विधानसभा : प्रकाश आंबेडकर म्हणतात विरोधी पक्षनेता नाही, तर मुख्यमंत्रीच वंचित आघाडीचा होणार #5मोठ्याबातम्या

अॅड. प्रकाश आंबेडकर

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. आगामी मुख्यमंत्री वंचित आघाडीचाचः प्रकाश आंबेडकर

"आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा वंचित बहुजन आघाडीचाच असेल," असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

भविष्यात वंचित बहुजन आघाडी राज्यातील विरोधी पक्ष असेल, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.

मतदान

फोटो स्रोत, Getty Images

"आगामी निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आम्ही आघाडी करण्यास उत्सुक आहोत. अद्यापही काँग्रेसला आमचे दरवाजे मोकळे आहेत. पण 144 पेक्षा अधिक जागा आम्ही काँग्रेसला देणार नाहीत. याबाबतची अंतिम भूमिका पुढील आठवड्यात आपण जाहीर करणार आहोत," असंही त्यांनी म्हटलं आहे.

"आमच्या संभाव्य आघाडीत शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असणार नाही. कारण राष्ट्रवादीची मते काँग्रेसला परावर्तित होत नसल्याचं काँग्रेसवालेच बोलतात. त्यामुळे राष्ट्रवादीला सोबत घेण्याचे काहीच कारण नाही," असंही ते पुढे म्हणाले.

2. BSNLमध्ये कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव

"BSNLच्या 70 ते 80 हजार कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली, तरी कंपनीत 1 लाख कर्मचारी असतील," असं मत BSNLचे अध्यक्ष प्रवीण कुमार पुरवर यांनी व्यक्त केलं आहे. इकॉनॉमिक टाइम्सनं ही बातमी दिलीय.

बीएसएनएल

फोटो स्रोत, BSNL

"आमच्या स्पर्धकांपेक्षा BSNLमधील कर्मचाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे आम्ही स्वेच्छानिवृत्तीच्या प्रस्तावावर चर्चा करत आहोत. जवळपास 70 ते 80 हजार कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव विचाराधीन आहे," असं त्यांनी म्हटलं आहे.

BSNLमधील कर्मचाऱ्यांवर एकूण महसुलापैकी 70 टक्के रक्कम खर्च होते, असंही त्यांनी पुढे म्हटलंय. कर्मचाऱ्यांना आकर्षक पॅकेज देऊन त्यांच्यासमोर स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव ठेवू असं प्रवीण कुमार म्हणाले.

3. आर्थिक मंदीमुळे बेरोजगारी वाढली - संजय राऊत

"आर्थिक मंदीमुळे बेरोजगारी वाढली, काँग्रेसनं त्यांच्या काळात उत्तम काम करून देशाला मंदीतून बाहेर काढलं होतं," असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते," एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

संजय राऊत
फोटो कॅप्शन, संजय राऊत

"येणाऱ्या निवडणुकीत जागा वाटप समान होणार असं अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात ठरलं आहे. शिवसेनेमध्ये मुलाखत होत नाही. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फक्त बैठका होतात," असंही ते म्हणाले.

दरम्यान, "नारायण राणे यांना भाजपात प्रवेश द्यायचा की नाही हा भाजपचा प्रश्न आहे. त्यांच्या प्रवेशाला आमचा विरोध नाही. पण, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देणार नाही," असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

4. 'एवढे खोटारडे पंतप्रधान, मुख्यमंत्री कधी पाहिले नाहीत'

"स्वतंत्र भारताच्या 70 वर्षांच्या इतिहासात एवढे खोटारडे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री पाहिले नाहीत," अशी टीका खासदार नाना पटोले यांनी केली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

नाना पटोले

फोटो स्रोत, FACEBOOK/NANA PATOLE

फोटो कॅप्शन, भाजपचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले काँग्रेसच्या प्रचारात सहभागी होणार आहेत.

"भारतीय जनता पक्षानं वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत केंद्रात आणि राज्यात सत्ता प्राप्त केली. सत्तेत आल्यानंतर ते प्रश्न बाजूला ठेवून इतर मुद्दे समोर आणले. भाजपकडून केवळ पोकळ आश्वासने देण्यात येतात. त्याची पूर्ती होत नाही. भाजप सरकार जनतेची दिशाभूल करीत आहेत," असंही त्यांनी म्हटलंय.

काँग्रेसकडून काढण्यात आलेली महापर्दाफाश यात्रा अकोल्यात पोहोचल्यानंतर ते बोलत होते.

5. राष्ट्रवादीनं शब्द देऊन फसवलं : हर्षवर्धन पाटील

"लबाड राष्ट्रवादीनं (NCP) शब्द देऊन फसवलं, आघाडीचा धर्म पाळूनही राष्ट्रवादीनं अन्यायच केला. आमच्या सभ्यपणाचा फायदा राष्ट्रवादीनं घेतला," असं वक्तव्य काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केलं आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

इंदापुरात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

"सगळ्या जनतेच्या ज्या भावना आहेत, त्याच माझ्या भावना आहेत. तुमच्या भावनांचा आदर केला जाईल. ज्याचं जळतं त्याला कळतं, म्हणून आता पुढचा निर्णय घ्यावा लागेल," असं ते म्हणाले.

हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाची सध्या चर्चा सुरू आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)