नाशिकमध्ये पूर, मुंबईसह सर्वत्र पावसाचा जोर कायम

मुंबई पूर

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्रवीण ठाकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

दुतोंड्या मारूती आणि नारोशंकराची घंटा ही नाशकातल्या पूराची मोजमापं. पूर्वीच्या काळी म्हणे नारोशंकराच्या घंटेला पाणी लागलं की सरकारवाड्याची 7 पायऱ्या पाण्यात जायच्या आणि सगळा सराफ बाजार पाण्यात असायचा.

ही खूण होती नाशकात मोठा पूर आल्याची.

सध्या परिस्थिती काहीशी तशीच आहे. नारोशंकराची घंटा जरी कधी काळी भामट्यांनी पळवून नेली असली तरी मंदिर तिथेच आहे आणि आता म्हणाल तर पाण्यात बुडालं आहे. जुलै महिना सरता सरताच जिल्ह्यात सरासरीच्या 150 टक्के पाऊस झाला आहे.

मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेले चार दिवस सतत पडत असलेल्या पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरड कोसळणे तसेच इतर अडथळ्यांमुळे रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

दुसरीकडे चांदोरी आणि सायखेडा गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातल्या 15 धरणांमधून पाणी सोडलं आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत गंगापूर धरणातून 45486 क्यूसेस पाणी सोडलं होतं.

ह्या सर्व पावसाचा फटका रस्ते व रेल्वे वाहतुकीला बसला. मुंबई-नाशिक महामार्ग काही काळ बंद होता. मुंढेगावलगतच्या दारणा नदीच्या उपनदीचे पाणी महामार्गावर 4 फुटापर्यंत भरल्याने काही काळ वाहतूक बंद करावी लागली. त्यानंतर दुपारी अडीच वाजेनंतर एकेरी मार्गावरची वाहतूक सुरू करण्यात आली. कसारा घाटातली वाहतूक काही काळ बंद होती.

नाशिक पूर

फोटो स्रोत, Pravin Thakare

पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला. इगतपुरी, कसारा तसंच मुंबईला होत असलेल्या पावसाने अनेक गाड्या नाशिकलाच थांबवल्या. आज सकाळी 4.30 ला इगतपुरीला आलेली दुरांतो एक्सप्रेस संध्याकाळी 4 वाजेपर्यंत, म्हणजे तब्बल 11.30 तास इगतपुरीलाच उभी होती.

तर सकाळी 5.30 ला नाशिकला आलेली मंगला एक्सप्रेस मुंबईकडे जाणं शक्य नसल्याने दुपारी 3 वाजता मनमाड दौंडमार्गे सोलापूरकडे वळवण्यात आली.

नागपूरहून 16 जणांचा एक ग्रुप हजला जाण्यासाठी दुरांतो एक्सप्रेसने मुंबईला जायला निघाला होता. त्यातलेच एक महमुद अख्तर सांगतात, "इगतपुरीला तब्बल 10.30 तास वाट पाहिल्यानंतर आम्ही खाजगी वाहनाने मुंबईला जायचा निर्णय घेतला आहे. कारण आम्हाला मुंबईत हज हाऊसला जाऊन कागदपत्र तयार करायची आहेत."

मुंबई - नाशिक महामार्ग

फोटो स्रोत, Pravin Thakare

नाशिक शहरातही अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. शहरातल्या मुख्य बाजारात, मेनरोडवर, दहीपूलावर आणि सराफ बाजारातही पाणी भरलं होतं. सराफ बाजारात 6 फुट पाणी भरल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन पथकाने लोकांना बाहेर काढलं.

पुराचं पाणी

फोटो स्रोत, Pravin Thakare

फ्रेण्डशिप डेच्या दिवशी तरुणांचं हॉट डेस्टिनेशन असणारा कॉलेजरोड सुनासुना होता कारण रस्त्यावर पाणी भरलं होतं आणि बराच काळ एकाच बाजूने वाहतूक सुरु होती. नंदिनी नदी जवळीचा सिटी सेंटर मॉलचा परिसर व तिडके कॉलनीचा पूल पाणी वाढल्याने वाहतुकीसाठी बंद करावा लागला होता.

सेल्फी काढणाऱ्यांचा आणि बघ्यांचा त्रास

पुराचं पाणी वाढत असताना सेल्फी काढणाऱ्यांची तसंच बघ्यांची गर्दी आवरण्यासाठी पोलिसांना अघोषित जमावबंदी लागू करावी लागली. पोलिसांनी काही काळ लोकांना येण्यास बंदी केली होती.

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार पाण्यातून एकूण 7 लोकांना वाचवण्यात आलं तर चांदोरी व सायखेडा ह्या गावातील 160 कुटुंबाना स्थलांतरित करण्यात आलं आहे.

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी उद्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)