कसाबला जिवंत पकडणाऱ्या पोलिसाचं निलंबन #5मोठ्याबातम्या

मुंबई पोलीस

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. कसाबला जिवंत पकडणाऱ्या पोलिसाचं निलंबन

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यातील हल्लेखोर अजमल कसाब याला जिवंत पकडणारे पोलीस निरीक्षक संजय गोविलकर यांचं निलंबन करण्यात आलंय. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक सोहेल भामलाला मुंबई विमानतळावरून जाऊ दिल्याने गोविलकरांवर कारवाई करण्यात आली. लोकमतनं ही बातमी दिलीय.

26/11 हल्ल्यावेळी प्राण पणाला लावून अजमल कसाबला जिवंत पकडल्याने पोलीस निरीक्षक संजय गोविलकर यांचा राष्ट्रपती पदकाने गौरव करण्यात आला होता.

गोविलकर यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र शिंगोटे यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली.

सोहेल भामला मुंबई पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेडच्या यादीत होता. दुबईतून मुंबईत आल्यानंतर भामलाला अटक करण्यात आली होती. मात्र, प्राथमिक चौकशीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने त्याला सोडून दिलं. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

2. महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पुढे ढकला : राज ठाकरे

महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती पाहता, सर्व स्थिती दोन ते तीन महिन्यात पूर्वपदावर येणार नाही, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केलीय. महाराष्ट्र टाईम्सने ही बातमी दिलीय.

राज ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

"पूरग्रस्त भागात लोकांना घरं नाहीत, अन्नधान्य नाही. या सर्व गोष्टी सावरणं सोपं काम नाही. सरकारने मदत आणि बचावकार्यावर लक्ष केंद्रित करावं. त्यासाठी विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी. अन्यथा आचारसंहितेच्या नावाखाली पुनर्वसनाची कामं थांबवलं जाईल." असं राज ठाकरे म्हणाले.

यावेळी राज ठाकरे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सेल्फी व्हीडिओ वादावरही भाष्य केलं. ते म्हणाले, "भाजपला सत्तेचा माज आलाय. त्यांना केवळ राजकारण करायचं आहे. आकडे ठरलेले आहेत. त्यानुसार मशिन सेट केल्या जातील."

3. 'सुश्रृत पहिला शल्यचिकित्सक, तर अणूचा शोध चरक ऋषींनी लावला'

विज्ञान क्षेत्रात भारताने जगाचं नेतृत्त्व केलं आहे. सुश्रृत पहिला शल्यचिकित्सक होता, तर अणूचा शोध चरक ऋषींनी लावला, असं विधान केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी केलं. ते आयआयटी मुंबईच्या पदवीदान समारंभात बोलत होते. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

रमेश पोखरियाल निशंक

फोटो स्रोत, Getty Images

संस्कृत जगातील एकमेव वैज्ञानिक भाषा असून, संगणकासाठीही हीच भाषा योग्य असल्याचं 'नासा'नं मान्य केल्याचंही निशंक यावेळी म्हणाले. भविष्यात संगणक टिकणार असेल, तर फक्त संस्कृतच्या आधारेच टिकू शकेल, असाही दावा त्यांनी केला.

या पदावीदान समारंभात इन्फोसिसचे अध्यक्ष नंदन नीलकेणी यांना 'डॉक्टर ऑफ सायन्स' ही सन्मानीय पदवी प्रदान करण्यात आली. यावेली नीलकेणी यांनी आयआयटीतील त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

4. 'वन नेशन, वन रेशन'चा पायलट प्रोजेक्ट सुरू

भारत सरकारने 'वन नेशन, वन रेशन' योजनेचा पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे. सध्या तेलंगण-आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र-गुजरात अशा राज्यांमध्ये या योजनेची चाचपणी केली जाणार आहे. इंडियन एक्स्प्रेसने ही बातमी दिली आहे.

पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास पुढल्या वर्षी म्हणजे जून 2020 पासून देशभरात 'वन नेशन, वन रेशन' योजना लागू केली जाईल.

नोकरी किंवा इतर काही निमित्ताने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झाल्यास रेशन कार्डमुळे मिळणारा लाभ घेण्यास या योजनेमुळे अडचणी येणार नाहीत. शिवाय, एकाहून अधिक रेशन कार्ड बाळगणाऱ्यांनाही लगाम लागेल, असा विश्वास सरकारला आहे.

5. 'नवीन संसद भवन उभारण्यावर विचार सुरू

नवीन संसद भवन उभारण्याबाबत गांभिर्याने विचार सुरू आहे. यावर संसदेसह विविध लोकांकडून मतं जाणून एका समितीची स्थापना करण्यात आलीय, अशी माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.

ओम बिर्ला

फोटो स्रोत, Getty Images

सध्याच्या संसद भवनाचं आधुनिकीकरण करण्यावरही भर दिला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'नए भारत'ची संकल्पना मांडत असताना संसद भवनाचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्याचा मानस व्यक्त केला होता.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचं संसद भवन आकर्षक असलं पाहिजे, असं मोदींनी म्हटलं होतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)