You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'उद्धव ठाकरेच नवे मुख्यमंत्री, बाळासाहेबांचे स्वप्न साकार' - आजच्या वृत्तपत्रांचे पहिले पान
राज्यातल्या प्रमुख वृत्तपत्रांचे मथळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असेच आहेत. भाजपची माघार आणि शरद पवार यांची राजकीय हातोटी यांचाही उल्लेख बहुतांश वर्तमानपत्रांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडवणीस सरकारने मंगळवारी राजीनामा दिला आणि राज्यातील सत्तापेच सुटला. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांसह इतर घटक पक्षांची महाविकास आघाडी स्थापन करण्यात येत असून, आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात येत असल्याचं या पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले.
लोकसत्ता-उद्धव ठाकरे नवे मुख्यमंत्री
लोकसत्ताने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असा मथळा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस सरकारने मंगळवारी राजीनामा दिला आणि राज्यातला पेचप्रसंग संपुष्टात आला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीने मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा केली. त्यांचा शपथविधी गुरुवारी शिवाजी पार्कवर होणार आहे. ''ज्यांच्यासोबत 30 वर्ष होतो त्या मित्राने विश्वास ठेवला नाही परंतु या काळात ज्यांच्याशी सामना केला त्या राजकीय विरोधकांनी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवला'', असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मटा-सत्ताचक्र फिरले; उद्धव मुख्यमंत्री
भाजपने माघार घेतल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असा मथळा मटाने केला आहे. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांनी त्यांना 3 डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्यासाठी मुदत दिली आहे. दरम्यान गुरुवारी सायंकाळी 6.40 वाजता शिवाजी पार्क इथं उद्धव ठाकरे यांचा शपथविधी होणार आहे.
सकाळ-महासत्तांतर
उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री होण्यावर शिक्कामोर्तब होताच सकाळने महासत्तांतर असा मथळा केला आहे. राज्यातील जनतेला एकामागून एक धक्के देणाऱ्या राजकीय नाट्याचा अखेरचा अंक आज सुरू झाला. अजित पवारांनी साथ दिल्याने भाजपकडे बहुमत उरलं नाही. अजित पवार आणि पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झालं.
लोकमत-भाजपची माघार, आता उद्धव सरकार!
लोकमतने मथळ्यात भाजपची माघार आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार या दोन्ही गोष्टींना एकत्रितरीत्या मांडलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील फडणवीस सरकारला बुधवारी बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला. यानंतर काही तासांतच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची फडणवीस सरकारची आशा संपुष्टात आली. राज्यातील राजकीय घडामोडी भूकंपाप्रमाणेच होत्या असं लोकमतने म्हटलं आहे.
दिव्य मराठी- ठाकरेच सरकार; शरद पवार ठरले महाचाणक्य
सामना - बाळासाहेबांचे स्वप्न साकार!!
"आज वचनपूर्ती झाली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आज पूर्ण होणार! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार! मुख्यमंत्रिपदी विराजमान होणारे उद्धव ठाकरे हे ठाकरे घराण्यातील पहिले नेते आहेत. मंगळवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाआघाडीतर्फे उद्धव ठाकरे यांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आलं," असं सामनाने म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार हे सांगतानाच दिव्य मराठीने शरद पवार महाचाणक्य असा मथळा दिव्य मराठीने केला आहे.
रात्रीत हालचाली करून सत्तारूढ झालेल्या भाजप सरकारला चारच दिवसात सत्तेतून पायउतार करण्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकासआघाडीला मंगळवारी यश आलं. राज्यातील भाजप नेत्यांवर विसंबून राहिल्याने विसंबून राहिल्याने अमित शहांचा प्लॅन बिघडला असं दिव्य मराठीने म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)