CAA : रेल्वेच्या मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांना गोळ्या घाला-सुरेश अंगडी #5मोठ्या बातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आजचे पेपर आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.

1. रेल्वेच्या मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांना गोळ्या घाला-राज्यमंत्री

कोणीही रेल्वेच्या मालमत्तेचं नुकसान करत असल्यास त्याला जागेवरच गोळ्या घालण्याच्या सूचना रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी रेल्वे प्रशासनाला दिल्या आहेत. सध्या देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलनं सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर अंगडी यांनी रेल्वे प्रशासनाला कठोर आदेश दिले आहेत. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे. आंदोलनादरम्यान पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये आंदोलकांनी रेल्वेच्या संपत्तीचं नुकसान केल्याबद्दल प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला उत्तर देताना अंगडी यांनी कठोर आदेश स्पष्ट केला.

रेल्वे सर्वसामान्य जनतेनं भरलेल्या कररुपी पैशावर चालते आणि एक ट्रेन तयार व्हायला अनेक वर्षं लागतात असं अंगडी म्हणाले. कोणीही दगडफेक केल्यास कठोर कारवाई व्हायला हवी. काही स्थानिक अल्पसंख्याक आणि काही समुदाय कारण नसताना देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत असं ते म्हणाले.

2. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा मोह आवरला नाही- शहा

शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा मोह निवडणूक निकालानंतर झाला, शरद पवार यांनी त्यांच्यापुढे मुख्यमंत्रिपदाचे दाणे टाकले ते शिवसेनेने टिपले अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. आमचा सत्तेतला भागीदार विरोधकांसोबत पळून गेला, त्यामुळे महाराष्ट्रात सत्ता स्थापन करू शकलो नाही असंही त्यांनी सांगितलं. 'आजतक'ने ही बातमी दिली आहे.

महाराष्ट्रात आम्ही अजित पवारांना घेऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला त्यात यश आलं नाही. मात्र महाराष्ट्रात आम्ही अपयशी झालो असं मला मुळीच वाटत नाही. शिवसेनेसोबत मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचं ठरलं नव्हतं. आम्ही प्रत्येक सभेत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असं सांगितलं होतं. मात्र शिवसेनेनं तेव्हा ही अट सांगितली नाही. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेनेनं वेगळा निर्णय का घेतला? आता आम्ही ज्या साथीदारावर विश्वास ठेवला तोच विरोधकांसोबत पळून गेला तर काय करणार? मात्र महाराष्ट्रात जे घडलं त्याला मी अपयश मानत नाही असंही त्यांनी सांगितलं.

3. सरकारविरोधात आंदोलनात सहभाग; सुशांत सिंहने गमावलं सूत्रधाराचं काम

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरातून विरोध होत आहे. या कायद्याला विरोध करण्यासाठी मुंबईत झालेल्या आंदोलनात अभिनेता सुशांत सिंह सहभागी झाला होता. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी त्याचं 'सावधान इंडिया' सीरियलच्या निवेदकाचं काम काढून घेण्यात आलं. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.

माझा सावधान इंडियातील प्रवास आता संपला असं ट्वीट सुशांत सिंहने केलं. यासंदर्भात चॅनेलकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. हा शो स्टार भारतवर दाखवला जात आहे. सत्य बोलण्याची किंमत मोजावी लागली का? या प्रश्नावर सुशांत म्हणतो, "ही तर खूप छोटी किंमत आहे मित्रा. भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांना काय उत्तर द्यायचं?"

4. कोस्टल रोडसाठी समुद्रात भराव टाकण्यास सर्वोच्च न्यायालयाची मुभा

मुंबई शहरातील वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी किनाऱ्यालगत 29.2 किमी लांबीचा कोस्टल रोड प्रकल्पाचे काम बंद करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी अंतरिम स्थगिती दिल्याने मुंबई महापालिकेला दिलासा मिळाला. मात्र हा दिलासा अंशत: आहे. कारण कोस्टल रोडसाठी समुद्रात भराव टाकून भूसंपादन करण्यासच सर्वोच्च न्यायालयाने मुभा दिली आहे. रस्त्याचे त्यानंतरचे विकास काम मात्र पुढील आदेश होईपर्यंत करता येणार नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलं. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने ही बातमी दिली आहे.

पर्यावरण रक्षण कायद्यान्वये मंजुरी व वन कायद्यानुसार संमती घेणे बंधनकारक आहे. ती घेईपर्यंत हे काम पुढे सुरू ठेवता येणार नाही असा निकाल उच्च न्यायालयाने 16 जुलै रोजी आठ जनहित याचिकांवर दिला होता. या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. भूषण गवई आणि न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठाने मंगळवारी सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले आणि सविस्तर सुनावणी मार्चमध्ये घेण्याचे ठरवून उच्च न्यायालयाच्या निकालास वरीलप्रमाणे अंतरिम स्थगिती दिली.

5. नागपूरचे महापौर संदीप जोशींवर गोळीबार

नागपुरात विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने कडेकोट सुरक्षाव्यवस्था आहे. मात्र यादरम्यान नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या जीवघेण्या हल्ल्यातून जोशी थोडक्यात बचावले. संदीप जोशी काल रात्री कुटुंबीयांसह नागपूरच्या आऊटर रिंग रोडवरील रसरंजन धाब्यावर जेवायला गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर गोळीबार झाला. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.

हल्ला झाला तेव्हा संदीप स्वत: गाडी चालवत होते. त्यांनी प्रसंगावधान राखत गाडी वळवली. काही दिवसांपूर्वी संदीप यांना धमक्या आल्या होत्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)