विधानसभा निवडणूक: शरद पवार म्हणतात कितीही खटले दाखल करा, पुरून उरेन- #5मोठ्याबातम्या

शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शरद पवार
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात.

1. कितीही खटले दाखल करा, पुरुन उरेन- शरद पवार

ज्यांचा संबंध नाही त्यांच्यावर खटले दाखल करायचे. कुठल्यातरी लोकांचा आदेशाचा वापर करून खटले दाखल केले जात आहेत. त्यांना सांगून ठेवतो या सर्व खटल्यांना हा बारामतीकर पुरुन उरल्याशिवाय राहणार नाही. काय करायचं ते करा असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी दिला आहे. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.

राज्यातील निवडणूक तरुणांनी ताब्यात घेतली आहे हे चित्र आहे. तरुणांचा दर्या आमच्या बाजूने आहे आणि संपत्तीचा डोंगर भाजपकडे आहे. हा डोंगर उद्ध्वस्त करण्याची ताकद तरुणांमध्ये आहे. तो गप्प बसणार नाही असं शरद पवार म्हणाले.

समाजातील एकही घटक समाधानी नाही. शेती, कारखानदारी, कामगार, अल्पसंख्याक कुणाच्याही हिताची जपणूक झालेली नाही असा आरोप पवार यांनी केला.

2. शिवसेनेच्या टीकेला निवडणुकीनंतर मातोश्रीसमोर जाऊन उत्तर देईन-राणे

शिवसेनेच्या टीकेला निवडणुकीनंतर मातोश्रीसमोर जाऊन उत्तर देईन असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी दिला. मला कोकणचा विकास करायचा आहे, मात्र शिवसेनेकडे विकासाची दृष्टी नाही असं ते म्हणाले. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

नारायण राणे

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, नारायण राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी विविध योजना आणल्या. सी वर्ल्डसारखा महत्त्वाकांक्षा प्रकल्प भांडून आणला. भूसंपादनासाठी शंभर कोटीची तरतूद केली. पाच वर्षांत एक इंच जमीन तरी संपादित झाली का? या प्रकल्पाची एक वीट तरी लागली का? कपाळ करंट्यामुळे हा प्रकल्प रखडला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन वर्षात प्रकल्प पूर्ण होण्याचा शब्द दिला आहे असं राणे म्हणाले.

3. पीयूष गोएल यांना माझ्या कार्यक्षमतेबाबत साशंकता-अभिजीत बॅनर्जी

काँग्रेस पक्षाप्रमाणे भाजपने समाजातील उपेक्षित वर्गाबाबत आकडेवारी मागितली असती, मी त्यांना खोटं सांगितलं असतं का? मी काँग्रेसला जे उत्तर दिलं तेच भाजपला दिलं असतं.

मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे आणि कोणाबरोबरही काम करत असेन तरी प्रामाणिक राहीन. मात्र केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोएल यांना माझ्या कार्यक्षमतेबद्दल साशंकता आहे असं नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी सांगितलं. 'एनडीटीव्ही'ने यासंदर्भात बातमी दिली.

अभिजीत बॅनर्जी आणि एस्थेर डुफ्लो

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, अभिजीत बॅनर्जी आणि एस्थेर डुफ्लो

आर्थिक भूमिकेबाबत मी गोंधळलेला नाही. आम्ही अनेक राज्य सरकारबरोबर काम केलं. आम्ही गुजरातच्या प्रदूषण मंडळाबरोबर काम केलं. आमचा अनुभव उत्तम होता. जे घडतं आहे, दिसतं आहे, ज्याचे पुरावे आहेत त्याबरहुकूम आम्ही काम करतो असं बॅनर्जी म्हणाले.

4. पीएमसी बँकेच्या विलीनीकरणाचे प्रयत्न- मुख्यमंत्री

पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध घातल्यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या बँकेच्या खातेदारांसाठी दिलासादायक बातमी आहे. पीएमसी बँकेचे अन्य बँकेत विलीनीकरण करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे खातेदारांच्या ठेवी सुरक्षित राहणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

पीएमसी बँक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पीएमसी बँक

पीएमसी बँकेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी पॅकेज देणं हे राज्य सरकारच्या आधीन नाही, आरबीआयला तो अधिकार आहे. परंतु पीएमसी बँकेचे इतर बँकांमध्ये विलीनीकरण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल मी स्वत: यासंदर्भात निर्मला सीतारामण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे.

निवडणुका झाल्यानंतर यासंदर्भात पाठपुरावा करणार आहे. घोटाळ्यातील आरोपींना अटक केली असून, त्यांची संपत्ती जप्त केली आहे. घोटाळ्यातील आरोपींच्या संपत्तीचा लिलाव करून खातेदारांचे पैसे परत करायचे की नाही हे ठेवीदार कायद्यातील तरतुदी पाहून राज्य किंवा केंद्र सरकार निर्णय घेईल असं ते म्हणाले.

5. प्रो कबड्डी-बंगाल वॉरियर्स विजेते

बंगाल वॉरियर्स संघाने प्रो कबड्डी स्पर्धेच्या सातव्या हंगामाचे जेतेपद पटकावले. बंगाल वॉरियर्सने दिल्ली दबंगवर 39-34 असा विजय मिळवला. 'सकाळ'ने यासंदर्भात बातमी मिळवली.

दिल्लीने 6-0 आघाडी घेतली. ती 11-3 अशी वाढवली. सामना एकतर्फी होणार अशी चिन्हं असतानाच बंगालने कलाटणी दिली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)