You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पालघर भूकंप : एका दिवशी सहा धक्के, NDRFचं पथक तैनात
शुक्रवारी भूकंपाच्या सहा धक्क्यांनी पालघर आणि परिसर हादरला.
या भूकंपामध्ये २ वर्षांच्या एका मुलीचा मृत्यू झाल्याचे प्रांरभिक माहितीमधून स्पष्ट झाले आहे.
शुक्रवारी सकाळी 6 वाजून 58 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का बसला. हा धक्का रिश्टर स्केलवर 3.3 इतक्या तीव्रतेचा मोजण्यात आला.
त्यानंतर सकाळी 10.03, 10.29 वाजता तर दुपारी 2.06, 3.53 आणि सायंकाळी 4.57 वाजता भूकंपाचे धक्के बसले.
दुपारी 14.06 मिनिटांनी बसलेला धक्का 4.1 रिश्टर तीव्रतेचा होता. इतर सर्व धक्के 3.0 रिश्टर ते 3.6 रिश्टर दरम्यान होते.
पालघरमधील मदत करण्यासाठी एनडीआरएएफची तुकडी पुण्याहून आज पहाटे तलासरी तालुक्यात दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफ पालघरमधील आदिवासींमध्ये भूकंपाची माहिती देण्याचं काम करणार आहे.
तसेच एनडीआरएफची एक तुकडी डहाणूतील धुंदलवाडी येथे 200 तंबूंसह पोहोचली आहे. नागरिकांना तात्पुरता आश्रय देण्यासाठी या तंबूंचा वापर होणार असल्याचे पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
तलासरी तालुक्यामध्ये नोव्हेंबरपासून भूकंपांची मालिका
पालघरच्या तलासरी तालुक्यामध्ये 11 नोव्हेंबर 2018 पासून 3 रिश्टरपेक्षा 10हून अधिक धक्के बसल्याचे राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने स्पष्ट केले आहे. यामध्ये 1 फेब्रुवारी म्हणजे काल सर्वांत मोठा म्हणजे 4.1 रिश्टरचा धक्का बसला आहे.
12 डिसेंबर 2018 रोजी पालघरच्या धुंदलवाडी आणि 25 आणि 27 जानेवारी 2019 रोजी डोंगरीपाडा आणि तलासरी येथे भूकंप निरीक्षणासाठी तात्पुरती क्षेत्र कार्यालयं स्थापन करण्यात आल्याचे या केंद्राने स्पष्ट केलं आहे.
नागरिकांमध्ये घबराट
डहाणूजवळ गंजाड गावात राहाणाऱ्या प्रवीण मशे यांनी काल झालेल्या भूकंपाबद्दल अधिक माहिती बीबीसीला दिली. ते म्हणाले, "सकाळी 7 च्या आसपास भूकंप झाल्यानंतर सकाळी आणि दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ आणि घबराटीचे वातावरण होते."
पालघरमधील पत्रकार निरज राऊत यांनी सांगितलं, "या भूकंपांच्या धक्क्यांमुळे काही मातीच्या घरांना तडे जाणं, पत्रे पडणं अशा प्रकारच्या घटना घडल्याचं सांगितलं आहे. तसेच यासर्व घडामोडींची नोंद पूर्णपणे होऊन माहिती संकलित झाल्यावर सर्व नुकसानीचा अंदाज येईल."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)