उद्धव ठाकरे: चहावाला देशाचा पंतप्रधान झाला, पण त्यांच्या पक्षानेच चहापानावर बहिष्कार टाकला #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या :

1. चहावाला देशाचा पंतप्रधान झाला, पण त्यांच्या पक्षानेच चहापानावर बहिष्कार टाकला - उद्धव ठाकरे

एक चहावाला पंतप्रधान झाला त्याचा अभिमान आहे. पण त्यांच्याच पक्षाने चहावर बहिष्कार टाकला. हे त्यांच्या धोरणाशी किती सुसंगत आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

ठाकरे म्हणाले, "नागपूरमध्ये मी यापूर्वी अनेकदा आलो आहे. पण, मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच आलो आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान आयोजित केलं जातं, असं माझे सहकारी जयंत पाटील यांनी मला सांगितलं. माझी अशी अपेक्षा होती की, प्रथा चहापानाची आहे. पण, या प्रथेमध्ये आणखी एक पोटप्रथा झाली आहे. ती पोटप्रथा म्हणजे विरोधकांनी त्याच्यावर बहिष्कार टाकायचा. आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे.

आपल्या पंतप्रधानांची पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे. एक चहावाला व्यक्ती देशाचा पंतप्रधान झाला. त्याचा आपल्याला अभिमान आहे. तो अभिमान बागळत असताना पंतप्रधान ज्या पक्षाचे नेते आहेत. त्या पक्षानेच बहिष्कार टाकावा. त्यांच्यात मतभेद असतील असं मला वाटत नाही. पण पक्षाच्या धोरणाशी किती सुसंगत आहे?"

2. नाट्यसंमेलन अध्यक्षपदी जब्बार पटेल

अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी अखेर प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि रंगकर्मी डॉ. जब्बार पटेल यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. नाट्यसंमेलनाचं हे १००वं वर्ष असल्याने नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष कोण होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.

या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी आज पटेल यांच्या नावाची घोषणा केली. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने प्रसिद्ध केली आहे.

पटेल यांच्या नावावर आम्ही मागेच शिक्कामोर्तब केलं होतं. आज झालेल्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेऊन पटेल यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येत असल्याचं कांबळी म्हणाले. राज्यात नवं सरकार आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कलाप्रेमी असून ते नाट्यपरिषदेला सर्व सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे, असंही त्यांनी सांगितलं.

3. राहुल गांधींना न्यायालयात खेचणार

'माफी मागायला माझे नाव राहुल सावरकर नाही,' असं विधान करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर हे मानहानीचा दावा करणार आहेत. ही बातमी लोकमतने प्रसिद्ध केली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांची हात जोडून माफी मागितली नाही. केवळ काही अटी मान्य केल्या, हे जगजाहीर असतानाही खोटे विधान करून त्यांची बदनामी केली आहे. स्वातंत्र्यवीरांनी अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, कोलू ओढला.

सावरकरांनी केवळ आपलीच नव्हे तर अन्य क्रांतिकारकांचीही सुटका व्हावी, यासाठी अर्ज केले होते. कारागृहातून कुठल्याही प्रकारे सुटका करून घेऊन आपले कार्य चालू ठेवणं, ही केवळ सावरकर नव्हे, तर सर्वच क्रांतिकारकांची रणनीती होती, सावकरांप्रमाणेच सगळ्यांनीच सरकारी अटी मान्य करून सुटका करून घेतली आणि आपलं कार्य चालू ठेवलं, असे रणजीत सावरकर म्हणाले.

4. भाजपचे सावरकर प्रेम म्हणजे ढोंगीपणा - संजय राऊत

भारतीय जनता पार्टीचे सावरकर प्रेम म्हणजे ढोंगीपणा आहे. साडेपाच वर्षे मोदींचे सरकार केंद्रात आहे. सावरकरांना भारतरत्न द्यावे, अशी मागणी आम्ही केंद्राकडे करत आहोत मग आतापर्यंत का दिला नाही, असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्द्ल केलेल्या विधानावरून वाद सुरू आहे. त्यावर राऊत यांनी सावरकरांबद्द्ल महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या लोकांनी राहुल गांधी यांना माहिती देणं आवश्यक असल्याचे नमूद केले. मुंबईतील सावरकरांचे स्मारक केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच असल्याचं त्यांनी सांगितलं. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

5. पीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचं सहकार्याचं आश्वासन

रिझर्व्ह बँकेने मुंबईतील पंजाब आणि महाराष्ट्र बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. यामुळे खातेदारांना पैसे काढण्यासाठी त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

याच पार्श्वभूमीवर पीएमसीच्या संतप्त खातेदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या खासगी निवासस्थानी धडक देत आंदोलन केले. यावेळी मातोश्रीबाहेर हजारो खातेदार जमा झाले होते. त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही केली.

यानंतर पीएमसीच्या बँकेच्या दोन प्रतिनिधींनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी पीएमसी बँकेच्या खातेधारकांना धीर दिला. तसेच सरकार म्हणून जे जे सहकार्य करता येईल ते करेन असे आश्वासन दिले. तसेच पुढील चर्चेसाठी 21 आणि 22 डिसेंबर अशी तारीख देण्यात आली आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)