दानिश जेहेनचा अपघाती मृत्यू : युट्यूबवर लाखोंच्या घरात फॉलोअर्स

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

एमटीव्हीवरील Ace of Space कार्यक्रमातील स्पर्धक आणि यूट्युब ब्लॉगर दानिश जेहेन याचा एका कार अपघाताता दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी दानिश एका लग्नावरुन परतत होता. त्यावेळी त्याची कार वाशीजवळ एका रस्ता दुभाजकाला धडकल्याने अपघात झाला.

21 वर्षीय दानिश हा युट्यूब ब्लॉगर होता. युट्यूब आणि इन्स्टाग्रामवर त्याचे लाखो फॉलोअर्स होते.

एमटीव्हीवर विकास गुप्ताचा कार्यक्रम Ace of Space मध्ये दानिश सहभागी झाला होता. या कार्यक्रमातून काही वैयक्तिक कारणांसाठी त्याला बाहेर पडावं लागलं असलं तरी त्याची लोकप्रियता प्रचंड होती. या कार्यक्रमातील इतर स्पर्धकांनी त्याचं टोपणनाव 'कूलेस्ट बॅड ब्वॉय' (Coolest Bad Boi) असंच पाडलं होतं.

दानिशच्या मृत्यूनंतर Ace of Spaceचा होस्ट विकास गुप्तानं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट लिहिली. "दानिश तू हमेशा जहन मे रहेगा," असं विकासनं त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

विकासनं लिहिलं, "तू परत येणार नाहीस हे मी इतर स्पर्धकांना कसं सांगू? तू कायम Ace of Spaceचा 'कूलेस्ट बॅड ब्वॉय'च राहशील. तू कोणत्याही क्षणी जागा होशील असंच तुझ्या निष्प्राण देहाकडे पाहताना वाटत होतं."

कुर्ल्याच्या एका चाळीमधला दानिश पाहता पाहता 'सोशल मीडिया सेन्सेशन' बनला होता. दानिशचं #fambruh. नावाचं युट्यूब चॅनेल होतं. या चॅनेलवरुन तो सौंदर्य प्रसाधनांच्या गुणदोषांची माहिती द्यायचा. तसंच हेअर स्टाइल आणि बाइक्सबद्दलही टिप्स द्यायचा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)