IndvsEng पिंक बॉलः डे-नाईट टेस्टमध्ये पिंक बॉल का वापरला जातो?

पिंक बॉल, डे-नाईट टेस्ट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पिंक बॉल
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद इथल्या नव्याने उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम अर्थात मोटेरावर पिंक बॉल टेस्टला सुरुवात होत आहे. ही 16वी डे नाईट टेस्ट असणार आहे. भारतात होणारी ही दुसरी पिंक बॉल टेस्ट आहे. याआधी भारत-बांगलादेश यांच्यादरम्यान कोलकाता इथे 2019 पिंक बॉल टेस्ट झाली होती. ती टेस्ट भारतीय संघाने एक डाव आणि 46 रन्सने जिंकली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात, अॅडलेड इथं झालेल्या डे-नाईट टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर आठ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला होता. याच टेस्टमध्ये भारताचा दुसरा डाव 36 रन्समध्ये आटोपला होता. 

दिवसाउजेडी होणाऱ्या टेस्ट मॅचमध्ये लाल रंगाचा बॉल वापरला जातो तर वनडे आणि ट्वेन्टी-20 मध्ये पांढऱ्या बॉलचा वापर केला जातो. डे-नाईट टेस्ट काही वेळ सूर्यप्रकाशात आणि बराच वेळ कृत्रिम प्रकाशात खेळवली जाते. खेळाडूंचे कपडे पांढऱ्या रंगाचे असतात. पांढरे कपडे आणि पांढरा बॉल असं होऊ शकत नाही.

लाल बॉल कृत्रिम प्रकाशात दिसण्यात अडचण असते. यावर उपाय म्हणून ऑप्टिक यलो आणि नारिंगी रंगाच्या बॉलचा वापर करण्यात आला. मात्र या दोन रंगांच्या तुलनेत पिंक बॉलची दृश्यमानता अधिक आहे. गवतावर हा बॉल नीट दिसू शकतो तसंच कृत्रिम प्रकाशात बॅट्समनला हा बॉल सहजतेने दिसू शकतो.

पिंक बॉल, डे-नाईट टेस्ट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पिंक बॉल आणि डे-नाईट टेस्ट

पिंक बॉल वेगळ्या पद्धतीने बनवला जातो का?

लाल, पांढरा आणि गुलाबी- प्रत्येक क्रिकेट बॉल रबरने बनलेला असतो. डायचा रंग बदलतो आणि फॉरमॅटनुसार फिनिशिंग बदलतं. टेस्ट मॅचमध्ये वापरला जाणारा लाल बॉल ग्रीसमध्ये ठेऊन मग वापरण्यासाठी सज्ज होतो. जेणेकरून पाणी बॉलमधल्या लेदरमध्ये शिरू नये. मात्र डे-नाईट टेस्टसाठी वापरण्यात येणारा पिंक बॉल ग्रिसमध्ये ठेवला जाऊ शकत नाही कारण तसं केलं तर पिंक बॉलची झळाळी निघून जाईल.

पिंक बॉलवर गुलाबी रंगाचा अतिरिक्त मुलामा दिला जातो. जेणेकरून कृत्रिम प्रकाशात हा बॉल चमकेल. फिल्डर, बॅट्समन ,स्टेडियममधील प्रेक्षक तसंच टीव्हीवर मॅच पाहणारे चाहते यांना हा चेंडू नीट दिसत राहतो. मात्र चेंडू पिंक ठेवण्यासाठी एवढा खटाटोप करावा लागत असल्याने टेस्ट मॅच पाच दिवस चालली तर हा बॉल टिकू शकेल का असा प्रश्न निर्माण होतो.

पिंक बॉल, डे-नाईट टेस्ट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पिंक बॉल

पिंक बॉलची निर्मिती

टेस्ट खेळणाऱ्या विविध देशांमध्ये तीन कंपन्या बॉल पुरवतात. भारतात होणाऱ्या टेस्ट मॅचेसवेळी एसजी कंपनीने तयार केलेले बॉल वापरले जातात. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये ड्यूक्स कंपनीच्या बॉलचा वापर केला जातो.

अन्य टेस्ट खेळणाऱ्या देशांमध्ये कुकाबुरा कंपनीने तयार केलेले बॉल वापरले जातात. भारतातल्या पहिल्यावहिल्या ऐतिहासिक डे-नाईट टेस्टसाठी बीसीसीआयने एसजी कंपनीलाच पिंक बॉल तयार करण्याची जबाबदारी सोपवली होती.

उत्तर प्रदेशातील मेरठस्थित एसजी कंपनीच्या फॅक्टरीत पिंक बॉलची निर्मिती झाली आहे. भारतात झालेल्या डे-नाईट टेस्टवेळी एसजी कंपनीने सहा डझन पिंक बॉल पुरवले होते.

पिंक बॉल, डे-नाईट टेस्ट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पिंक बॉल

पिंक बॉलचे गुणधर्म?

वनडे आणि ट्वेन्टी-20मध्ये वापरल्या जाणाऱ्या पांढऱ्या बॉलप्रमाणे पिंक बॉलही सपाट होतो. लाल बॉलपेक्षा पिंक बॉल हलका असतो आणि सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये अधिक प्रमाणात स्विंग होतो.

पिंक बॉल सॉफ्ट होऊ लागतो तसा स्विंग होणं कमी होत जातं. पिंक बॉल रिव्हर्स स्विंग करणं बॉलर्सला कठीण जातं असा अनुभव आहे. पिंक बॉल खूप वळत नाही असं स्पिनर्सचं म्हणणं आहे. बॉलर्सना मिळणारी मदत कमी होत असल्याने खेळ कंटाळवाणा आणि रटाळ होतो.

पिंक बॉलचा मॅचच्या निकालावर परिणाम?

पिंक बॉलचा वापर होणारे बहुतांश डे-नाईट मॅचेस निकाली होतात असं आकडेवारी सांगते.

बॉलर आणि बॅट्समन दोन्ही आघाड्यांवर खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. डे-नाईट टेस्टमध्ये स्थित्यंतराचा काळ खेळाडूंसाठी परीक्षा पाहणारा असतो.

नैसर्गिक सूर्याचा प्रकाश कमी होत जातो आणि त्याचवेळी मैदानातील कृत्रिम प्रकाश सुरू होतो. त्यावेळी चेंडूचा सामना करणं अवघड असतं.

दिवसाचं तापमान आणि रात्रीचं तापमान यात फरक पडतो. तापमान कमी झालं तर बॉल स्विंग होण्याची शक्यता असते. काही शहरांमध्ये रात्र झाल्यावर मैदानावर दव पसरतं.

दवामुळे बॉलर्सना बॉल ग्रिप करायला त्रास होतो. पिंक बॉलची स्थिती नीट राहावी यासाठी खेळपट्टीवर गवत ठेवावं लागतं. गवत असेल तर फास्ट बॉलर्सना साहाय्य मिळू शकतं.

पिंक बॉल, डे-नाईट टेस्ट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पिंक बॉल

डे-नाईट टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व

ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सात डे-नाईट टेस्ट खेळल्या असून, सगळ्या जिंकल्या आहेत. पहिलीवहिली डे-नाईट टेस्ट अॅडलेड इथल्या अॅडलेड ओव्हल इथे होणार आहे. याच मैदानावर भारत-ऑस्ट्रेलिया डे-नाईट टेस्ट होणार आहे.

ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत अॅडलेड, ब्रिस्बेन, पर्थ इथे डे-नाईट टेस्ट खेळल्या आहेत. टीम इंडियाने एकमेव डे-नाईट टेस्टमध्ये बांगलादेशवर एक डाव आणि 46 रन्सने विजय मिळवला होता.

पिंक बॉल, डे-नाईट टेस्ट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डे नाईट टेस्ट

डे-नाईट टेस्ट किती वाजता सुरू होते?

दिवसभर चालणारी टेस्ट सकाळी साडेनऊला सुरू होते. दोन तासांनंतर लंच होतो. मग दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होतो. दोन तासांनंतर चहापानाचं सत्र असतं आणि त्यानंतर दोन तास खेळ होतो.

डे-नाईट टेस्ट दुपारी 1 ते 1.30च्या बेतात सुरू होते. दोन तासानंतर 20 मिनिटांचं चहापानाचं सत्र असतं. त्यानंतर दोन तासांच्या खेळानंतर सपर म्हणजेच रात्रीच्या भोजनाचं 40 मिनिटांचं सत्र असतं. त्यानंतर दोन तासांचा खेळ होतो आणि साधारण 9 ते 9.30च्या बेतात खेळ थांबतो. 90 ओव्हर्सचा खेळ होणं अपेक्षित आहे.

पिंक बॉल, डे-नाईट टेस्ट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डे-नाईट टेस्ट

डे-नाईट टेस्टचं प्रस्थ का वाढतं आहे?

वनडे आणि ट्वेन्टी-20 फॉरमॅटच्या आक्रमणानंतर टेस्ट मॅचेसची लोकप्रियता घसरणीला लागली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजदरम्यान याचा प्रत्यय आला.

टेस्ट मॅच सकाळी 9.30 ते संध्याकाळी 4.45 या वेळेत पाच दिवस सुरू राहत असल्याने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार वर्ग, उद्योजक, महिला वर्ग यांना टेस्ट मॅच स्टेडियममध्ये जाऊन बघणं किंवा टीव्हीवर बघणं कठीण असतं. मात्र डे-नाईट टेस्ट दुपार ते रात्र अशी चालत असल्याने किमान दोन सत्रं अनुभवण्याची संधी क्रिकेट रसिकांना मिळते.

पिंक बॉल, डे-नाईट टेस्ट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मोहम्मद शमी, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली पिंक बॉलसह

भारतात डे-नाईट मॅचेसची सुरुवात कधी झाली?

भारतात पहिली डे-नाईट वनडे 1984 मध्ये झाली होती. पहिली डे-नाईट रणजी मॅच ग्वाल्हेर इथं 1996-97 मध्ये झाली होती. पहिली पिंक बॉल मॅच 2016 मध्ये कॅब सुपर लीग स्पर्धेची फायनल झाली होती. बांगलादेशविरुद्धची दुसरी टेस्ट भारतात होणारी पहिली डे-नाईट टेस्ट असणार आहे.

डे-नाईट टेस्ट. .  .
ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)