देवेंद्र फडणवीसांचा ताफा थांबला, हृदय प्रत्यारोपणासाठी पुण्यात ग्रीन कॉरिडॉर #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या :
1. हृदय प्रत्यारोपणासाठी पुण्यात ग्रीन कॉरिडॉर, मुख्यमंत्र्यांचा ताफाही थांबला
पुण्यात हृदय प्रत्यारोपणासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आलं. विशेष म्हणजे, हृदय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आपल्या गाड्यांची कुठलीही अडचण होऊ नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा विमानतळावरच थांबून राहिला. पुणे मिररनं ही बातमी दिली आहे.
पुण्यातल्या रूबी हॉल क्लिनिक या हॉस्पिटलमध्ये हृदय प्रत्यारोपण केलं जाणार होतं. यासाठी सोलापुरातील एका हॉस्पिटलमधून धडधडणारं हृदय चार्टर्ड प्लेननं पुणे विमानतळावर आणण्यात आलं. त्यानंतर तिथून हे हृदय रूबी हॉल क्लिनिकला न्यायचं होतं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा याच दिवशी नियोजित पुणे दौरा होता. मुख्यमंत्री गणपती दर्शनासाठी आले होते. मात्र, हृदय नेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ग्रीन कॉरिडॉरला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून काही वेळ विमानतळावर थांबून राहण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला.

फोटो स्रोत, Twitter
रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि डीसीपी देशमुख यांचे आभार मानले.
पुण्यात या वर्षीचं हे 10 वं हृदय प्रत्यारोपण होतं, तर 100 वं ग्रीन कॉरिडॉर होतं.
2. आरेतील कारशेडविना मुंबईतील 'मेट्रो 3' अशक्य : अश्विनी भिडे
मुंबईतील 'मेट्रो 3' प्रकल्पासाठी आरे परिसरात कारशेड उभारणं सोयीचं असून, कारशेड हलवावी लागल्यास प्रकल्पच पूर्ण होऊ शकणार नाही, असं मत अश्विनी भिडे यांनी व्यक्त केलंय. भिडे या मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या संचालक आहेत. लोकसत्तानंही बातमी दिलीय.
या पार्श्वभूमीवर एसएनडीटी विद्यापीठनं मुंबईतील सार्वजनिक वाहतूक आणि पर्यावरणाच्या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. त्यात अश्विनी भिडे बोलत होत्या.
'मेट्रो 3'च्या कारशेडवरून मुंबईतील वातावरण तापलंय. कारशेडसाठी 2 हजार 646 झाडे हटवावी लागणार आहेत. वृक्ष प्राधिकरणानं ही झाडं हटवण्यासाठी परवानगी दिली असली तरी पर्यावरणवाद्यांनी विरोध दर्शवला आहे.

फोटो स्रोत, RADHIKA JHAVERI
कांजूरमार्गची जमीन मिळण्यात सरकारला अडचणी येत असून, तिथं कारशेड उभारणं किचकट प्रक्रिया आहे. शिवाय, आरेतली झाडं तोडली, तरी त्या बदल्यात 23 हजार 846 झाडं लावली जातील, असेही भिडे यांनी सांगितलं.
दुसरीकडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही मेट्रो 3 साठी झाडं तोडण्याचं समर्थन केलं आहे.
"पर्यावरण आणि विकास यांचा समतोल राखला गेलाच पाहिजे. मात्र, विकासासाठी झाडे तोडणं गरजेचं असल्यास हरकत घेऊ नये. मेट्रो कारशेडला विरोध हे मुंबईकरांचे नुकसान ठरेल." असं गडकरी म्हणाले.
3. जागा वाटपात झुलवण्यामागे प्रकाश आंबेडकरांना संघाची फूस : जलील
एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केलीय आहे.
ते म्हणाले, "आठ जागा देऊन एमआयएमला झुलत ठेवलं जातंय. असं करण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रकाश आंबेडकरांना फूस आहे का, अशी शंका येतेय." लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, FACEBOOK
जागावाटपाच्या प्रक्रियेत मला जाणीवपूर्वक खलनायक ठरवण्याची प्रक्रिया हाती घेतली जात असल्याची खंतही इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलीय.
"पूर्वी बोलणी करताना 98 जागांचा प्रस्ताव दिला होता. कमी करण्यास सांगितल्यानंतर 74 जागांची यादी दिली. ओवेसी आणि आंबेडकरांमध्ये चर्चा झाली असली तरी तोडगा निघाला नाही. मात्र, वंचितच्या प्रवक्त्यांकडून एमआयएमला 17 जागा मिळाल्याचे पत्रक काढले गेले." असं जलील म्हणाले.
4. मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतले तब्बल 37 निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत तब्बल 37 निर्णय घेतले गेले. मराठवाड्यातल्या दुष्काळावर मात करण्यासाठी लातूर-उस्मानाबद वॉटर ग्रीडला मंजुरीही या बैठकीत देण्यात आल आहे. टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटनं ही बातमी दिली.
शेवटच्या कॅबिनेटमध्ये राज्य सरकारनं शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांसाठी विविध निर्णय घेतल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
येत्या काही दिवसातच विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन, आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक पार पडली.
महत्त्वाचे पाच निर्णय :
- पीएचडी झालेल्या अधिव्याख्यात्यांना 1 जानेवारी 1996 पासून दोन वेतनवाढी देण्यास मान्यता.
- विदर्भ आणि मराठवाड्यातील परवानाधारक सावकारांनी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील शेतकऱ्यांना दिलेली कर्जे माफ.
- माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक उभारण्याबाबत उपसमिती.
- राज्यातील कुष्ठरोग पीडित नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मुख्यमंत्री आवास योजना राबविण्यास मान्यता.
- दिव्यांगांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापण्यात येणार.
5. शिख दंगलीप्रकरणी कमलनाथ यांची पुन्हा चौकशी होणार
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना 1984 च्या शिख दंगलीप्रकरणी पुन्हा चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. इंडिया टुडेनं ही बातमी दिलीय.
केंद्रीय गृहमंत्रालयानं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं (एसआयटी) शिख दंगलीशी संबंधित सात प्रकरणं पुन्हा उघडली आहेत. या सातही प्रकरणातील आरोपींची एकतर निर्दोष मुक्तता झालीय किंवा प्रकरणच बंद करण्यात आलं होतं. या प्रकरणांमधील एक प्रकरण कमलनाथ यांच्याशी संबंधित आहे.

फोटो स्रोत, Getty Images
यानंतर अकाली दलाचे नेते मंजिंदर सिरसा यांनी कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, "कमलनाथ यांचा सहभाग असलेल्या शिख नरसंहाराचं प्रकरणाची पुन्हा चौकशी होणं म्हणजे अकाली दलाचा मोठा विजय आहे."
दरम्यान, या दंगलीत सहभाग घेतल्याचा आरोप कमलनाथ यांनी कायमच फेटाळलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























