You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अजित पवारांच्या सलग ट्वीट्समुळे संभ्रमात भर?
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून त्यांची भूमिका आतापर्यंत फारशी स्पष्ट झाली नव्हती. शनिवारी (23 नोव्हेंबर) ANI वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी केवळ स्थिर सरकारसाठी आपण हा प्रयत्न केला आहे, असं सांगितलं होतं. त्यानंतर एका वाहिनीशी बोलताना अजित पवार यांनी आपण योग्यवेळी भूमिका मांडू असं सांगितलं होतं.
शपथविधीनंतर दीड दिवस लोटल्यानंतर त्यांनी ट्वीटरवरून आपली भूमिका मांडली आहे. अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या सर्व नेत्यांना धन्यवाद देत एकापाठोपाठ एक ट्वीट्स केले.
त्यानंतर अजित पवारांनी "मी अजूनही एनसीपीमध्येच आहे आणि पवारसाहेबच आमचे नेते आहेत. आमची भाजप-राष्ट्रवादी आघाडी राज्याला पुढील पाच वर्षांसाठी स्थिर सरकार देईल आणि राज्याच्या व लोकांच्या कल्याणासाठी सरकार काम करत राहिल," असं लिहिलं. तर दुसऱ्या ट्वीटमध्ये "काळजी करण्याचं काहीच कारण नाही. थोडा धीर धरा. तुमच्या पाठिंब्यासाठी धन्यवाद असं लिहिलं आहे."
अजित पवार यांनी रविवारी (24 नोव्हेंबर) दुपारी चार वाजता अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि सर्वांचेच लक्ष त्यांच्या ट्वीटरकडे गेले. त्यापाठोपाठ त्यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शाह, कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, केंद्रीय मंत्र्यांनी काल दिलेल्या शुभेच्छांना उत्तर देत धन्यवाद दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाशी हातमिळवणी करून सरकार स्थापन करण्याचा प्रश्नच नाही. राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेना आणि काँग्रेसरोबर सरकार स्थापन करण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे. अजित पवार यांचं विधान खोटं असून लोकांमध्ये खोटी प्रतिमा तयार करण्यासाठी केलेलं आहे असं त्यांनी ट्वीट केलं आहे.
अजित पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही आहोत आणि भाजप-राष्ट्रवादीचं सरकार राज्याला स्थैर्य देईल, असंही लिहिल्यामुळे जो संभ्रम झाला आहे त्याबद्दल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना विचारले असता त्यांनी म्हटलं, "ते स्वतः ट्वीट करत आहेत की कोणती एजन्सी किंवा कंपनी करत आहे हे माहिती नाही. मात्र त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे, की शरद पवार हेच त्यांचे नेते आहेत. त्यामुळे आम्हाला आशा आहे, की जी चूक त्यांनी केली आहे, ती ते दुरूस्त करतील."
काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनीही अजित पवारांचे ट्वीट्स म्हणजे दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.
शनिवारी (23 नोव्हेंबर) अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षातून बाहेर काढलं नव्हतं तर त्यांची विधिमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी केली होती. तसेच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि दिलिप वळसे पाटील त्यांना पुन्हा आपल्या गोटात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आज या दोन्ही नेत्यांनी अजित पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यानंतर अजित पवार यांनी ही ट्वीट्स केल्यानंतर ते पुन्हा गोटात परततील की नाही यावर शंका निर्माण झाली आहे. तसेच अजित पवार यांच्या ट्वीटमुळे जो संभ्रम निर्माण झाला आहे त्याचा अर्थ कसा लावायचा यावरही चर्चा सुरु झाली आहे. काही लोकांच्या मते संभ्रम तयार व्हावा यासाठी अजित पवार यांनी मुद्दाम अशी ट्वीट्स केली जात आहेत.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटलेली राष्ट्रवादी कोणती ते मला माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)