असलेल्या चीनच्या वुहानमध्ये अडकलेल्या 647 भारतीयांना दोन विशेष विमानांनी भारतात आणण्यात आलं. या विमानात मालदिव्ह्सच्या सात नागरिकांनाही परत आणण्यात आलं.

भारतीय नागरिकांसाठी भारत सरकारनं पुढाकार घेत, एअर इंडियाचं B747 हे विमान वुहान शहरात पाठवलं होतं.

केरळमधली कोरोना व्हायरसची 31 जानेवारी रोजी स्थिती

  • सुमारे 1053 लोकांना निगराणीखाली ठेवण्यात आलंय.
  • 24 सँपल्स पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत.
  • 15 सँपल्स निगेटिव्ह आढळली.
  • 1 सँपल पॉझिटिव्ह आढळलं.
  • गुरुवारी 7 रुग्ण दाखल करण्यात आले.
  • एकूण 15 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

केरळमधल्या विविध हॉस्पिटल्समध्ये एकूण 15 जणांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं असून सुमारे 1053 जणांना निगराणीखाली ठेवण्यात आलं आहे.

चीनमधून पसरलेल्या या व्हायरसमुळे आतापर्यंत 170 जणांचा बळी गेलाय.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

केरळ सरकारने पुण्याच्या इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे 24 सँपल्स पाठवली होती. यापैकी 1 सँपल पॉझिटिव्ह आढळलं तर 15 सँपल्स निगेटिव्ह आढळली. याशिवाय त्रिशूरच्या हॉस्पिटलकडे चाचणीसाठी देण्यात आलेल्या तीन सँपल्सचे रिपोर्ट्स अजून यायचे आहेत.

नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितलं, "लोक गटांमध्ये येत नाहीत. ते विविध विमानतळांवर एक किंवा दोनच्या संख्येने येत आहेत. या लोकांमध्ये जर ताप किंवा संसर्ग झाल्याची लक्षणं दिसल्यास त्यांची ताबडतोब तपासणी करण्यात येत असून त्यांना निगराणीखाली ठेवण्यात येत आहे."

केरळमधले अनेक विद्यार्थी चीनमध्ये शिकत आहेत. चीनच्या वुहान युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मेडिसीनमध्ये शिकणाऱ्या 56 विद्यार्थ्यांना परत आणण्यात आलंय.

या मुलांना परत आणण्याचा निर्णय डॉ. शैलजा यांनी केंद्र सरकारवर सोडला होता. या मुलांना आधीपासूनच चीनमध्ये 'आयसोलेशनमध्ये' म्हणजेच एकांतात ठेवण्यात आलं होतं. हा व्हायरस झपाट्याने पसरत असल्याने संशयितांना सर्वांपासून वेगळं ठेवण्यात येतंय.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, @MOHFW_INDIA

भारतामध्ये कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळल्याच्या वृत्ताला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दुजोरा दिलाय.

आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं, "भारतामध्ये कोरोना व्हायरसचं पहिलं प्रकरण आढळण्याच्या खूप आधीच आम्ही या विषाणूचं योग्य निदान व्हावं आणि त्यावर उपचार व्हावेत याची पुरेशी काळजी घेतलेली आहे."

तर कोरोना व्हायरसच्या संसर्गाची लक्षणं आढळलेल्या सगळ्या रुग्णांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना डॉ. शैलजा यांनी केरळच्या सर्व सरकारी हॉस्पिटल्सना दिल्या आहेत.

"या व्हायरसची एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला लागण होऊ शकत असल्याने खबरदारीचे हे उपाय योजणं गरजेचं होतं," असं केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी म्हटलंय.

आपण यापूर्वीही अशाप्रकारची परिस्थिती हाताळली असल्याचं निपाह व्हायरसचा दाखला देत त्यांनी म्हटलंय.

पिनराई विजयन

फोटो स्रोत, FB/PINARAYI VIJAYAN

फोटो कॅप्शन, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन

बंगळुरूच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अॅण्ड न्यूरो सायन्सेसमधील व्हायरॉलॉजीचे प्राध्यापक व्ही. रवी यांनी बीबीसीला सांगितलं, "आम्ही सार्ससोबतच निपाह व्हायरस दरम्यानही परिस्थिती उत्तम प्रकारे हाताळली होती. ज्या लोकांमध्ये संसर्गाची लक्षणं आढळली त्यांना निगराणीखाली ठेवण्यात आलं आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आले."

पण 60 ते 70 टक्के प्रकरणांमध्ये संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये कोणतीही गंभीर लक्षणं दिसून येत नसल्याचंही डॉ. रवी सांगतात. ज्येष्ठ नागरिक, मधुमेहाचे रुग्ण आणि इतर आजारांचा सामना करणाऱ्या लोकांवर याचे गंभीर परिणाम दिसून आले आहेत.

भारत सरकारच्या सूचना

चीनमधून परतणाऱ्या लोकांसाठी भारत सरकारने एक अॅडव्हायजरी प्रसिद्ध केली आहे. या सूचनांनुसार -

  • चीनहून परतल्यानंतर पुढचे 14 दिवस या लोकांनी घरात सर्वांपासून जरा दूर रहावं.
  • वेगळ्या खोलीत रहावं.
  • फक्त कुटुंबाच्याच संपर्कात रहावं. बाहेरच्यांशी संपर्क ठेवू नये.

भारतात खबरदारीचे उपाय

देशातल्या सात विमानतळांवर भारत सरकारने थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था केलेली आहे. चीन वा हाँगकाँगमधून परतणाऱ्या एखाद्या व्यक्तीमध्ये संसर्गाची लक्षणं आढळल्यास त्याची इथे ताबडतोब तपासणी केली जाईल.

हा व्हायरस मर्स आणि सार्स विषाणूंप्रमाणेच प्राण्यांपासूनच आल्याचं नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलचे संचालक डॉ. सुजीत कुमार यांनी बीबीसीला सांगितलं.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

10 दिवसांच्या आता हा व्हायरस 40पासून 550 लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. आतापर्यंत चीनपुरता मर्यादित असणारा हा विषाणू आता 5 ते 6 देशांमध्ये पोहोचलाय.

ते म्हणतात, "हा व्हायरस अमेरिकेपर्यंत पोहोचलेला आहे. आपल्या देशातले लोकही चीनला जातात. सुमारे 1200 विद्यार्थी चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. यातले बहुतेक वुहान प्रांतातच आहेत. अशात आता ही मुलं परतली तर हा व्हायरस भारतात येण्याची शक्यता खूप जास्त वाढते."

बीबीसी

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)