उभ्या आयुष्यात टोल बंद होऊ शकत नाही - नितीन गडकरी, #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. टोल कधीच माफ होणार नाही - नितीन गडकरी
"चांगल्या सुविधा हव्या असतील, तर टोलसाठी पैसे मोजावेच लागतील," असं विधान केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
टोल वसुलीवरून लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, "ज्या भागातल्या जनतेची टोल देण्याची क्षमता आहे, त्या भागातच टोल वसुली केली जाते. टोलच्या पैशांतून ग्रामीण आणि डोंगराळ भागात रस्ते बांधले जातात. 5 वर्षांत 40 हजार किलोमीटर लांबीचे राज्यमार्ग तयार करण्यात आले.
"पण आता सरकारकडे विकासकामांसाठी पैसा नाही. चांगले रस्ते हवे असतील तर टोल द्यावाच लागेल. टोल कधीच बंद होऊ शकणार नाही. गरजेनुसार, त्यात थोडाफार बदल होऊ शकतो."
दरम्यान, यापुढे शहिदांच्या कुटुंबीयांना 1 कोटींची मदत देण्याचा निर्णय फडणवीस सरकारनं घेतला आहे.
"सीमारेषेवर लढताना अथवा युद्धजन्य परिस्थितीत शत्रुशी सामना करताना हौतात्म्य पत्करणाऱ्या शहीद जवानाच्या कुटुंबीयास राज्य सरकारकडून 1 कोटींची मदत दिली जाणार आहे. तसंच जखमी जवानांनाही 20 ते 60 लाखांपर्यंत मदत केली जाईल. राज्य सरकारनं याबाबतचा निर्णय घेतला आहे," अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना दिली आहे.
2. कुलभूषण जाधव प्रकरणी आज निकाल
पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) आज (17 जुलै) निकाल देणार आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, AFP
पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने हेरगिरीच्या आरोपांर्तगत कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
दरम्यान, या शिक्षेविरोधात भारताने ICJकडे धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयानं मे 2017मध्ये जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती आणि निर्णय सुरक्षित ठेवला होता.
3. राज्यात 60 % महिला लैंगिक संसर्गाच्या शिकार
महिलांमध्ये लैंगिक संबंधांतून संक्रमित होणाऱ्या आजाराचे प्रमाण ६० टक्के असल्याची माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षांत राज्यात आणि मुंबईत पुरुषांमध्ये अशा आजारांचे प्रमाण अनुक्रमे 35 आणि 30 टक्के, तर महिलांमध्ये 60 आणि 65 टक्के आढळून आलं आहे. स्त्रियांमध्ये गेल्या 5 वर्षांत विविध प्रकारचे लैंगिक आजार संक्रमित होण्याचे प्रमाण वाढल्याचे यातून स्पष्ट होत असल्याचं बातमीत म्हटलं आहे.
जोडीदाराकडून लैंगिक आजाराचं संक्रमण होणे, मासिकपाळीमधील अस्वच्छता, चांगल्या दर्जाची अंतर्वस्त्र न वापरणं, ओले आणि दमट कपडे घालणे अशी या आजारांची वेगवेगळी कारणे आहेत.
4. राज्यात 24 जिल्ह्यांत कमी पाऊस
राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे, सकाळनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात पावसानं जोरदार हजेरी लावली होती, पण मराठवाडा, विदर्भात पावसानं ओढ दिली आहे.
राज्यातल्या 51 तालुक्यांमध्ये सरासरीच्या 25 ते 50 टक्के पाऊस कमी, तर 147 तालुक्यांमध्ये 50 ते 75 टक्के पाऊस पडला आहे.
5. राज्यात 25 वर्षांनंतर विद्यार्थी निवडणुका
25 वर्षं कॉलेजमधील निवडणुकांवर बंदी घातल्यानंतर यंदा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमधले विद्यार्थी या निवडणुकांसाठी मतदान करणार आहेत. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
Maharashtra Public Universities Act 2016 अंतर्गत राज्य सरकारचं उच्च माध्यमिक शिक्षण विभाग कॉलेज निवडणुकांच्या तारखांचं वेळापत्रक बनवत आहे.
सप्टेंबर महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























