You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच आमने-सामने, #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच आमने-सामने
राज्यातील सरकार स्थापनेनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आमने-सामने येणार आहेत. आजपासून (06 डिसेंबर) पुण्यात पोलीस महासंचालकाच्या परिषदेला सुरुवात होत आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यात असणार आहेत. सकाळनं ही बातमी दिली आहे.
राजकीय शिष्टाचारानुसार या परिषदेपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील पंतप्रधानांच्या स्वागताला उपस्थित असणार आहेत.
पुण्यातील पाषाण भागातील पोलीस रिसर्च सेंटर आणि आयसर या दोन संस्थांमध्ये ही परिषद 6 डिसेंबर ते 8 डिसेंबरपर्यंत होणार आहे.
देशाच्या सुरक्षा धोरणांवर चर्चा करणं, देशांतर्गत सुरक्षेचा आढावा घेणं आणि पुढील वर्षासाठी देशाच्या सुरक्षेचा रोडमॅप तयार करणं हा या परिषदेचा मुख्य हेतू आहे.
2. भरती जितकी मोठी, तेवढीच मोठी ओहोटी येते - बाळासाहेब थोरात
समुद्राला जितकी मोठी भरती येते, तेवढीच ओहोटीही मोठी असते, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. झी 24 तासनं ही बातमी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपमधील काही आमदार महाविकासआघाडीच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले, "भाजपमध्ये ओहोटीची सुरुवात झाली आहे. भाजपमध्ये गेलेले अनेक आमदार अस्वस्थ आहेत. आपण चुकीच्या वेळी भाजपमध्ये गेलो, आपण फसलो, अशी भावना त्यांच्या मनात आहे.आम्ही तुर्तास हे नेते काँग्रेसमध्ये परततील का, याची चर्चा केलेली नाही. मात्र, भाजपमधील अनेक जुनी मंडळीही अस्वस्थ आहेत."
दरम्यान, "भाजपानं पक्ष फोडण्याचं जे काम केलं, त्या मार्गानं आम्हाला जायचं नाही. राज्य कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवण्यासाठी सर्वप्रकारे प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्याची महाराष्ट्राने त्यांना शिक्षा दिलेली आहे," असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे.
3. सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लिन चीट
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणात पूर्णत: क्लीन चीट देण्यात आली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.
लाचलूचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या शपथपत्रात अजित पवार यांच्याविरूद्ध कोणतीही फौजदारी कारवाई करता येणार नाही, असं नमूद केलं आहे.
विदर्भातील सिंचन घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी, अशी विनंती करणाऱ्या जनहित याचिकांवर अंतिम सुनावणी होणार होती.
त्यापूर्वीच एसीबीनं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या घोटाळ्याबाबत कोणत्याही प्रकारे जबाबदार धरता येणार नाही, तसंच त्यांच्याविरूद्ध फौजदारी कारवाई करता येणार नाही, असं शपथपत्र हायकोर्टात दाखल केलं आहे.
4. शिवस्मारकाचा अहवाल सादर करा, पंतप्रधान कार्यालयाचा आदेश
अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा सविस्तर अहवाल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून मागवण्यात आला आहे. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.
पिंपरी चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी यातील गैरव्यवहाराची चौकशी ईडी मार्फत करावी, अशी मागणी पंतप्रधानांकडे केली होती. या तक्रारीला उत्तर देताना पंतप्रधानांनी या प्रकरणाला गांभीर्यानं घेत शिवस्मारकाचा अहवाल राज्य सरकारकडून मागवला आहे.
29 नोव्हेंबर 2019 रोजी तसे आदेश पंतप्रधान कार्यालयातून देण्यात आले आहेत.
भापकर यांनी दोन महिन्यांपूर्वी या शिवस्मारकाच्या निविदा प्रक्रिया आणि कंत्राटातील गैरव्यवहाराची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी पंतप्रधान कार्यालयाकडे 25 सप्टेंबर रोजी एका पत्राद्वारे केली होती.
5. 'ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये मंदी असेल, तर रस्त्यावर ट्रॅफिक जाम का होते?'
देशाला आणि मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी काही जणांकडून वाहननिर्मिती क्षेत्रात (ऑटोमोबाईल) मंदी असल्याचं बोललं जात आहे. वाहनांची विक्री खरोखरच घटली असेल, तर मग रस्त्यावर वाहतूक कोंडी का पाहायला मिळते, असा सवाल भाजप खासदार वीरेंद्र सिंह मस्त यांनी गुरुवारी लोकसभेत उपस्थित केला. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या विषयावर लोकसभेत चर्चा सुरु असताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
यावेळी सिंह यांनी कांद्याच्या वाढलेल्या दरासंदर्भातही भाष्य केलं.
ते म्हणाले, "देशात सगळीकडे कांदा महागल्याची चर्चा आहे. मात्र, माझ्या मतदारसंघात (बलिया) चला, मी 25 रुपयांत एक किलो कांदा मिळवून देतो."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)