अवकाळी पावसानंतर आता राज्यासमोर 'महा' चक्रीवादळाचं सावट #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. अवकाळी पावसानंतर आता राज्यासमोर 'महा' चक्रीवादळाचं संकट
राज्याला अवकाळी पावसानं झोडपलं असतानाच आता 'महा' चक्रीवादळामुळे या संकटात भरच पडली आहे. या वादळाचा प्रभाव आणखी चार दिवस कायम राहणार असल्याचे समोर आले आहे. लोकसत्तानं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
हे चक्रीवादळ गुजरात किनारपट्टीवर धडकल्यानंतर त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही जाणवणार आहे. या पार्श्वभूमीवर 'NDRF'चे पथक सज्ज झाले असून ठाणे-पालघर जिल्ह्याला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पुढील तीन दिवस म्हणजेच 8 नोव्हेंबरपर्यंत मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, जे मच्छिमार समुद्रात गेले आहेत त्यांनी तातडीने परत यावे, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव अजॉय महेता यांनी केले आहे.
2. PMC बँक: मुंबई हायकोर्टाने मागवली RBI कडून माहिती
PMC बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (RBI) निर्देश दिले आहेत. खातेधारकांना दिलासा देण्यासाठी काय पावलं उचलली आहेत, या प्रकरणातून मार्ग काढण्यासाठी कोणती उपाययोजना केली आहे, याची माहिती न्यायालयानं मागितली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं हे वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
13 नोव्हेंबरपर्यंत ही माहिती न्यायालयात सादर करण्याचे निर्देश RBI ला दिले आहेत. याबाबतची पुढील सुनावणी 19 नोव्हेंबरला पार पडणार आहे.
गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी PMC घोटाळ्या संदर्भात उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने हे निर्देश दिले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायाधीश रियाज छागला यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत.
3. मराठा आरक्षण लागू झाल्यानं खुल्या प्रवर्गातील 417 नियुक्त्या रद्द
पाच वर्षांपूर्वी राज्य शासनाच्या सेवेत मराठा कोटय़ातील रिक्त ठेवलेल्या विविध पदांवर तात्पुरत्या स्वरुपात खुल्या प्रवर्गातून केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात 15 कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे.
SEBC कायद्यानुसार नव्या नियुक्त्या करताना खुल्या प्रवर्गातून तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या नियुक्त्या रद्द करणार नाही, अशी हमी राज्य सरकारनेच अडीच महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयात दिली होती. मात्र असं असतानाही राज्य सरकारनं 417 कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या.
न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सोमवारी (4 नोव्हेंबर) ही याचिका सादर करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं राज्याच्या महाधिवक्त्यांना 7 नोव्हेंबरच्या पुढील सुनावणीत सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची सूचना केली आहे.
4. ही परिस्थिती आणीबाणीपेक्षा वाईट: सुप्रीम कोर्टाचा प्रदूषणावरून संताप
दिल्लीतील वाढतं प्रदूषण आणि हवेच्या घसरणाऱ्या गुणवत्तेवरून सोमवारी (4 नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयानं सरकारला फटकारलं. हिंदुस्तान टाइम्स मराठीनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, AFP
विविध सरकारी संस्था आपले काम योग्य पद्धतीने करत नसल्यामुळे सामान्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ही परिस्थिती आणीबाणीपेक्षा वाईट आहे, असं मत खंडपीठातील एक न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी नोंदविले. ती आणीबाणी यापेक्षा बरी होती, असंही त्यांनी म्हटलं.
दिल्ली आणि उत्तर भारतात अनेक ठिकाणी हवेतील प्रदूषण धोक्याची पातळी ओलांडून वर गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील परिस्थिती 'जैसे थे' आहे, सर्वोच्च न्यायालयानं यासंबंधी कठोर शब्दांत टीका केली.
5. 5 हजार भाविक पाकिस्तानातील करतारपूरला जाणार
गुरू नानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त पाकिस्तानला भेट देणाऱ्या शीख भाविकांसांठी पाकिस्तानच्या The Evacuee Trust Property Board नं प्रवासाचा कार्यक्रम प्रसिद्ध केला आहे. इंडियन एक्सप्रेसनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
गुरू नानक जयंतीनिमित्त 5 ते 14 नोव्हेंबरदरम्यान पंजाब आणि अन्य राज्यांमधून जवळपास 5 हजार भाविकांचा जथा पाकिस्तानला जाणार आहे. या पाच हजार भाविकांपैकी अडीच हजार भाविक 9 तारखेला होणाऱ्या कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनाला हजेरी लावतील.

फोटो स्रोत, GURPREET/BBC
प्रवासाच्या कार्यक्रमानुसार हे सर्व भाविक 5 आणि 6 तारखेला हे भाविक वाघा बॉर्डर ओलांडून पाकिस्तानमध्ये जातील. तिथून ते नानकाना साहिब गुरुद्वाऱ्याला भेट देतील.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























