मुंबई पाऊस: रात्री मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात.

1) मुंबईत रात्री मुसळधार पावसाची हजेरी

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नव मुंबईसह परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली. मुंबईतल्या चिंचपोकळी, मुंबई सेंट्रल, सायन, मुलुंड, भांडुप, बोरिवली या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. अचानक आलेल्या पावासमुळं कामावरून परतणाऱ्या मुंबईकरांची तारांबळ उडाली.

महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.

रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पावसानां मुंबई आणि परिसरात सुरुवात केली. अनेक ठिकाणी सुमारे तास-दीड तास सलग सुरू राहिला.

ठाण्यात सोसाट्या वाऱ्यासह पाऊस आल्यानं शहरात दोन ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या. कल्याण-डोंबिवली भागात वीज पुरवठा खंडीत झाला होता.

नवरात्रोत्सवाची सांगता होत असताना, विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. त्यामुळं अचानक आलेल्या पावसानं या मिरवणुकांनाही फटका बसल्याचं चित्र पाहायला मिळालं.

2) काँग्रेसची खिंड बाजीप्रभू देशपांडेंसारखी लढवणार - बाळासाहेब थोरात

संकटकाळात मी काँग्रेसचा बाजीप्रभू देशपांडे असल्याचं काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

"काँग्रेस अडचणीत असताना अनेकजण सोडून गेले, पण मी बाजीप्रभू देशपांडे यांच्यासाखी काँग्रेसची खिंड लढवणार आहे," असा निर्धार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. अहमदनगरमधल्या संगमनेरमध्ये स्वतःच्या प्रचाराची सुरुवात त्यांनी केली.

इतिहास तोच घडवतो, जो सातत्यानं लढत राहतो, असं म्हणत काँग्रेस सोडणाऱ्यांना बाळासाहेब थोरातांना टोला लगावला.

महाराष्ट्र काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून रोज 18 तास काम करतोय. पडझडीच्या काळात राज्यासाठी मोठी जबाबदारी माझ्यावर आलीय, असंही बाळासाहेब थोरातांनी म्हटलं.

3) राहुल गांधींनी पराभवापासून पळणं हीच काँग्रेसची समस्या - सलमान खुर्शीद

राहुल गांधींचा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा म्हणजे पराभवापासून पळण्यासारखं आहे, असं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केलंय. त्यांनी असोशिएट प्रेसला मुलाखत दिली. टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी प्रसिद्ध केलीय.

"लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाचं आत्मचिंतन करण्यासाठी आम्ही एकत्र आलोच नाही. आमचा नेताच (राहुल गांधी) बाजूला गेला, हीच आमची अडचण आहे," असं सलमान खुर्शीद म्हणाले.

लोकसभेतील पराभवाची नैतिक जबाबदारी घेत राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, तुम्ही सर्वात पुढे राहा आणि नेतृत्त्व करा, असं वारंवार सांगणाऱ्या नेत्यांकडेही त्यांनी दुर्लक्ष केलं, अशी खंत सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केली.

4) शरद पवारांना राजकारणातून कायमची विश्रांती देणार - चंद्रकांत पाटील

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राजकारणातून कायमची विश्रांती देणार, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. कोल्हापुरातील राधानगर मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. लोकमतनं ही बातमी दिलीय.

मला कोथरूडमध्ये अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना साधा उमेदवार मिळाला नसल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

दुसरीकडे अहमदगरमध्ये शरद पवार यांनी भाजपवर टीका केलीय. ते म्हणाले, "शेतकऱ्यांनो, भाजपचे नेते तुमच्या दारात मतं मागायला येतील. त्यांना दारात उभं करू नका."

शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची वेळ आली तेव्हा कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेणारं हे सरकार आहे, त्यांना मत देऊ नका, असं शरद पवार म्हणाले. लोकसत्तानंही बातमी दिलीय.

5) अरविंद केजरीवालांना 'C-40' परिषदेला जाण्यास केंद्रानं परवानगी नाकारली

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे होणाऱ्या C-40 हवामान परिषदेसाठी जाण्याची परवानगी केंद्र सरकारनं नाकारलीय. NDTVनं ही बातमी दिलीय.

कोपनहेगन येथे 9 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत हवामान परिषद होतेय. केजरीवालांच्या नेतृत्त्वात आठ सदस्यांचं शिष्टमंडळ या परिषदेसाठी रवाना होणार होतं.

"अरविंद केजरीवाल हे सहलीसाठी जात नव्हते तर दिल्ली सरकारने हवामान प्रदूषण कसं कमी केलं, याची माहिती द्यायला जात होते," अस म्हणत आपचे नेते संजय सिंह यांनी केंद्र सरकारवर टीका केलीय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)