प्रकाश जावडेकर: प्रदूषणामुळं आयुष्य कमी होतं, असं कुठेच लिहिलेलं नाही - #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1) प्रदूषणामुळं आयुष्य कमी होत नाही - प्रकाश जावडेकर

प्रदूषणामुळं माणसांचं आयुष्य कमी होतं किंवा आरोग्यावर परिणाम होतो, असं कुठल्याही अभ्यासातून समोर आलं नाहीय, असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं. बिझनेस स्टँडर्डनं ही बातमी दिलीय.

प्रदूषणामुळं माणसांचं आयुष्य साडेचार वर्षांनी घटतं, असं काही संशोधनातून समोर आलंय. तर केंद्र सरकार यावर काय उपाययोजना करतंय? असा प्रश्न लोकसभा सभागृहात तृणमूल काँग्रेसच्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी विचारला.

त्यावर उत्तर देताना प्रकाश जावडेकर म्हणाले, "प्रदूषणावरून लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करू नये. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, या प्रयत्नांना अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतो आहे. शिवाय, प्रदूषण आणि आयुर्मान यांचा परस्परसंबंध असल्याचे कोणत्याही अभ्यासातून दिसून येत नाही."

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटना, लॅन्सेट सेंटर यांसारख्या संस्थांनी प्रदूषणामुळं देशात अनेक मृत्यू होत असल्याचं म्हटलं होतं. लान्सेटच्या अभ्यासानुसार, 2017 साली भारतात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक आठ जणांमधील एकाचा मृत्यू प्रदूषणामुळे झाला होता.

2) मंदीची समस्या गंभीर आहे, हे सरकारनं मान्य करायला हवं - रघुराम राजन

भारतात मंदीची समस्या गंभीर असल्याचं सरकारनं मान्य करायला हवं, असं रघुराम राजन यांनी म्हटलंय. आज तकनं ही बातमी दिलीय. राज्य सरकारांना दोष देण्याऐवजी यातून केंद्रानं मार्ग काढायला हवा, असंही राघुराम राजन म्हणाले.

रघुराम राजन यांनी सत्तेचं अति-केंद्रीकरण आणि पंतप्रधान कार्यालयाकडून ठेवण्यात येत असलेल्या नियंत्रणाबाबतही आक्षेप नोंदवला. पंतप्रधान कार्यालयात अधिकारांचं केंद्रीकरण झाल्यान इतर मंत्र्यांना काम करण्यात अडचणी येत असल्याचं राजन म्हणाले.

3) 'पोक्सो'च्या गुन्हेगारांचा दयेच्या अर्जाचा अधिकार काढून घ्यावा - राष्ट्रपती

महिला आणि बालकांवरील हल्ल्यांमुळं देशाच्या विवेकाला हादरा बसला असून, ज्यांना पोक्सो (Prevention of Children from Sexual Offences Act किंवा POCSO) कायद्याखाली दोषी ठरवण्यात आलंय, त्यांच्या दयेच्या अर्जाचा अधिकार काढून घेतला पाहिजे, असं मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं.

ते राजस्थानमधील माऊंट अबू येथील महिला सुरक्षेवरील कार्यक्रमात बोलत होते. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.

महिलांची सुरक्षा हा गंभीर विषय बनला आहे. यात बरंच काम झालं आणि अजून बरंच काम बाकी आहे. महिलांवर होणारे राक्षसी हल्ले पाहून देशाच्या विवेकाला हादरा बसला आहे. त्यामुळं तुम्ही-आम्ही सर्वजणांनी पुरुषांमध्ये महिलांविषयी आदराची भावना रुजवणे गरजेचे असल्याचं राष्ट्रपती कोविंद म्हणाले. हैदराबाद, उन्नाव इथल्या बलात्काराच्या घटना देशभर चर्चेत असताना राष्ट्रपतींचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.

दुसरीकडे, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही महिलांवरील अत्याचाराबाबत काळजी व्यक्त केलीय. "महिलांनी पुरुषांकडून सत्ता हिसकावून घ्यावी लागेल, जेणेकरून आपल्याविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांना रोखणं शक्य होईल," असं प्रियंका गांधी म्हणाल्या.

लखनऊच्या दौऱ्यावर असताना त्या बोलत होत्या. न्यूज 18 हिंदीनं ही बातमी दिलीय.

4) निवडणुकीच्या तोंडावर गेलेल्यांना लगेच काँग्रेसमध्ये घेणार नाही - थोरात

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसमधून अनेक नेते बाहेर पडले. काहीजण शिवसेना तर काहीजण भाजपमध्ये गेले. मात्र, सत्तासमीकरणं बदलली आणि सेना-राष्ट्रवादीसोबत काँग्रेसही सत्तेत आलं. त्यामुळं आता पक्ष सोडलेल्यांना पुन्हा पक्षात काँग्रेस घेणार का, याची उत्सुकता सगळ्यांनाच होती.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी याबाबत सांगितलं की, "निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेल्यांना पुन्हा लगेच काँग्रेसमध्ये घेणार नाही. पक्षात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विचारून गयारामांना प्रवेश द्यायचा की नाही, ते ठरवू."

लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

वाऱ्याप्रमाणे दिशा बदलणारे संधीसाधू असतात. त्यामुळं पक्ष सोडून गेलेल्यांना पश्चात्ताप होत असून त्यांना असंच काही दिवस तिकडे राहू द्या, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

5) नित्यांनंद यांना आश्रय देण्यास इक्वाडोरचा नकार

अपहरण प्रकरणातील आरोपी नित्यानंद यांना आश्रय देण्यास इक्वाडोर सरकारनं नकार दिला आहे. तसेच, नित्यानंद यांना इक्वाडोरमध्ये जमीन खरेदीस केली नसल्याचंही स्पष्ट इक्वाडोर सरकारनं स्पष्ट केलंय. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.

दुसरीकडे, भारत सरकारनंही नित्यानंद यांच्याविरोधात पावलं उचलली आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं त्यांचा पासपोर्ट रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. तसंच परदेशातील सर्व दूतावासांना नित्यानंद यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्यात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)