दारू प्यायलात तर गाडीच सुरू होणार नाही- नितीन गडकरी #5मोठ्याबातम्या

नितीन गडकरी

फोटो स्रोत, BBC/ Sharad Badhe

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. दारू प्यायलात तर गाडीच सुरू होणार नाही- नितीन गडकरी

दारू पिऊन वाहन चालवत असाल तर गाडीच सुरू होणार नाही, अशा प्रकारचं भन्नाट तंत्रज्ञान वाहनात बसवण्याचा विचार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे. राज्यसभेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

वाहन चालकानं सीटबेल्ट न घातल्यास पोलीस नियंत्रण कक्षाला आपोआप माहिती मिळेल अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं. यमुना एक्सप्रेसवर झालेल्या अपघातासंदर्भात माहिती विचारल्यावर या प्रश्नाचं उत्तर देताना गडकरी यांनी या नव्या तंत्रज्ञानाची माहिती दिली.

2.अंतर्गत गुणदान माहिती पद्धती पुन्हा सुरू होणार

यंदा दहावीचा निकाल घसरल्यानं शाळांमधील अंतर्गत गुणदान पद्धत पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली शालेय शिक्षण विभागानं सुरू केल्या आहेत. लोकसत्तानं हे वृत्त दिलं आहे. सीबीएसई, आयसीएसई या केंद्रीय मंडळाप्रमाणे दहावीचं मूल्यममापन करण्याचा विचार असून त्यासाठी समिती नेमण्यात आली आहे.

दहावी

फोटो स्रोत, Getty Images

तसंच ज्या विद्यार्थ्यांना गरजेपुरताच गणिताचा अभ्यास करायचा आहे, त्यांच्यासाठी सामान्य गणिताचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. सरकारनं हा विषयही रद्द केला आहे. केंद्रीय शिक्षण मंडळाने मात्र सामान्य गणिताचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

3.कर्नाटक विधानसभा अध्यक्ष सहा दिवसांत राजीनाम्यावर निर्णय घेणार

कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष के.आर. रमेश कुमार यांनी 13 आमदारांच्या राजीनाम्यावर विचार करण्यासाठी सहा दिवसाचा वेळ मागून घेतला आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारला दिलासा मिळाला आहे. राजीनामा दिलेल्या आमदारांमध्ये 10 काँग्रेसचे तर तीन आमदार जेडीएसचे आहेत. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.

"मी जे निर्णय घेणार आहे त्याची इतिहासात नोंद होईल. त्यामुळे मी कोणतीही चूक करणार नाही. हे राजीनामे स्वेच्छेने दिले आहेत याची खातरजमा मी करणार आहे." असं ते म्हणाले. 13 पैकी 6 आमदारांनीच फक्त योग्य पद्धतीने राजीनामे लिहिलेत, असंही ते पुढे म्हणाले.

4.भाजप खासदार काढणार 150 किमी पदयात्रा

भाजपचे सर्वच खासदार त्यांच्या मतदार संघात 150 किलोमीटरची पदयात्रा करणार आहेत. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधींची 150 जयंती साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या खासदारांना मंगळवारी हे आदेश दिले आहेत. दिव्य मराठीनं ही बातमी दिली आहे.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, EPA

पंतप्रधानांच्या निर्देशानुसार भाजप खासदार 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान पदयात्रा करणार आहेत. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींनी बैठकीला संबोधित करताना खासदारांना हे निर्देश दिले आहेत.

जोशींनी सांगितल्याप्रमाणे, लोकसभा सदस्यांप्रमाणेच राज्यसभा सदस्यांना सुद्धा प्रत्येकी एक-एक मतदार संघ दिला जाणार आहे. त्यामध्ये राज्यसभा सदस्यांना महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या संघर्षावर कार्यक्रम घ्यावे लागणार आहेत.

5.विविध खटल्यात सीबीआयचे 110 ठिकाणी छापे

भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी प्रकरणांचा छडा लावण्यासाठी सीबीआयनं देशभरात 110 ठिकाणी छापे टाकल्याची बातमी हिंदुस्तान टाइम्सने दिली आहे. 19 राज्यात 30 खटल्यांप्रकरणी हे छापे टाकण्यात आले असल्याचं सीबीआयतर्फे सांगण्यात आलं आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला सीबीआयने 13 कंपन्यांची आणि विविध बँक अधिकाऱ्यांची झडती घेतली होती. एकूण 1,139 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने छापे टाकले होते. सीबीआय संचालक ऋषीकुमार शुक्ला यांच्यासकट अनेक ज्येष्ठ अधिकारी या कारवायांकडे लक्ष ठेवून आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)