पुणे पाऊस : कुत्र्याला वाचवण्यासाठी गेलेल्या 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

रोहित आमले
    • Author, हलिमाबी कुरेशी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

पुण्यात पावसाने थैमान घातलं आहे. कालची रात्र कशी गेली याबद्दल पुण्याच्या नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पावसाने कुणाची सून नेली तर कुणाचा मुलगा नेला.

पण यासारखी हृदयद्रावक घटना आम्ही पाहिली नव्हती असं पुण्यातल्या पावसाच्या साक्षीदारांनी सांगितलं. आपल्या लाडक्या कुत्र्याला वाचवण्यासाठी 16 वर्षांचा रोहित घरात गेला आणि त्याने आपले प्राण गमावले असं त्याचे वडील भरत आमले यांनी सांगितलं.

रोहित हा त्याच्या आजी आजोबांसोबत सहकारनगरातील अरण्येश्वर भागातल्या टांगेवाल कॉलनीत राहत होता. तो दहावीच्या वर्गात होता. पाऊस सुरू झाल्यानंतर त्याने आधी आपल्या आजी-आजोबांना घराबाहेर सुखरूप काढलं आणि त्यानंतर तो त्याच्या पाळीव कुत्र्याला आणण्यासाठी गेला. पावसाचा जोर वाढत होता. त्यामुळे त्याच्या अंगावर भिंत कोसळली आणि त्यात रोहितचा जीव गेल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं.

रोहित हा अभ्यासात हुशार होता आणि इथल्या विद्याविकास शाळेत तो 10वीत शिकत होता असं त्याचे आजोबा विठ्ठल शिंदे यांनी सांगितलं.

रोहित यांच्या कुटुंबीयांप्रमाणेच अनेकांसाठी कालची रात्र ही काळरात्र ठरली. एका रात्रीत पावसानं होत्याचं नव्हतं करून झालं, असं पुण्यातल्या विजया भिवाजी राणे आजी सांगत होत्या. त्यांच्या सुनेचा नाका-तोंडात पाणी शिरल्यानं मृत्यू झाला आहे.

या दुःखानं हवालदिल झालेल्या आजी रात्रभर घराबाहेर गारठ्यात बसून आहेत.

भरल्या डोळ्यानं त्या सांगत होत्या, "आधी घरात थोडंसं पाणी आलं. त्यामुळं आम्ही कुठं बाहेर पडलो नाही. पण अचानक पाणी शिरलं आणि आम्ही बाहेर धावलो. पाणी डोक्यावरून जात होतं. माझ्या सुनेच्या नाका-तोंडात पाणी गेलं आणि क्षणात सगळं संपलंच.''

नेहमीसारखा पाऊस पडतोय, असं वाटून पुणेकर बुधवारी रात्री आपापल्या घरात निवांत झोपलेले होते. पण थोड्याच वेळात पावसाने खूप नुकसान केलं.. परतीच्या पावसाला सुरुवात झाली आणि काही तासातच रस्त्यांवर तळी साचली, ओढ्यांना पूर आला.

सिंहगड, धनकवडी, सहकारनगर, कात्रज या भागातील सोसायट्या आणि घरामध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. एनडीआरएफ आणि अग्निशामन दलाला सुरुवातीस दोन मृतदेह सापडले होते आणि यानंतर मृतांचा आकडा अकरावर गेला आहे. पाण्याचा प्रचंड मोठा लोट आल्यानं अनेक लोक चाळीत आणि सोसायट्यांमधल्या घरांमध्ये अडकून पडले.

सगळ्यांनांच परिस्थितीचा अंदाज आला आणि लोकांनी मदत करायला सुरुवात केली. संतोष कदमसुद्धा या मदतकार्यात सहभागी झाले होते. ओढ्यालगतच्या वस्तीत त्यांचे नातेवाईक राहात होते. ते त्यांना मदत करत होते. तिथल्या घरांमध्ये काही महिला अडकल्याचे कळताच, ते पुन्हा एकदा बचावकार्यासाठी गेले.

तिथून परतत असताना पाण्याच्या लोटामुळे एका कंपाउंडची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. संतोष कदम रिक्षाचालक होते. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

'ढोलाच्या दोऱ्या काढल्या आणि वाचवलं'

एका बाजूला ओढा आणि दुसऱ्या बाजूने चढावर असलेल्या सोसायट्यांजवळून वाहत येणारं पाणी यामुळे अनेकजण घरात अडकून पडले होते. बाहेर पडायला एकाच गल्लीतून रस्ता असल्यानं बचाव कार्य करायला देखील अडथळे होते.

घरातून सुटका झालेले सूरज आव्हाड त्यांचा अनुभव सांगत होते, ''पाऊस पडतच होता. रात्री आधी नुसते लाइट गेले. नेहमीसारखंच होतं सगलं. पण अचानकच पाण्याचा लोंढा आला. इतका जोरात की भिंती कोसळल्या. आमच्या भागातली मुलं पत्र्यावरून चढून लोकांना वाचवत होती. ही मुलं अग्निशामन दलाकडे दोऱ्या मागत होती. पण त्यांच्याकडे माणसं नसल्याचं कारण दलाकडून मिळत होतं. शेवटी आमच्या गल्लीतल्या पोरांनी ढोलाच्या दोऱ्या काढल्या आणि आम्हाला वाचवलं. आमची घरं पार धुवून निघालीत. काहीही शिल्लक राहिलेलं नाही,'' घशातला आवंढा गिळत आव्हाड माहिती देत होते.

पुणे पूर

ओढ्यालगत राहणाऱ्या यमुनाबाई शिंदेसुद्धा त्यांचा भीतीदायक अनुभव विषद केला. रात्री आधी घोट्याइतकं पाणी आत शिरलं. परंतु ओढ्यालगत राहात असल्यानं तेवढं पाणी नेहमीच येत असतं, असा विचार त्यांच्या कुटुंबियांनी केला. परंतु काही वेळातच पाणी वाढू लागलं आणि काही क्षणात गळ्यापर्यंत पाणी जाऊ लागलं. त्यांच्या सहा ते सात घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबियांनी घराबाहेर धाव घेतली. शेजाऱ्यांच्या दारावर थाप मारत त्यांचे कुटुंबिय बाहेर आले. सगळ्या घरांमध्ये पाणी शिरलं आणि घर सगळं धुवून गेलं. अनेक लोकं आत अडकल्यानं मुलं छपरावरचे पत्रे काढून त्यांना वाचवत होती, असंही शिंदेंनी सांगितलं.

पानशेत पूरग्रस्तांना या भागात विस्थापित करण्यात आल होतं. 1995 साली या वसाहतीतील अर्ध्या लोकांना इमारतीमध्ये घर मिळाली होती. ज्यांना घरं मिळालेली नाहीत अशी 50 ते 70 कुटुंब ओढ्याजवळ राहात आहे.

पावसात गेलेल्या बळींची संख्या 14, 9 जण बेपत्ता

पुणे शहरासह जिल्ह्यातील 5 तालुक्यांना काल रात्री धुवाँधार पावसाचा फटका बसला. शहरासह ग्रामीण परिसरातील सखल भागातील घरात पाणी शिरले. नदी-नाल्यांना पूर आले. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 14 जण दगावले असून 9 जण बेपत्ता आहेत. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून बचाव व मदतीसाठी एनडीआरएफची 5 पथके कार्यरत आहेत. प्रशासनाच्यावतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल,अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिली.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, यावर्षी 22 वर्षानंतर प्रथमच ऑगस्ट महिन्यात धरणे भरली. काल रात्रीचा पाऊस मात्र खूपच होता. यावर्षी जिल्ह्यात सरासरी 180 टक्के पाऊस झाला आहे. कालच्‍या पावसामुळे जिल्ह्यात 14 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पुणे शहरातील 6, हवेली तालुक्यातील 6, पुरंदर तालुक्यातील 2 जणांचा समावेश आहे.

या पावसाचा फटका जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी 5 तालुक्यातील 59 गावांना बसला आहे. नाझरे धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कऱ्हा नदीच्या पात्रात 85 हजार क्युसेक पाणी वाहत होते. या कऱ्हा नदीच्या पाण्यामुळे बारामती शहराला फटका बसला.

दक्षतेचा उपाय म्हणून बारामती शहरात 38 निवारा शिबिरांची उभारणी करण्यात आली आहे. या शिबिरात 2 हजार 500 नागरीकांना स्थलांतरीत करण्यात आले. तर पुणे शहरातील 3 हजार नागरिकांना काही काळासाठी सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले. जिल्ह्यातील 1 हजार 1 कुटुंबांतील ३ हजार 65 लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात दरड कोसळून 5 रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. या ठिकाणी तातडीने यंत्रणा पाठवून या रस्त्यांवरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. जिल्ह्यात 5 एनडीआरएफच्या टिम तैनात करण्यात आल्या असून 275 जवान मदत कार्य करत आहेत.

त्यापैकी बारामती तालुक्यात एनडीआरएफच्या दोन टीम कार्यरत आहेत. या आपत्कालिन स्थितीची माहिती निवडणूक आयोगाला कळवून त्यांच्या सूचनांनुसार प्रशासनाच्यावतीने बाधित नागरिकांना मदत देण्यात येणार आहे. आचार संहितेचा कोणताही अडसर मदत व बचाव कार्यात येणार नसल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)