पाकिस्तानने दहशतवादाचा पुरस्कार थांबवला नाही तर त्यांचे तुकडे होतील - राजनाथ सिंह, #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Rajnath Singh/FACEBOOK
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. पाकिस्तानने दहशतवादाचा पुरस्कार न थांबवल्यास तुकडे होतील - राजनाथ सिंह
"पाकिस्ताननं दहशतवादाचा पुरस्कार करणं थांबवलं नाही, तर या देशाचे तुकडे होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही," असं वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली.
कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या 122 सैनिकांच्या कुटुंबीयांचा सुरतमधील एका कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
"पाकिस्तानी नागरिकांनी नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला, तर भारतीय जवान त्यांना पुन्हा मागे फिरायची संधी देणार नाहीत," असंही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, 'काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा भारताचा निर्णय पचवणं पाकिस्तानला अवघड जात आहे. या मुद्द्यावरून त्यांनी संयुक्त राष्ट्रापर्यंत जाण्याचा आणि त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागलं नाही."
2. शिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजे भाजपमध्ये - राष्ट्रवादी काँग्रेस
"छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक जमिनी विकण्याकरिता परवानगी मिळावी म्हणून उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, महाराजांचा ऐतिहासिक वारसाला कोणी धक्का लावत असेल, तर जनतेला सोबत घेऊन आम्ही विरोध करू," असं मत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
राष्ट्रवादीचे साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे यांनी 14 सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

फोटो स्रोत, Ncp/facebook
उदयनराजे भोसले यांच्या पक्षांतराबाबत बोलताना नवाब मलिक म्हणाले, "1999च्या आधी उदयनराजे भाजपाचे आमदार आणि मंत्री होते. राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना हरवलं होतं. पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या आईंच्या मध्यस्थीमुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार दरवेळी त्यांना तिकीट देत असत. मात्र राष्ट्रवादीमध्ये असूनही ते कायमच पक्षाच्या विरोधात भूमिका घेत असत. साताऱ्यात पुन्हा एकदा उदयनराजेंचा पराभव करू, इतकंच नाही तर सातारा विधानसभेच्याही जागा जिंकू."
"उदयनराजेंना विकास कळत नाही, त्यांच्यात विचार करण्याची ताकद आहे का?" असंही मलिक यांनी म्हटलंय.
3. 'पाकिस्तान म्हणजे मुस्लीम आणि मुस्लीम म्हणजे पाकिस्तान असं वातावरण बनवलं जातंय'
"पाकिस्तान आणि भारतात वेगळी फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तान म्हणजे मुस्लीम आणि मुस्लीम म्हणजे पाकिस्तान असं वातावरण बनवलं जात आहे. पाकिस्तानमध्ये एवढी वाईट परिस्थिती नाही. काही लोक स्वतःचा फायद्यासाठी वातावरण दूषित करत आहेत," असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.
राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक मेळाव्यात ते बोलत होते.

फोटो स्रोत, Sharad badhe/BBc
"देशात एक वेगळं वातावरण पसरवलं जातं आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष असताना मी पाकिस्तानमध्ये गेलो आहे. तेव्हा एक वेगळं वातावरण पाहिलंय. एक वेगळी स्थिती आज देशासमोर आली आहे," असंही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, राज्यात वंचित बहुजन आघाडी नावाचा एक पक्ष उदयास आला असून त्यामुळे धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होत आहे. वंचित आघाडी हा पक्ष भाजपला फायदा करून देण्यासाठीच मैदानात उतरला आहे, असंही ते म्हणाले.
4. मुख्यमंत्र्यांच्या बारामतीमधल्या सभेत गोंधळ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा 14 सप्टेंबरला बारामतीत पोहोचल्यानंतर तिथल्या सभेत गोंधळ पाहायला मिळाला, अशी बातमी इंडियन एक्स्प्रेसनं दिली आहे.

फोटो स्रोत, Devendra Fadnavis/facebook
मुख्यमंत्री सभेला संबोधित करत असताना भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात घोषणा देताना दिसून आले.
राष्ट्रवादीची सध्याची स्थिती ही पक्षातील गैरकारभारामुळे आहे, असं फडणवीसांनी यावेळी म्हटलं आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
5. स्वस्त घरांसाठी 10 हजार कोटी रुपये - निर्मला सीतारमण
स्वस्त घरांसाठी सरकार 10 हजार कोटींची मदत करणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिली आहे. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.
"अर्धवट राहिलेल्या घरांसाठी हा निधी असेल. यामुळे जवळपास साडे तीन लाख घर खरेदीदारांना लाभ होईल," असं सीतारामन यांनी म्हटलं आहे.
"सरकारी नोकरदार वर्ग घर मागणीत महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. यामुळे सरकारी नोकरी करणाऱ्यांना घर खरेदी करताना लाभ मिळेल," असंही त्या म्हणाल्या.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























