उष्णतेच्या लाटेमुळे कर्फ्यू असूनही कामाच्या शोधात ते घराबाहेर पडतायेत

बिहार

फोटो स्रोत, BBC/Niraj Priydarshy

    • Author, नीरज प्रियदर्शी
    • Role, बीबीसीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या लाटेत बिहारमध्ये किती जण मरण पावले, याचा अंदाज वर्तवणं कठीण होऊन बसलं आहे.

प्रसारमाध्यमांच्या मते हा आकडा तीन दिवसात दोनशेच्या पुढे गेला होता. मात्र बिहारच्या आरोग्य विभागाने आतापर्यंत 108 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे.

उष्माघातामुळे आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू गया जिल्ह्यात झाले आहेत. गयाचे जिल्हाधिकारी अभिषेक सिंग यांनी बीबीसीला सांगितलं, "यावेळी उन्हाळा आणि उष्माघातामुळे नैसर्गिक आपत्तीचं रूप घेतलं आहे. आमच्या आकडेवारीनुसार 33 लोकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे."

"आसपासच्या जिल्ह्यातले रुग्णही मगध मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी येत आहे. इथे त्यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. बाहेरून आलेल्या 14 रुग्णांचा मृत्यूही उष्माघातामुळे झाला आहे," ते पुढे सांगत होते.

गयाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पहिल्यांदा तिथं कलम 144 लागू केलं आहे. प्रचंड उन्हामुळे सकाळी 11 ते 4 या वेळात अगदीच अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर निघण्यावर बंधन घातली आहेत. सध्या बिहारच्या सहा जिल्ह्यात अशा प्रकारचा आदेश जारी करण्यात आला आहे.

लोकांनी बाहेर निघू नये हे अपील करण्यासाठी प्रशासन नगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या गाडयांमधून लाऊड स्पीकर घेऊन फिरत आहेत.

उष्माघातात कामाची वाट पाहणारे मजूर

डेल्हामध्ये एका ठिकाणी रस्त्यावर काही मजूर कोंडाळं करून बसले होते. तिथं विचारल्यावर कळलं की ते रोजंदारीचे मजूर आहे. काम मिळण्याची वाट पाहत ते तिथे बसले होते. या उष्णतेचा परिणाम त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.

ज्या शहरात 11 ते 4 घरातून बाहेर निघण्यावर बंधनं घातली आहेत तिथे हे लोक अगदी आरामात बसल्याचं पाहून मात्र आश्चर्य वाटलं.

हा चौक लेबर चौक नावानेही ओळखला जातो. तिथं बसलेल्या लोकांशी चर्चा केल्यावर आम्हाला कळलं की रोज तिथं दोनशे ते अडीचशे लोक कामाच्या शोधात येतात.

गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे लोक कमी प्रमाणात येत आहेत. त्यांना तरीही काम मिळत नाहीये ही त्यांची खरी अडचण आहे. नाही तर साधारणपणे लोक तिथं सकाळी दहा वाजेपर्यंतच असतात.

बिहार

फोटो स्रोत, BBC/Niraj Priyadarshy

किरीत-नवादा बसमधून आलेले लालू यादव बाहेर एका कोपऱ्यात बसले होते. त्यांना विचारल्यावर असं कळलं की त्यांना गेल्या तीन दिवसांपासून काम मिळालेलं नाही. त्याच्या दोन दिवस आधीही ते तिथं आले होते. आजही त्यांना काम मिळालं नाही.

ते म्हणतात, "पैसा नसेल तर आम्ही काय खाणार? मला तीन मुलं आहेत. त्यांच्या शिक्षणाचा खर्च आहे. घराचा खर्च आहे. शेतीचं नुकसान होतंय." तिथं असलेल्या प्रत्येक मजुराला उष्माघाताचा फटका बसलाय, मात्र कसंतरी स्वतःला सांभाळत असल्याचं त्यांनी सांगितलं.

मृतांची संख्या वाढते आहे

फल्गू नदीच्या किनाऱ्यावर विष्णूपद नावाचा एक स्मशान घाट आहे. तिथे येणाऱ्या मृतदेहांची संख्या वाढत आहेत, अशा बातम्या येत आहे.

आम्ही तिथे गेलो तेव्हा 14 मृतदेहांवर अंत्यसंस्कार सुरू होते. तर दोन मृतदेह तयारही होते.

तिथे असलेले संजय नावाचे एक व्यक्ती अग्नी देण्याचं काम करत होते. ते सांगतात, "हा आजचा 23वा मृतदेह आहे. काल 33 मृतदेह आले होते. एक दिवशी तर 85 मृतदेह आले होते."

बिहार

फोटो स्रोत, BBC/Niraj Piyadarshy

उष्माघात आणि उष्ण वाऱ्यांबाबत विचारल्यावर ते सांगतात, "आपल्या आप्ताचं नदीच्या वाळवंटाच दहन व्हावं याबाबत लोक आग्रही असतात. उष्माघाताने लोक मरत आहेत आणि अग्नी देणाऱ्या लोकांनाही उष्माघाताचा त्रास होतोय."

विष्णूपद घाटावर मृतदेहांवर विद्युतदाहिनीतच अंत्यसंस्कार करावेत असं स्पष्ट शब्दांत लिहिलं आहे. तिथली विद्युतदाहिनी मोडकळीला आली आहे. ज्यांच्या आप्तेष्टांवर अंत्यसंस्कार सुरू होते ते तिथे फरशीवर बसून वाट पाहात होते.

दुकानदारांचीही परिस्थिती वाईट

बोधगयाचा परिसर सगळ्यांत उष्ण असतो असं आकडेवारीवरून लक्षात येतं. तिथल्या महाबोधी मंदिरातही आता लोकांची वर्दळ कमी झाली आहे. गेटच्या बाहेर असणाऱ्या फुटपाथवरची बहुतांश दुकानं बंद होती.

सत्यनारायण साव यांनी मात्र आपलं दुकान तिथे थाटलं होतं. आम्ही बंद दुकानांविषयी त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले, "काही विक्रीच होत नाही. इतक्या उन्हात कोण दुकान चालवणार? आमच्याकडे रोजगाराचा दुसरा कोणताच पर्यायच नाही."

तसंच आईसक्रीमच्या गाडीवर विजय साव उभे होते. ते तिथे रोज 20 किमीहून शेरघाटीहून येतात. दिवसभर आईसक्रीम विकतात. घरी पोहोचेपर्यंत आठ वाजतात.

ते म्हणतात, "आजकाल ग्राहक कमी झाले आहेत. आम्ही तर रोज पैसा घेऊन जातो. त्यातच गुजराण करतो. एक दिवसही घरी बसलो तरी अपराध्यासारखं वाटतं."

महाबोधी मंदिरात प्रवेश करण्याआधी पोलिसांची सुरक्षाव्यवस्था असते. रस्त्यावर एखादा मनुष्य दिसला नाही तरी पोलीस नक्कीच दिसतात.

ऍम्बसीच्या वळणावर एक तपासणी नाका आहे. बाहेर तिथे असलेल्या झाडाच्या खाली एक सावली आहे. तिथे काही पोलीस पंखा लावून बसले होते. ते सांगत होते, "दुपारी हा पंखा बंद ठेवतो कारण त्यातून गरम हवा येते."

पोलिसांचीही परिस्थितीही वेगळी नाही

उष्माघात आणि उन्हात आपलं कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांशी आम्ही बातचीत केली. ते म्हणतात, "ड्युटी आहे तर करावी तर लागेलच. त्यात कसलीही सूट नाही. आठ तासाची शिफ्ट आहे. आठ चेक पॉईंट आहेत. मनुष्यबळही कमी आहे. कुठे एक तर कुठे दोन व्यक्ती असतात.

बिहार

फोटो स्रोत, BBC/Neeraj Priyadarshy

जेव्हा ब्रेक घेण्याची इच्छा होते तेव्हा मन मारतो. चेक पॉईंट कोणाच्या जबाबदारीवर सोडणार? प्रशासनाने आम्हाला एक कुलर दिलाय. पिण्याचं पाणीही गरम झालं आहे. आम्ही लोक आजूबाजूच्या दुकानातून पाणी घेऊन पितो. आम्हाला या उष्ण वाऱ्याचा सामना करावा लागतो."

आम्ही जेव्हा बोधगयाहून दुपारी तीनच्या सुमारास गयाला येत होतो तेव्हा रस्त्यावर फुटपाथ तयार करण्याचं काम सुरू होतं. अनेक मजूर तिथे विटा पसरवण्याचं काम करत होते. हे नगरपालिकेचं काम आहे असं कळलं.

मात्र नगरपालिकेच्या गाड्यांनीच येऊन बाहेर पडू नका अशी घोषणा केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा अशा कामांवर बंदी घातली होती.

एका मजुराने नुकतंच तिथे आल्याचं सांगितलं.

आम्ही जेव्हा बोधगयाला निघालो तेव्हा हेच लोक 12 वाजताच्या सुमारास काम करताना दिसले होते. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. असं काही दिसलं तर आम्हाला फोटो काढून पाठवा असं आव्हान जिल्हाधिकाऱ्यांनी केलं होतं. त्यानुसार आम्ही त्यांना रीतसर फोटो पाठवला.

संध्याकाळ होण्याच्या सुमारास आभाळ भरून आलं होतं. रस्त्यावर रहदारी वाढली होती. ऊन उतरलं होतं.

बिहार

फोटो स्रोत, BBC/Niraj Priyadarshy

गयामधले स्थानिक पत्रकार आदित्य वर्धन सांगतात, "इथे गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून आभाळ भरून येत आहे. आभाळ भरून आलं तरी हावा गरम होतं."

बोधगयाहून परत येताना रस्त्याच्या बाजूला फल्गू नदीला पाहून आम्ही तिथल्या एका ज्येष्ठ नागरिकाला विचारलं की ही नदी केव्हा वाळली?

"एके काळी तिथे दुधाची नदी वाहायची असं पुराणात लिहिलं आहे. त्या नदीला सीतेचा शाप मिळाला आहे. त्यामुळे आता ती वाळली आहे."

मग थोडं थांबून ओसाड जमिनीकडे पाहून इशारा करत ते म्हणाले, "सगळी वाळू काढून टाकली या लोकांनी. नदी कुठून येणार? आता तर वाळूही उरली नाही. आम्ही अगदी ओंजळ भरून भरून पाणी पित होतो. आता तर 60 फूट खोदूनही पाणी मिळत नाही."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)