अयोध्येतील कारसेवकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी #5मोठ्याबातम्या

अयोध्या

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. अयोध्येतील कारसेवकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी

6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडल्याचा आरोप असलेल्या कारसेवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि राममंदिर आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या कारसेवकांना शहीदाचा दर्जा द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय हिंदू महासभेने सरकारकडे केली आहे. द हिंदूने हे वृत्त दिलं आहे.

सुप्रीम कोर्टाने मूळ जागेवर मंदिर बांधण्याचा आदेश दिल्यानंतर ही मागणी करण्यात आली असून या संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना या संदर्भात एक पत्र लिहिलं आहे.

या आंदोलनात सहभागी असलेल्या लोकांना 'धार्मिक सेनानी' असं जाहीर करावं, त्यांना पेन्शन आणि इतर सोयीसुविधा द्याव्यात अशी मागणीही करण्यात आली आहे. तसंच आंदोलनातील मृतांच्या नावांची यादी करून ती अयोध्येत लावावी अशीही अखिल भारतीय हिंदू महासभेची मागणी आहे.

2. गौतम नवलखा यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला

एल्गार परिषद खटल्यातील आरोपी गौतम नवलखा यांच्या अटकपूर्व जामिनाचा अर्ज पुण्याच्या विशेष न्यायालयाने फेटाळल्याची बातमी इंडियन एक्सप्रेसनं दिली आहे.

नवलखा आणि इतर 23 जणांवर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत खटला दाखल करण्यात आला होता. सुप्रीम कोर्टाने त्यांना अटकेपासून दिलेल्या संरक्षणाची मुदत काल संपली. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

गौतम नवलखा

फोटो स्रोत, Twitter

विशेष न्यायाधीश एस.आर. नवंदार यांनी हा निर्णय दिला आहे. गौतम नवलखा यांच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांवरून ते माओवादी पक्षासाठी काम करत असल्याचा आरोप सरकारी पक्षाने लावला आहे.

3. भारतातून बाहेर पडण्याचा व्होडाफोनचा इशारा

भारतात व्यवसाय वाढीला वाव दिसत नसल्यानं नव्याने गुंतवणूक करण्याचा कोणताही इरादा नाही, असं व्होडाफोनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीक रीड यांनी भारत सरकारला दिला असल्याचं वृत्त ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.

या संदर्भातलं वृत्त लोकसत्ताने प्रसिद्ध केलं आहे. त्यामुळे कंपनीच्या भवितव्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.

व्होडाफोन

फोटो स्रोत, Getty Images

दूरसंचार उद्योगात सरकारने हस्तक्षेप टाळावा तसंच 5जी च्या लिलावात उमदेपणाने स्पर्धेत उतरू द्यावं, अशा त्यांच्या मुख्य मागण्या आहेत. व्होडाफोनवर युकेमध्ये आधीच कर्जाचा मोठा बोजा आहे. अशा परिस्थितीत वाढीव गुंतवणूक करणं शक्य नसल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

4. काश्मीरमध्ये अपघातात 16 लोकांचा मृत्यू

चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने एक प्रवासी वाहन सुमारे 700 मीटर खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात मंगळवारी (12 नोव्हेंबर) 16 जणांचा मृत्यू झाला. जम्मू-काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात दुपारी 3.25 च्या सुमारास ही दुर्घटना घडली.

मृतांमध्ये पाच महिला व तीन मुलांचा समावेश आहे. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.

एकूण 17 प्रवाशांना घेऊन क्लिनीकडून मरमतकडे जाणाऱ्या या एसयूव्ही कारच्या चालकाचे एका वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ही कार रस्त्याशेजारील दरीत कोसळली.

हा अपघात एवढा भीषण होता की, 12 प्रवासी जागीच ठार झाले तर चार जणांचा वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातातून केवळ एक प्रवासी बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

5. 2019 च्या भाजपच्या निवडणूक निधीत 75 टक्के वाटा टाटांचा

2019 च्या लोकसभा निवडणुकीत कॉर्पोरेट क्षेत्राकडून भाजपला 472 कोटीची मदत झाल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. त्यातील 356 कोटी फक्त टाटा समुहाने दिले आहेत.

टाटा समुहाचं नियंत्रण असलेल्या Progressive Electoral Trust च्या माध्यमातून हा निधी देण्यात आला. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या अहवालात ही माहिती उघड झाली आहे.

भाजपा

फोटो स्रोत, AFP

सत्ताधारी पक्षाला देण्यात येणाऱ्या देणग्यांमध्ये 2017-18 पासून तिपटीने वाढ झाली आहे. 2017 मध्ये हा आकडा 167 कोटी होता. काँग्रेसच्या बाबतीत हा आकडा आठ पटीने वाढला आहे. तसंच या संस्थेने तृणमूल काँग्रेसला 43 कोटींचा निधी दिला आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)