'#पुन्हानिवडणूक?': महाराष्ट्राच्या सत्तापेचात सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, अंकुश चौधरी यांच्या ट्वीट्सवरून वादाचा 'धुरळा'

सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव आणि सई ताम्हणकर

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव आणि सई ताम्हणकर
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

महाराष्ट्रात निवडणुका झाल्या, लोकांनी मतदान केलं आणि निकालही लागले. पण युतीला स्पष्ट कौल मिळूनही भाजप आणि शिवसेनेला एकत्र येऊन सत्तास्थापन करता आलं नाही आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली.

त्यातच काही मराठी कलाकारांनी शुक्रवारी सोशल मीडियावर "#पुन्हानिवडणूक" असा हॅशटॅग ट्वीट केला. यामध्ये सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी या आघाडीच्या अभिनेत्यांचा समावेश आहे.

कलाकार

फोटो स्रोत, TWITTER / @ROFlMarathi_

अचानक सिनेकलाकारांनी असे ट्वीट का करावेत, हा लोकांना प्रश्नच पडला. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली, आणि त्यांच्या ट्वीट्सवर उलटसुलट प्रतिक्रियाही पाहायला मिळाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडेंनी ट्वीट करत या कलाकारांवर टीकाही केली.

धनंजय मुंडेंचं ट्वीट

फोटो स्रोत, Twitter

"काही कलाकारांनी #पुन्हानिवडणूक हा ट्विटर ट्रेंड सुरू केला आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी जनतेची माफी मागावी. कलाकारांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीचं भान ठेवावं. या ट्रेंडमुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे," असं ते म्हणाले.

पण त्यानंतर अभिनेता सिद्धार्थ जाधव यानं ट्वीट करत या पोस्टविषयी स्पष्टीकरण दिलं आहे.

सिद्धार्थ जाधव यांचं ट्वीट

फोटो स्रोत, Siddharth Jadhav/ twitter

त्यानं लिहिलं, "आमची पोस्ट ही कोणत्याही युती, आघाडी किंवा राजकीय पक्षाचं प्रमोशन किंवा खंडन करण्यासाठी नाही. राजकारण म्हटलं की निवडणूक आलीच. हाच निवडणुकीचा 'धुरळा' आपलं आयुष्य कसं बदलतो, याचा अनुभव आपण घेतो आहोतच. असंच काहीसं आमच्याही बाबतीत झालंय, म्हणून आपल्याशी ते शेअर केलं. त्यामागची आमची 'भूमिका' लवकरच कळेल आणि आशा आहे आपल्याला आवडेलसुद्धा. सर्वांच्या भावनांचा आम्हाला नितांत आदर आहे. कुणाचीही कुठल्याही प्रकारची दिशाभूल करण्याचा आमचा हेतू नाही."

एकीकडून या कलाकारांवर टीकेचा भडीमार होत असला, तरी हा हॅशटॅग म्हणजे 'धुरळा' नावाच्या आगामी सिनेमाचं प्रमोशन असल्याचं म्हटलं जात आहे.

सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया

धनंजय मरकड यांनी ट्वीट करत म्हटलंय की, "तुम्ही हीच वेळ बरी साधली. तुम्हाला माहिती पाहिजे की, महाराष्ट्राला लवकरात लवकर सरकार हवे, जेणेकरून मोडकळीस आलेल्या शेतकऱ्याला धीर मिळेल. तुमच्या फिल्म प्रमोशनच्या नादात किती मोठी चूक करता, हे लक्षात घेत जा."

ट्वीटर

फोटो स्रोत, Twitter

तर विक्रांत जोशी यांच्या मते, "शिवसेनेनं जनमताचा अनादर केला आहे. जिथं भाजपचा उमेदवार नव्हता अशा ठिकाणी लोकांनी स्वत: प्रवास करून शिवसेनेला मत केलं, त्यासाठी पैसा खर्च केला. त्यामुळे पुन्हा निवडणूक व्हायला हवी."

ट्वीट

फोटो स्रोत, Twitter

"पुन्हा निवडणूक हा हॅशटॅग काही मराठी कलाकारांनी सुरू केला आहे, त्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. हे कलाकार पैशांसाठी काहीही करू शकतात," असं विजय कुंभार यांनी म्हटलं आहे.

ट्वीट

फोटो स्रोत, Twitter

विशाल जोशी यांनी लिहिलंय, "पुन्हा लवकरात लवकर निवडणूक होणं गरजेचं आहे. सरकारी तिजोरीच्या रक्षणाची जबाबदारी भ्रष्ट लोकांच्या हातात जायला नको."

ट्वीट

फोटो स्रोत, Twitter

तर अजय पाटील यांनी सिद्धार्थ जाधव यांच्या स्पष्टीकरणावर लिहिलं, "टायमिंग चुकलं ना भाऊ. मयताला गेल्यावर हसून कसं चालेल? वेळ-काळ बघायला पाहिजे."

तुम्हाला काय वाटतं? काय आहे या ट्वीटच गुपित? कलाकारांचं टायमिंग चुकलं, ही टीका तुम्हाला पटते का? कमेंट्समध्ये नक्की सांगा.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)