चेंबूर बलात्कार प्रकरण: पीडितेच्या मृत्यूनंतरही आरोपी मोकाट, संतप्त कुटुंबीय तपासयंत्रणेवर नाराज

- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
7 जुलैच्या रात्री 'ती' घरी आली, तेव्हा तिच्यावर नेमकं काय ओढवलं होतं, याची तिच्या भावाला कल्पनाही नव्हती. आपल्या मुलीवर अत्याचार झाला आहे, हे तिच्या कुटुंबीयांना कळेपर्यंत दोन आठवडे उलटले.
घटना मुंबईतल्या चेंबूरची आहे. 19 वर्षांच्या या तरुणीवर चेंबूरमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याचं प्रकरण समोर आलं, त्यालाही महिनाभर उलटला आहे. बुधवारी म्हणजे 28 ऑगस्टला औरंगाबादच्या रुग्णालयात ही मुलगी दगावली.
इतक्या दिवसांनंतरही आरोपी पकडले गेले नसल्यानं मुलीच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदनास आणि तिचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यात शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसनं चेंबूरमध्ये निषेध मोर्चा काढल्यानं या प्रकरणाला राजकीय रंग मिळाला.
पीडितेवर घडलेल्या गुन्ह्यानंतर पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप करत अॅडव्होकेट नितीन सातपुते यांनी शनिवारी एका जनहित याचिका दाखल करून, मुंबई पोलिसांना या प्रकरणी कडक कारवाईची मागणी केली आहे. त्यानंतर पोलीस निरीक्षक दिपक सुरवे यांच्यविरुद्ध अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत FIR दाखल करण्यात आला आहे.
नेमकं हे प्रकरण काय आहे? पीडित मुलीच्या नातेवाईकांची मागणी काय आहे आणि पोलिसांचा तपास कुठवर आला आहे?
काय आहे चेंबूर प्रकरण?
अनुसूचित समाजातली ही तरुणी मूळची जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातली आहे. काही काळापासून ती मुंबईत चेंबूरच्या लालडोंगर परिसरात आपल्या भावाकडे राहात होती.
मुलीच्या एका नातेवाइकानं बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑगस्टला ती सकाळी दहाच्या सुमारास घरातून बाहेर पडली होती. रात्री दहाच्या आसपास ती घरी परतली, तेव्हा तिची तब्येत बिघडली होती. तिला अमली पदार्थ देण्यात आल्याचा संशय आहे.
मुलीच्या भावानं दिलेल्या निवेदनानुसार, दुसऱ्या दिवशी तिला हॉस्पिटलला नेण्यात आलं. डोळ्यावर अंधारी येत असल्यानं डोळ्याच्या हॉस्पिटललाही नेण्यात आलं. चार दिवसांनी तिची प्रकृती आणखी खालावली. तिला लकवा मारल्याचा (पॅरलिसिस) संशय आल्यानं भावानं वडिलांना मुंबईला बोलावून घेतलं.
मग पॅरलिसिसच्या उपचारासाठी वडील तिला औरंगाबादच्या सुलतानपुरामध्ये घेऊन गेले. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी तिच्यासोबत बलात्कार झाल्याचं सांगितलं. त्यानंतर वडिलांनी मुलीला त्याविषयी विचारलं असता, तिनं खुणेनं चार लोक असल्याचं सांगितलं आणि तिला रडू कोसळलं!

त्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना बोलावून गुन्हा नोंदवला. औरंगाबादमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आणि ती मुंबईत चुनाभट्टी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली.
मात्र पोलिसांना आपण आरोपींची नावं आणि मोबाईल कॉल डिटेल्ससारखे पुरावे देऊनही अजून कारवाई झाली नसल्याचा दावा मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. तसंच तपास अधिकाऱ्यांकडून आपलीच उलटतपासणी सुरू असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पोलिस तपासात दिरंगाई करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पोलिसांचं म्हणणं काय आहे?
औरंगाबादच्या स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी बेशुद्धावस्थेत असल्यानं तपास अधिकारी तिचा जबाब नोंदवू शकले नाहीत.
ज्या चेंबूर-चुनाभट्टी परिसरात ही घटना घडली त्या विभागाचे DCP शशिकुमार मीना यांनी अजून पोलिसांचा तपास पूर्ण झालेला नसल्याची माहिती दिली आहे.
"30 जुलैला औरंगाबादमध्ये FIR रजिस्टर झाला आणि 2 ऑगस्ट तारखेला आमच्याकडे आलं. चार संशयित आहेत. मुलीच्या नातेवाइकांनी जे सांगितलं आहे, FIRमध्ये जे नोंदवलं आहे, त्याच्या आधारावर तपास सुरू आहे. त्या आधारावर अजून कुठलाही आरोपी अटक करण्यात आलेला नाही. ही घटना नेमकी कुठे घडली, ते अजून समोर आलेलं नाही. मुलीचा मृतदेह अजून हॉस्पिटललाच आहे आणि शवविच्छेदन झाल्याशिवाय मृत्यूचं नेमकं कारण समजू शकणार नाही," असं ते म्हणाले.
चेंबूरमध्ये निषेध मोर्चा
एक महिना उलटल्यावरही आरोपींवर कारवाई न झाल्यामुळं सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं चेंबूरमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला होता. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष नवाब मलिकही त्यात सहभागी झाले होते.
"राज्यात तरुणींवर बलात्कार होत आहेत आणि सरकार यात्रा काढण्यात मग्न आहे," अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यानंतर माध्यमांशी बोलताना केली. या प्रकरणाची चौकशी एका विशेष तपास पथकाने करावी, तसंच पीडितेच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यात यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही 'लोकसत्ता'ला प्रतिक्रिया देताना गृह विभागाच्या कामकाजावर टीका केली आहे. "गृहविभाग अजगरासारखा सुस्त आहे. गृह मंत्रालय आपल्याकडे ठेवलेल्या मुख्यमंत्र्यांचा विभागावर वचक नसल्याचे सिद्ध झाले आहे. सामूहिक बलात्कार प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी," अशी त्यांनी मागणी केली आहे.
महिला आयोगाची प्रतिक्रिया
पीडित मुलीच्या मृत्यूनंतर राज्य महिला आयोगानं या प्रकरणाची दखल घेतली असून, या आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पोलिसांना शनिवारी तपास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच या प्रकरणी गुन्ह्यात हत्येचे कलम जोडण्याची सूचनाही केल्या आहेत.
नातेवाईकांची मागणी
गेल्या महिनाभरातल्या घटनांनंतर पीडितेचे कुटुंबीय अजून धक्क्यातून सावरलेले नाहीत. मुंबईतल्या तिच्या नातेवाईकांनी संपूर्ण तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.
"दिल्लीत गँगरेप होतो, तेव्हा ती देशाची मुलगी होते. पण खालच्या जातीच्या मुलीवर बलात्कार होतो, तेव्हा ती जातीची मुलगी होते. जात बघून लोकांना असं वागवलं जात असेल तर तुमची मानवता जिवंत आहे का?" अशा शब्दात त्यांनी आपला रोष बोलून दाखवला.
"तिच्यावर अत्याचार झाला, असं डॉक्टर आणि पोलिसच म्हणाले होते, मगच तपासही सुरू झाला. त्यानंतर आता होणारा विलंब आणि उलटतपासणीचा मानसिक अत्याचार कितपत योग्य आहे?" असा सवाल ते विचारतात. "या प्रकरणात राजकारणही होत आहे, जातीचं वळण दिलं जातंय. पण एक व्यक्ती म्हणून आपण तिचा विचार का नाही करत?"
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























