महाराष्ट्र केसरी: हर्षवर्धन सदगीरने केला शैलेश शेळकेचा पराभव

63व्या 'महाराष्ट्र केसरी स्पर्धेची चांदीची गदा अखेर हर्षवर्धन सदगीर याने पटकावली.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अॅमनोरातर्फे म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या अंतिम सोहळ्यात हर्षवर्धनने त्याचाच मित्र असलेला शैलेश शेळकेला चितपट केलं.
या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे दोन्ही पैलवान काकासाहेब पवारांच्या तालमीत तयार झालेले आहेत. त्यामुळे हर्षवर्धनने पराभूत मल्ल आणि मित्राला खांद्यावर घेऊन खिलाडूवृत्ती दाखवली.

या 63व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या खुल्या गटाची अंतिम लढत सोमवारी मोठ्या चुरशीच्या वातावरणात पार पडली.
महाराष्ट्र केसरी खुला गट माती विभागातील अंतिम फेरीत तुल्यबळ, अतीतटीची, रोमहर्षक, चुरसीची अशा अनेक विशेषणांनी पार पडली. निर्धारित वेळेच्या शेवटच्या 4 सेकंदातही अंतिम विजेता कोण याविषयी संभ्रम निर्माण करत 'काटे की टक्कर' देत लातूरचा शैलेश शेळके व सोलापूरचा ज्ञानेश्वर जमदाडे यांची लढत झाली.
शैलेशने ज्ञानेश्वरवर 11-10 अशा अतीतटीच्या गुणसंख्येने विजय मिळविला व मानाच्या महाराष्ट्र केसरी किताबाच्या अंतिम लढतीत जागा निश्चित केली.

फोटो स्रोत, Maharashtra Wrestling Association
नाशिक जिल्ह्याच्या हर्षवर्धन सदगीरने मागील महाराष्ट्र केसरी पुणे शहराचा अभिजीत कटकेला 5-2 गुणांनी पराजित केले. त्यामुळे ही आजच्या दिवसातील विशेष लक्षवेधी लढत ठरली. तोडीस तोड चपळ लढत देत अखेर हर्षवर्धनने महाराष्ट्र केसरी किताबच्या लढतीस सज्ज झाला.यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, "दोन्हीही मल्ल माझ्यात तालमीत तयार झाले आहेत. दोघेही ग्रीको रोमन कुस्ती खेळून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व जागतिक खेळाडू झाले आहेत. मात्र महाराष्ट्र केसरी किताबासाठी दोघेही प्रथमच खेळत आहेत. ते तगडे पैलवान आहेत याचा मला विश्वास होताच म्हणूनच दोघांनाही वेगवेगळ्या विभागातून मैदानात उतरविले. त्यांनी केलेल्या मेहनतीचे त्यांना फळ मिळाले."
"दोघेही माझेच पठ्ठे असल्याने घरात गुण्यागोविंदाने राहायचे मात्र गादीवर प्रतिस्पर्धी म्हणूनच राहायचं हे संगितले आहे. विजयी कोणीही झाला तरी मला आनंदच असणार आहे. गेली कित्येक वर्ष आमच्या तालमीचे पैलवान महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत जात होते. मात्र विजयाने आजवर आम्हाला हुलकावणी दिली. यंदा मात्र महाराष्ट्र केसरी आमचाच होणार यावर शिक्का मोर्तब झाले आहे, याचा आम्हाला विशेष आनंद आहे."

फोटो स्रोत, Maharashtra Wrestling Association
शैलेश शेळके म्हणाला, "मी गेले अनेक वर्षे काकांच्या तालमीत तयार झालो आहे. आर्थिक परिस्थितीमुळे लष्करात भरती झालो. पण कुस्ती मात्र कधीही सोडली नाही. आजच्या कुस्तीसाठी मानसिक तयारीच महत्त्वाची आहे. उद्या मी डोक्याने खेळ करणार आहे. किताबच्या शर्यतीत पोहचेन याचा आत्मविश्वास मला होता."हर्षवर्धन म्हणाला, "आजची कुस्ती गादीवर असून मी गेले सहा महिने गादीच्या कुस्तीचा सराव करत आहे. आम्ही दोघे एकमेकांचा खेळ जाणतो. त्यामुळे उद्या जो जास्त चांगली कुस्ती खेळेल तोच विजयी होईल."
उपांत्य फेर्यांमधील थरार
2018 चा महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखला चितपट करत ज्ञानेश्वर जमदाडेची घोडदौड.महाराष्ट्र केसरी खुला गटाच्या माती विभागातील उपांत्य फेरीत ज्ञानेश्वर उर्फ माऊली जमदाडे व गतवर्षीच्या महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख यांच्यात चुरसीची लढत झाली. अपेक्षेप्रमाणे बाला रफिकने लीड घेतली होती. पण त्याला तोडीस तोड टक्कर देत माऊलीने एका मिनिटाच्या आत त्याला चितपट करून बाजी मारली व माती विभागातील अंतिम सामन्यात प्रवेश केला.

फोटो स्रोत, Maharashtra Wrestling Association
तसेच लातूरच्या शैलेश शेळकेने हिंगोलीच्या गणेश जगतापवर 6-4 गुण फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.पुणे शहराचा अभिजीत कटके व लातूरचा सागर बिराजदार यांच्यात महाराष्ट्र केसरी गादी विभागासाठी चित्त थरारक तुल्यबळ लढत झाली. यात अभिजीतने सागरवर 2-0 गुणांनी विजय मिळवत गादी विभागातील अंतिम फेरीत प्रवेश केला. तर नाशिक जिल्हयाच्या हर्षवर्धन सदगीरने मुंबई उपनगरच्या सचिन येलवार 6-0 ने हरवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























