You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राजनाथ सिंह: तर पाकिस्तानच्या मदतीसाठी भारताचे सैन्य पाठवू #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात.
1. तर पाकिस्तानच्या मदतीसाठी भारताचे सैन्य पाठवू - राजनाथ सिंह
दहशतवादाशी मुकाबला करण्याची पाकिस्तानची प्रामाणिक इच्छा असेल, तर त्यांच्या मदतीसाठी भारताचे सैन्य तिकडे पाठविण्याची आमची तयारी आहे. पण तसे करण्याची पाकिस्तानच्या नेत्यांची मानसिकता नसेल, तर दहशतवाद आणि मूलतत्त्ववाद नष्ट करण्याची भारताची पूर्ण तयारी आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी सोनपत (हरयाणा) येथील जाहीर सभेत सांगितले. ही बातमी दैनिक लोकसत्ताने दिली आहे.
पाकिस्तानने जम्मू-काश्मीरबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतविरोधी प्रयत्न चालविले असले तरी, त्याचा काहीही परिणाम होणार नाही. याउलट दहशतवाद्यांना पोसण्याचे धोरण पाकिस्तानने कायम ठेवले, तर त्या देशाची आणखी शकले होतील. याआधी 1971 मध्ये पाकिस्तानचे दोन भाग झाले आहेत. त्यातून त्यांनी धडा घ्यावा, असे राजनाथ सिंह म्हणाले.
2. गवत लावून आरेला जंगल घोषित करणार का?
उद्धव ठाकरे निवडून आल्यानंतर आरेला जंगल घोषित करण्याचं आश्वासन देतात. एका रात्रीत झाडं तोडली तेव्हा शांत होते. मग आता गवत लावून जंगल घोषित करणार का? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना केला. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
मागाठाणे आणि दिंडोशी मतदारसंघातील आपल्या प्रचारसभेत सत्ताधारी भाजपसह शिवसेनेला जोरदार लक्ष्य केलं. राज ठाकरे म्हणाले, "सरकारने एका रात्रीतून आरेतील 2700 झाडं तोडली. मात्र, त्यानंतर आलेल्या शिवसेनेच्या जाहीरनाम्यात आरेवर एक शब्दही नाही. उद्धव ठाकरे आता निवडणुकीत निवडून आलो, तर आरेला जंगल घोषित करण्याचं आश्वासन देतात. पण निवडून आल्यावर ते गवत लावून जंगल घोषित करणार आहे का?"
3. अजित पवारांच्या राजीनाम्याने शरद पवारांचा टेंपो खाली आणला - भुजबळ
ईडीच्या संदर्भात शरद पवार यांनी पुकारलेल्या आंदोलनाने उच्च टेंपो गाठला होता. अजित पवारांच्या राजीनाम्याने सगळा फोकस दुसरीकडे वळला आणि शरद पवारांनी आंदोलनाने उभा केलेला जनमानसाचा टेंपो खाली आला. अजित पवार यांनी राजीनामा देण्याची काहीही गरज नव्हती, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं.
दैनिक लोकमतला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे उद्गार काढले आहेत. ते पुढे म्हणाले, अजित पवारांचा राजीनामा आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा विषय यांच्याद्वारे विरोधी पक्षाचा फोकस बदलण्याचा प्रयत्न सतत काही मंडळी करत आहेत.
4. टीकेची झोड उठल्यावर रवीशंकर यांचं विधान मागे
बॉलिवूड सिनेमांच्या कमाईची तुलना करत भारतीय अर्थव्यवस्थेला कशी मरगळ आलेली नाही, असा दावा करून केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद वादात अडकले. त्यांच्यावर चहुबाजूंनी टीकेचा भडीमार झाला. त्यानंतर त्यांनी आपले विधान मागे घेतले. व्हिडिओतील माझ्या विधानाचा एकच भाग विपर्यास करून दाखवला. तरीही मी हे विधान मागे घेतो, असे त्यांनी जाहीर केले. ही बातमी दैनिक महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.
आपल्या निवेदनात रवीशंकर प्रसाद म्हणाले, "मुंबईत काल मी तीन सिनेमांच्या 120 कोटी रुपयांच्या कमाईबद्दल बोललो. या माहितीत पूर्ण तथ्य आहे. मी मुंबईत होतो, मुंबईला भारतात सिनेमाची राजधानी म्हणतात. मला सिनेमा उद्योगाचा अभिमान आहे. या क्षेत्रात लाखो लोकांना रोजगार मिळतो आणि टॅक्सही मिळतो. मी या सर्वाविषयी विस्तृतपणे बोललो होतो. माझ्या मीडियाशी झालेल्या चर्चेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहे. पण माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला."
5. अयोध्येत 10 डिसेंबरपर्यंत कलम 144 लागू
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत जमावबंदीचा कायदा म्हणजेच कलम 144 लागू करण्यात आला आहे. अयोध्या जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश अनुज कुमार झा यांनी याबाबतचा आदेश दिला आहे. ही बातमी हिंदुस्तान टाईम्सने दिली आहे.
दिवाळी आणि इतर सण तसंच सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी यांच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कलम 144 लागू करण्यात येत आहे. 10 डिसेंबरपर्यंत तो इथं लागू असेल. बाबरी मशीद पाडण्यात आलेला दिवस 6 डिसेंबर आहे. त्यामुळे या दिवसापर्यंत कलम 144 लागू करण्याची आवश्यकता होती, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)