देवेंद्र फडणवीसांचे नाणारमध्ये पुन्हा रिफायनरी आणण्याचे संकेत, शिवसेनेला धक्का : 5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. देवेंद्र फडणवीस : नाणार प्रकल्पाचा पुर्नविचार, शिवसेनेला धक्का
आरे कारशेडचं देखील नाणार होणार असल्याचं विधान करत उद्धव ठाकरेंनी दबावतंत्राची भाषा केल्यानंतर, नाणारमध्येच पुन्हा रिफायनरी प्रकल्प सुरू करण्याची भाषा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा कोकणात दाखल झाली. रत्नागिरीमध्ये महाजनादेशच्या रथावरून बोलताना देवेंद्र फडणवीसांनी नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव बोलून दाखवला आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी सकारात्मक घोषणा सुरू केल्या.
दरम्यान, लोकसभा निवडणुकांपूर्वी युती करताना शिवसेनेनं नाणारमधून रिफायनरी प्रकल्प हटवण्याची अट घातली आणि तसं करण्यासाठी भाजपला भाग पाडलं.
मात्र विधानसभेपूर्वी शिवसेनेनं आरेवरून दबावाचं राजकारण सुरू केलं असताना, मुख्यमंत्र्यांनी नाणारसंदर्भात मोठं विधान केलं आहे.
2. स्वाभिमानचे लवकरच भाजपमध्ये विलिनीकरण
नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाचं लवकरच भाजपमध्ये विलिनीकरण होण्याची शक्यता आहे. ही बातमी लोकमतने दिली आहे.
भाजपत प्रवेश केल्यानंतर कणकवली मतदार संघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार नीतेश राणे हे कमळ चिन्हावर निवडणूक लढतील.

फोटो स्रोत, TWITTER/MENARAYANRANE
भाजपमध्ये माझा लवकरच प्रवेश होईल. हा कार्यक्रम मुंबईतच होईल. मीच तशी इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांवर माझा विश्वास आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कणकवली विधानसभेची जागा आमदार नीतेश राणे यांनाच मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी व्यक्त केला.
3. पाकव्याप्त काश्मीर भारताकडे येईल - परराष्ट्रमंत्री
"पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असून, एक दिवस हा प्रदेश भारताच्या भौतिक अधिकारक्षेत्राखाली येईल," असा विश्वास मंगळवारी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केला.
परराष्ट्र मंत्रालयाचा १०० दिवसांचा ताळेबंद सादर करताना त्यांनी पाकिस्तान प्रशासित काश्मीरविषयी स्पष्ट आणि आक्रमक संकेत दिले. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.

फोटो स्रोत, Reuters
"आमची पाकव्याप्त काश्मीरविषयीची भूमिका पूर्वी, आज आणि भविष्यातही स्पष्ट राहिली आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे," असं ते म्हणाले.
"काश्मीरविषयी लोक काय म्हणतील, यावर एका मर्यादेपलीकडे जास्त विचार करण्याची गरज नाही. काश्मीरविषयी अधिकच प्रचार झाला आणि भविष्यातही होईल. पण त्यामुळे स्थिती बदलणार नाही, हे सन १९७२पासूनच स्पष्ट झालं आहे," असं जयशंकर पुढे म्हणाले.
4. राज्यात पुढचे तीन दिवस पाऊसच पाऊस
मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मध्य प्रदेशसह तेलंगणा आणि महाराष्ट्रात पुढील तीन दिवसांत सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. स्कायमेट या खासगी वेधशाळाने हा अंदाज वर्तवला आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
स्कायमेटच्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्यामुळे समुद्रसपाटीपासून सुमारे तीन किलोमीटरपर्यंत चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
ही परिस्थिती गेल्या काही काळापासून कायम आहे. याचा परिणाम म्हणून काही भागांमध्ये सर्वदूर मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे मध्य प्रदेशच्या पश्चिम भागात पूरस्थितीही निर्माण होऊ शकते. तसेच मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगाणातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
5. मनरेगाची मजुरी वाढवणार
ग्रामीण भागातल्या अर्थव्यवस्थेत आलेली सुस्ती झटकून टाकण्यासाठी तसंच ग्रामीण भागातल्या लोकांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी सरकार महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची मजुरी वाढवण्याचा विचार करत आहे. ही बातमी द हिंदूने दिली आहे.
ग्रामीण भागातल्या लोकांनी वस्तू खरेदी कराव्यात, त्यासाठी त्यांच्या हातात पैसै असावेत म्हणून ही योजना आखण्याच आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मनरेगा मजुरी दरांचा आढावा घेणे आणि त्यांची पुर्नरचना करण्यास सुरुवात झाली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























