राहुल गांधींवर अंमली पदार्थांच्या सेवनाचा आरोप करणाऱ्या सुब्रमण्यम स्वामींविरोधात FIR #5मोठ्याबातम्या

राहुल गांधी सुब्रमण्यम स्वामी

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. राहुल गांधींवर अंमली पदार्थांच्या सेवनाचा आरोप करणाऱ्या सुब्रमण्यम स्वामींविरोधात FIR

राहुल गांधी अंमली पदार्थांचं सेवन करत असल्याचा आरोप करणारे भाजपा नेते आणि राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्याविरोधात काँग्रेस पक्षानं FIR दाखल केला आहे. स्क्रोलनं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

"आम्ही उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातल्या कोतवाली नगर पोलिस ठाण्यात सुब्रमण्यम स्वामी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे," अशी माहिती काँग्रेसचे नेते पीएल पुनिया यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. "स्वामींविरोधात कठोर कारवाई करण्याची आमची मागणी आहे," असंही पुनिया यांनी सांगितलं.

याचप्रकरणी स्वामींविरोधात अजून एक FIR दाखल करण्यात आला आहे. छत्तीसगडमधील जाशपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पवन अग्रवाल यांच्या तक्रारीच्या आधारे स्वामींविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे.

2. राजीनामा दिलेले कर्नाटकचे आमदार मुंबईत, सोफीटेल हॉटेलसमोर काँग्रेस कार्यकर्त्यांची निर्दशनं

कर्नाटकमध्ये निर्माण झालेल्या राजकीय नाट्याचे पडसाद मुंबईत उमटले आहेत. आमदारकीचा राजीनामा देणारे कर्नाटक विधानसभेतील काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार मुंबईतील सोफीटेल हॉटेलमध्ये थांबले आहेत. आमदारांचं वास्तव्य असलेल्या या हॉटेलबाहेर रविवारी काँग्रेसच्या कार्यकत्यांनी जोरदार निदर्शनं केली. लोकमतनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

निदर्शनं करणाऱ्या काही काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी सूरज सिंह ठाकूर यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

शनिवारी काँग्रेस-जेडीएसच्या 13 आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर कर्नाटकातील आघाडी सरकार अल्पमतात आलं आहे. काँग्रेसचे हे आमदार राजीनामा देण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार अल्पमतात आलं आहे.

3. राज्यभरातील 296 लहान-मोठ्या धरणांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

रत्नागिरीतील तिवरे धरण फुटल्यानंतर राज्यभरातील धरणांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यातील 296 मोठी आणि मध्यम धरणांमध्ये त्रुटी आढळल्या असून या धरणांमधील दोष तातडीने दूर करण्याची निकड धरण सुरक्षितता संघटनेनं व्यक्त केली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

तिवरे धरण

फोटो स्रोत, PRESS TRUST OF INDIA

फोटो कॅप्शन, फुटलेलं तिवरे धरण

धरण सुरक्षितता संघटनेनं ज्या धरणांची यादी प्रसिद्ध केली आहे, त्यामध्ये सोलापूरचं उजनी आणि नागपूरमधील पेंच (तोतलादोह) ही महत्त्वाची धरणं या यादीत आहेत. त्याचप्रमाणे पानशेत, वारणा, खडकवासला, वरसगाव, गंगापूर, भंडारदरा, कामटी खैरी, लोअर वेण्णा, लोअर वर्धा यासह कोकण, मराठवाडा विभागातील अनेक धरणांमध्ये दुरुस्तीची गरज असल्याचं धरण सुरक्षितता संघटनेनं म्हटलं आहे.

बहुतांश धरणं बांधून अनेक वर्षं झाली आहेत. निधीअभावी त्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष झालं. मध्यंतरी जागतिक बँकेकडून पहिल्या टप्प्यात मिळालेल्या ५०० कोटींच्या कर्जातून २९१ धरणांची दुरुस्ती करण्यात आली आहे.

4. आधारच्या मदतीनं आयकर भरणाऱ्यांना मिळणार पॅन कार्ड

आधार क्रमांकाच्या मदतीनं आयकर भरणाऱ्यांना प्राप्तीकर विभागाकडून स्वत:हून नवीन पॅन क्रमांक देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष प्रमोद चंद्र मोदी यांनी दिली आहे. एनडीटीव्हीनं हे वृत्त दिलं आहे.

आधार कार्ड

फोटो स्रोत, Getty Images

ज्या करदात्यांकडे पॅन क्रमांक नाही त्यांना आधार क्रमांकाच्या मदतीने आयकर भरता येईल, अशी घोषणा केंद्राय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

अर्थात, पॅन (पर्मनंट अकाउंट नंबर) ही व्यवस्था अजून बाद झालेली नसल्याचंही प्रमोद चंद्र मोदींनी स्पष्ट केलं आहे.

दोन पद्धतीने विवरण पत्र भरण्याची मुभा ही अतिरिक्त सुविधा आहे. आधार व पॅन यांची एकमेकांना जोडणी सक्तीची केलेली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे पॅन नाही व ज्यांनी आधार क्रमांकानं आयकर भरला आहे, त्यांना पॅन क्रमांक देऊन तो आधारशी जोडण्यात येईल, असं प्रमोद चंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.

5. सामन्यादरम्यान काश्मीरसंबंधातले बॅनर झळकवल्यानं बीसीसीआयची तक्रार

द बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियानं (BCCI) आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेकडे (ICC) तक्रार दाखल केली आहे. लीड्स इथल्या हेडिंग्ले क्रिकेट स्टेडिममध्ये भारत आणि श्रीलंकेदरम्यान फ्री काश्मीर असे बॅनर झळकल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. झी न्यूजने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

या सामन्यादरम्यान जस्टिस फॉर काश्मीर आणि इंडिया स्टॉप जीनोसाइड अँड फ्री काश्मीर असे बॅनर लिहिलेली दोन विमान स्टेडिअमवर अर्धा तास घिरट्या घालत होती. दरम्यान, काही वेळानं 'इन्ड मॉब लिंचिंग' लिहिलेलं एक बॅनरही झळकवण्यात आलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)