देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांना जिल्हा परिषद निकालांनंतर असा हाणला टोला #5मोठ्याबातम्या

जयंत पाटील, देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Facebook / Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आजचे पेपर आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या...

1. जिल्हा परिषद निकालांनंतर फडणवीस यांचा जयंत पाटलांना टोला

विदर्भापासून भाजपच्या पराभवाची सुरुवात झाली, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी केली होती. त्याला उत्तर देत, शेजाऱ्याच्या घरी मुलगा झाला म्हणून आपण पेढे वाटू नये, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेपेक्षा आमच्या पक्षाची कामगिरी चांगली आहे, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं. प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाजपचे सुसज्ज कार्यालय सुरू करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

भाजपने काल दिवसभर विविध विषयांवर चिंतन बैठक घेतली. त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, संघटनमंत्री विजय पुराणिक आणि इतर नेते सहभागी झाले होते. लोकसत्ताने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

2. विरोधकांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांना ममता बॅनर्जींचा झटका

विरोधी पक्षांची बैठक बोलावून सरकारला विरोध करण्याच्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या प्रयत्नांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धक्का दिला आहे. 13 जानेवारी रोजी सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे.

ममता बॅनर्जी

फोटो स्रोत, Getty Images

डावे पक्ष आणि काँग्रेसकडून ममता बनर्जी यांच्यावर सतत टीका होत आहे. त्यामुळे बॅनर्जी यांनी हा निर्णय घेतला असावा.

पश्चिम बंगालमधील हिंसाचारानंतर विरोधकांनी ममता बॅनर्जी यांना दोषी ठरवत त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा हिंसाचार घडवल्याचा आरोप केला होता. हे वृत्त हिंदुस्तान टाइम्सने प्रसिद्ध केले आहे.

3. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयिताला अटक

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या ऋषिकेश देवडीकर उर्फ मुरली याला झारखंडमधील धनबाद येथून अटक करण्यात आली आहे. तो मूळचा महाराष्ट्रातील औरंगाबादचा असून ओळख बदलून धनबादमध्ये राहात होता, असं पोलिसांनी सांगितलं.

या प्रकरणात एसआयटीने आतापर्यंत 18 जणांना अटक केली आहे. हे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने प्रसिद्ध केले आहे.

धनबाद जिल्ह्यातील कतरास येथे तो एका पेट्रोल पंपावर काम करत होता. पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक करण्यात यश मिळवलं. त्याच्या घराची झडती घेतली जात असून, त्यातून काही माहिती हाती लागण्याची शक्यता आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

4. हिंसाचार थांबल्यावरच CAAवर सुनावणी - सरन्यायाधीश बोबडे

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशात सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये हिंसाचार थांबवल्यावरच आम्ही त्या कायद्याविरोधात आलेल्या याचिकांवर सुनावणी घेऊ, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालय

फोटो स्रोत, Getty Images

या सुधारित कायद्याविरोधात 60 याचिका दाखल झाल्या असून, त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली जात होती. मात्र हिंसाचार थांबल्याशिवाय सुनावणी नाही, असं सुप्रीम कोर्टाने आधीही जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात झालेल्या हिंसाचारानंतर म्हटलं होतं.

तेच न्यायालयाने आजही स्पष्ट केलं. ही बातमी लोकमतने प्रसिद्ध केली आहे.

ही सुधारणा वैध असल्याचं जाहीर करावं, अशीही एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. भूषण गवई, न्या. सूर्य कांत यांनी नाराजी व्यक्त केली असून, एखादा कायदा वैध आहे हे आम्ही कसं जाहीर करणार, असा प्रश्नही त्यांनी याचिकाकर्त्यांना विचारलाय.

5. 2018 मध्ये दररोज 80 खून, 91 बलात्कार

2018 साली देशात दररोज 80 हत्या, 91 बलात्कार आणि 289 अपहरणाच्या गुन्ह्यांची नोंद होत असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. 2018 मध्ये एकूण 50 लाख 74 हजार 634 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

संपूर्ण वर्षभरात 29,017 हत्या प्रकरणांची नोंद झाली 2017 पेक्षा त्यामध्ये 1.3 टक्क्यांची वाढ दिसून आली. अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये 2017च्या तुलनेमध्ये 10.3 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. वर्षभरात 1 लाख 5 हजार 536 लोकांचे अपहरण झाल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट झाले. महिलांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या 3 लाख 78 हजार 277 इतकी नोंदली गेली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)