नरेंद्र मोदी यांना मॉब लिंचिंगविरोधात पत्र लिहिणाऱ्या 49 सेलिब्रेटींवरील देशद्रोहाचा गुन्हा रद्द #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, GETTY IMAGES/RAMCHANDRA GUHA
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. मॉब लिंचिंगविरोधात मोदींना पत्र लिहिणाऱ्या 49 सेलिब्रेटींवरील देशद्रोहाचा गुन्हा रद्द
देशात होणाऱ्या मॉब लिचिंगविरोधात (झुंडबळी) पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुले पत्र लिहून आवाज उठवणाऱ्या 49 सेलिब्रेटीविरोधात दाखल करण्यात आलेला देशद्रोहाचा खटला रद्द करण्यात आला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
मुझफ्फरपूरच्या पोलीस अधीक्षकांनी गुन्हा मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये लेखक रामचंद्र गुहा, चित्रपट निर्माते मणिरत्नम आणि अनुराग कश्यप, अभिनेत्री अपर्णा सेन यांचा समावेश आहे.

फोटो स्रोत, Getty Images
स्थानिक वकील सुधीरकुमार ओझा यांनी या सेलिब्रेटिंविरोधात बिहारच्या कोर्टात याचिका दाखल केली होती. मुझ्झफरपूरचे मुख्य न्याय दंडाधिकारी सूर्यकांत तिवारी यांनी दोन महिन्यांपूर्वी ही याचिका दाखल करुन घेतली होती.
त्या पार्श्वभूमीवर पाच दिवसांपूर्वी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी ओझा यांनी म्हटलं होतं की, "सीजेएम तिवारी यांनी 20 ऑगस्टला माझी याचिका दाखल करून घेतली होती. याची जी पावती देण्यात आली होती, त्याआधारे आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे."
2. काँग्रेसला आत्मपरीक्षणाची गरज - ज्योतिरादित्य सिंधिया
काँग्रेसला आत्मपरीक्षणाची गरज असल्याचं पक्षाचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं आहे. न्यूज 18नं ही बातमी दिली आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी बँकॉकला गेल्याची सध्या चर्चा सुरू आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"आमच्या नेत्यानं पळ काढला आहे, हा आमचा सर्वांत मोठा प्रॉब्लेम आहे," असं वक्तव्य पक्षाचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी केलं होतं.
यावर प्रतिक्रिया सिंधिया यांनी म्हटलं की, "मी दुसऱ्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणार नाही, पण हे खरं आहे की, काँग्रेस पक्षाला आत्मपरीक्षणाची गरज आहे."
3. मंदीचा सर्वाधिक फटका भारताला
भारतात जागतिक मंदीचे सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (IMF) व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्तालिना जॉर्जियाव्हा यांनी दिली आहे. इकॉनॉमिक टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
मंदीच्या कचाट्यात 90 टक्के जग सापडले असून यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा वृद्धिवर कमी होईल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

फोटो स्रोत, AFP
पुढील आठवड्यात IMFकडून 2019 आणि 2020 वर्षासाठीचा आर्थिक अंदाज अहवाल जाहीर होणार आहे. त्यातील निरीक्षणानुसार, भारत आणि ब्राझील या दोन देशांना मंदीचा सर्वाधिक फटका बसल्याचं म्हटलं आहे.
4. कलम 370 आणि महाराष्ट्राचा काय संबंध हे शहिदांच्या मातांना विचारा - खा. नामग्याल
महाराष्ट्राच्या निवडणुकीत कलम 370 चा मुद्दा वारंवार येतो. कलम 370 आणि महाराष्ट्राचा काय संबंध आहे? असा प्रश्न विरोधक विचारत आहेत. त्यावर भाजपच्या लडाखच्या खासदारांनी प्रतिक्रिया दिले.
"कलम 370 रद्द केल्यानंतर याचा महाराष्ट्राच्या निवडणुकीशी काय संबंध आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्यांना हा प्रश्न पडत आहे, त्यांनी ज्या मातांची मुलं जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झाली, त्यांना जाऊन काय संबंध आहे, हे विचारावं," असं वक्तव्य लडाखचे भाजपचे खासदार जमयांग नामग्याल यांनी केलं आहे. सकाळनं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, BBC
भाजपतर्फे आयोजित पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
महाराष्ट्र आणि लडाखमधील मैत्रीपर्व सुरू झाले आहेत, अनेक जण पर्यटनासाठी येत आहे. आता तेथे गुंतवणूकही करू शकता, असंही त्यांनी म्हटलंय.
5. भाजपला घालविल्याशिवाय म्हातारा होणार नाही: शरद पवार
"सामान्यांची फसवणूक करून दिलेला शब्द न पाळणारे भाजपचे सरकार घालविल्याशिवाय म्हातारा होणार नाही," असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. अकोल्यातील प्रचारसभेत ते बोलत होते. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणाले, "मला या वयातही प्रचार सभा घ्याव्या लागत असल्याबद्दलचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे; पण त्यांना ठणकावून सांगतो की, मी अजूनही तरुण आहे. म्हातारा तर मुळीच नाही. या सरकारला घालविल्याशिवाय म्हातारा होण्याचा प्रश्नच नाही."
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांना राजकीय आणि सामाजिक जीवनातून कायमस्वरूपी निवृत्ती घ्यावी लागणार आहे, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























